शिर्षकामधील ‘आपण’ म्हणजे भारतीय. नव्वदच्या दशकात उसळलेल्या दंगलीमध्ये पळून गेलेले काश्मिरी पंडीत मिळून सगळे भारतीय. काश्मीर घाटीमध्ये वर्षाचे 365 दिवस तणावाखाली राहत असणारे गरीब मुस्लिम मिळून सगळे भारतीय. नेहमी काश्मीरच्या दंग्यांमध्ये आवाज दबल्या जाणारे परंतु स्वतःचं वेगळेपण आणि देशाबद्दल निस्सीम निष्ठा जपणारे जम्मूच्या खोऱ्यातील लाखो डोग्रा मिळून सगळे भारतीय आणि, नेहमीच काश्मीरच्या नावाखाली सात दशके हक्क मारले गेले लडाख खोऱ्यातील बौद्ध मिळून सगळे भारतीय. डाव्यांसारखं चारदोन भडकावू अलगाववादी नेते आणि त्यांनीच काड्या लावून इस्लामिक कट्टरतावादाच्या आगीत स्वतःहून किंवा चारशे-पाचशे रुपयांच्या अगतिकतेमुळे दगडफेक करणारी रस्ता भटकलेली पोरं, यांना मी कुठेही भारतीय लोकशाहीच्या दायऱ्या मध्ये काश्मीर चा आवाज मानत नाही आणि ज्यांना कुणाला ही मंडळी देश तोडणाऱ्या कारस्थानाचे बळी किंवा घटक वाटत नाहीत, “पहली फुर्सत में निकलो….कोई जरूरत नही आपको ये पढ़ने की…!”

एकंदर काश्मीर प्रश्नाच्या इतिहासात तोंड घालून इथे वेळ वाया घालायला नको. कलम 370 हे काश्मीर च्या विकासातील आणि देशाच्या सुरक्षेच्या मार्गात कसं अडथळा होतं हेही सांगायला वेगळं नको. इथं पहायचं आहे आफ्टरमॅथ, म्हणजेच 370 हटल्यानंतरचे पडसाद आणि हे हटवण्यासाठी केले गेलेले सर्व प्रयत्न. साधारण वाजपेयी सरकार च्या काळापासून याचे प्रयत्न सुरू झाले. काश्मीर च्या कथित लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अनेक वेळा 370 हटवण्यासाठी असफल प्रयत्न केले गेलेच. मात्र दशकानुदाशके राजेशाही ची मनसबदारी मिळाल्या सारखे काश्मीर ला आपल्या बापाची जहागीर समजून बसलेल्या काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांनी केवळ काश्मीरचा विकासनिधी खाण्याचं काम केलं. भ्रष्टाचार देशाला नवीन आहे का म्हणा.. परंतु भ्रष्टाचारासोबत काश्मीरमध्ये 1990 मध्ये झालेल्या हिंदूंच्या सरसकट कत्तली नंतर वेगाने फोफावलेला पाकिस्तान प्रायोजित इस्लामिक कट्टरवाद हा याच काश्मीरच्या तथाकथित नेत्यांच्या सावलीत वाढला. काश्मिरी जनतेच्या मनात भारत सरकारच्या विरुद्ध विषपेरणी पासून ते पार बुऱ्हाण वाणी सारख्या दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेला शहिदी चं स्वरूप देईपर्यंत भारतविरोधी वातावरण कारस्थानाने निर्माण केलं ते याच नेत्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थनानेच. आणि याची तयारी आजपासूनची नाही बरं… यासाठी फार काळी कामं केलीत या लोकांनी..!

हा बघा जम्मू काश्मीर चा नकाशा (जुना). यातील सबडीव्हीजन्स म्हणजे विधानसभा मतदारसंघ. विधानसभा मतदारसंघ हे काश्मीर च्या विधानसभेत, जी की अगोदर लोकसभेला समान इतक्या उच्च दर्जाची होती. विचार करा, त्यातले आमदार काश्मीरचं नशीब ठरवत होते इतके ते महत्वाचे होते. मुद्दामहून श्रीनगर खोऱ्यात इतके मतदारसंघ ठेवले आहेत की बहुमत तर तिथेच होऊन जातं. मात्र गंमत म्हणजे पूर्ण जम्मू-काश्मीर मध्ये जम्मू खोऱ्याची लोकसंख्या सर्वाधिक असताना त्यांना प्रतिनिधित्व मुद्दामहून कमी दिलं. लडाख च्या खोऱ्याकडे बघून वाटतं की लडाख वाल्याना कधी विचारायला तरी आले की नाही…!

370 हटवताना काश्मीरच्या जनतेचं मत जाणून घेतलं नाही आणि काश्मीर व लडाख ला केंद्रशासित प्रदेश करून विभाजन का केलं असे आरोप लावून अतिशय चतुराईने फुटीरतावाद्यांची बाजू घेणाऱ्या तमाम डाव्या, सॉफ्ट डाव्या, कम्युनिस्ट, काँग्रेसी, रविष कुमारी, कथित निःपक्षपाती मात्र तरीही केवळ भाजपचा विरोध करायचा म्हणून करणारे अंध विरोधक या सर्व लोकांना ठाम, निःपक्षपाती आणि सडेतोड उत्तर देण्यासाठी वर जी माहिती दिली आहे त्याचाच मोठा आधार आहे.

आरोप पहिला :- काश्मीर च्या जनतेला विश्वासात घेतलं नाही.

आधी सांगा जनता कोणाला म्हणताय..? जनतेचा आवाज जर ते फुटीरतावादी म्हणत असाल तर ते निवडून येण्यामागे केवढी मोठी कॉन्स्पिरसी आहे हे वरच सांगितलंय. तरीही पटत नसेल तर “पहली फुरसत में…”

मग काश्मीर चे लोक आहेत तरी कोण आणि कुठे आहे त्यांचा आवाज..? यासाठी आता इथे थोडी डेमोग्राफी समजणं आवश्यक आहे. जम्मू खोऱ्यात मोठ्या संख्येने डोग्रा समाज राहतो. त्यांचा आवाज भारताच्या बाजूनेच असतो शिवाय जम्मू मधील मुसलमान सुद्धा बऱ्यापैकी भारताच्या बाजूने आहेत. लडाख खोऱ्याची अनेक वर्षांपासून केंद्रशासित प्रदेशाची मागणी आहे हे लोकसभेत लडाखच्याच खासदाराने सांगितले आहे. अर्थात त्यांना सुद्धा भारत प्रिय आहे. आवाज आणि आक्रोश आहे श्रीनगर खोऱ्यात. पाकव्याप्त काश्मीर ला लागून असल्यामुळे आणि मुस्लिम लोकसंख्या जास्त असल्यामुळे पाक प्रायोजित इस्लामिक कट्टरवाद अतिशय सहजगत्या पसरलेला आहे. त्यामुळेच तिथले बहुतांश मुस्लिम भारतविरोधी आहेत. मात्र भडकवलेली माथी म्हणजे मतं होत नाहीत. श्रीनगर खोऱ्यामधीलच सात-आठ जिल्ह्यांमध्ये ही नेहमीची अशांतता आणि दहशतवादी समर्थक वातावरण असतं. पर्यटन हा एकमेव अर्थव्यवस्थेचा कणा केव्हाच मोडून पडलेल्या काश्मीर ची तरुण पिढी करणार तरी काय होती. जसे वातावरण तशी बदलणार होती. वर नमूद केल्याप्रमाणे याच भागात सर्वाधिक नेतृत्व दिलं गेलं आहे आणि याच नेत्यांची जबाबदारी होती की या तरुणांना देश विभाजनाच्या मार्गावर जाऊ देण्यापासून रोखणे आणि त्यांना योग्य रोजगार देऊन देशाच्या विकासात हातभार लावणे आणि दहशतवादी विचारसरणीस थांबवणे. यांनी इतक्या वर्षात याच्या विपरीत या सर्व गोष्टी बळकट होऊ दिल्या आणि परिणामी, याच श्रीनगर खोऱ्यातील अशांतता पूर्ण काश्मीरची जखम होऊन बसली. अगदी प्रामाणिकपणे उत्तर द्या आता… अगोदरच लोकशाहीच्या परिकथेतील संकल्पनांच्या दुर्गुणापायी आज गिलगिट, बाल्टिस्तान हे पाकव्याप्त आहे. अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे अगोदरच उत्तरपूर्व लडाख आज अकसाई चीन आहे. मग या घटनेकडे आणखी पाचेक वर्ष दुर्लक्ष करून हिमालयाची अभेद्य सीमा पाकव्याप्त होऊ द्यायची होती का..? दहशतवादाच्या आगीत आपल्याच श्रीनगर खोऱ्या ला किती दिवस जळू द्यायचं होत…? तिथल्या भरकटलेल्या मुस्लिम तरुणांना घरदार सोडून अजून किती धर्मांधतेच्या नादी लागू द्यायचं होतं..? मी इथे भावुक होऊन डायलॉग मारत नाहीये. काश्मीर च्या जागी एकदा आपला जिल्हा ठेऊन बघा आणि मग सांगा, नालायक आणि बिनकामाचे लोकप्रतिनिधी जर परिस्थिती सुधारत नसतील आणि शत्रूराष्ट्राच्या कारवायांमध्ये गुरफटून जर तुमची मातृभूमी नरक होत असेल आणि त्याची कुणाला जाणीवसुद्धा होत नसेल; तर काय होणं अपेक्षित आहे तुम्हाला..?

हा आरोप करत असताना सोयिस्कररित्या कथित लिबरल्स आणि डावे खोऱ्यामधील वाढलेला इस्लामिक कट्टरवाद, त्यातून जोपासला जात असलेला दहशतवाद आणि तिथून एका रात्रीत हाकलून दिलेले काश्मिरी पंडित यांच्याबद्दल अवाक्षर बोलत नाहीत. अनेक महाभाग तर इस्लामिक दहशतवादाचा विषय काढल्यानंतर दहशतवादाला धर्म नसतो वगैरे वल्गना करतात. मुळातच जी गोष्ट धर्मांधतेतून सुरू झालीये त्याला धर्म नाही म्हणणं म्हणजे एकप्रकारे त्या धर्मांधतेवर पांघरूण घालणंच होय. विरोधाभास म्हणजे हेच लोक कुठल्याश्या फालताड अंधश्रद्धाळू हिंदू साध्वी, जिचा की सुशिक्षित हिंदुसुद्धा बहिष्कारच करतात, तिच्यावर लागलेल्या (मात्र आणखी सिद्ध न झालेल्या) दहशतवादाच्या आरोपामुळे संपूर्ण हिंदू धर्मास भगवा आतंकवाद म्हणतात. वा गुरू..! कन्हैया कुमारवर जेव्हा देशद्रोहाचे आरोप आहेत तेव्हा ते अद्याप सिद्ध झाले नाहीत म्हणून कन्हैया महापुरुष, कायदेशीर बाबीमध्ये साध्वी त्याच जागी असताना सुद्धा साध्वीला दोषी जाहीर करायचं आणि तमाम हिंदू धर्मालाच दहशतवादी म्हणायचं…? वाचकहो हा नुसता थुकरट दुटप्पीपणा नाहीये, वाढत्या इस्लामिक कट्टरवादाला आणि त्यायोगे वाढत जाणाऱ्या इस्लामिक दहशतवादी विचारसरणीला अप्रत्यक्षपणे पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे. तेव्हा स्पष्ट सांगायचं झालं तर काश्मीरप्रश्नी सुद्धा ही आगाऊ मंडळी क्रीटीसीझम च्या नावाखाली काश्मीरमधील इस्लामिक कट्टरतेला अप्रत्यक्षपणे समर्थन तर देत नाहीये ना, अशी शंका मनात उपस्थित होतेय. बरं ते इस्लामिक कट्टरता म्हणल्यावर लगेच धर्मनिरपेक्षतेला तडा गेल्यासारखं वाटतंय का..? तस वाटत असेल तर “पहली फुरसत में…”

आरोप दुसरा :- केंद्रशासित प्रदेश कशामुळे..?

हा मोठा गमतीशीर आहे. आणि बघायला गेलं तर याचं उत्तर खूप सोपं आहे. अर्थात वेगळं सांगायला नको की हा आरोप करणाऱ्यांमध्ये ते ढोंगी सुद्धा आहेत जे सर्व समस्या माहीत असून, केंद्रशासित प्रदेश हे सर्वोत्तम समाधान आहे याची जाण असून सुद्धा मुद्दामहून हा प्रश्न विचारतील आणि आव असा आणणार की जम्मू काश्मीरच्या लोकांचे हक्क मारले जात आहेत आणि यांनाच काय ती त्यांची काळजी. मुळात केंद्रशासित प्रदेश होणं म्हणजे स्थानिकांचे हक्क मारले जाणं अशी वातावरण निर्मिती होत असेल तर त्यांच्या दाव्यांकडे लक्ष न दिलेलंच योग्य.

जम्मू काश्मीर मधून लडाख वेगळा करणं हे काही सरकारने मनाने केलं नाहीये. लदाखवासीयांची ती अनेक दिवसांची मागणी होती. वर नमूद केल्याप्रमाणे लडाखच्या आवाजास इतकी वर्षे अतिशय सोयीस्कररित्या दाबलं आहे या फुटीरतावादी नेत्यांनी. शिवाय धर्माच्या आधारावर लेह आणि कारगिल जिल्ह्याची विभागणी सुद्धा केली. केंद्रशासित प्रदेश असला तरी लोकांना लोकसभेत आपले लोकप्रतिनिधी पाठवण्याचा अधिकार असतो. त्यामुळं लडाख चा आवाज दाबला नाही, तर उलट बाहेर येऊ दिला आहे.

जम्मू काश्मीर ला केंद्रशासित प्रदेश करून देखील तिथल्या विधानसभेस मात्र ठेवले आहे. फरक इतकाच की आता जम्मू काश्मीर च्या मुख्यमंत्र्यास पूर्वीइतके अधिकार राहिले नाहीत. शिवाय मुख्यमंत्र्यास दुय्यम राज्यपालांच्या परवानगी शिवाय एकांगी निर्णय घेता येत नाहीत. पोलिसांसह अनेक महत्वाची खाती केंद्राने स्वतःकडे ठेवून घेतली आहेत. यामागचा सरकारचा हेतू हा काश्मीरमधील फुटीरतावाद मुळापासून संपवणे असा दिसतोय. कारण प्रदेशात लपून चालत असलेल्या अनेक संघटना ज्या फुटीरतावाद आणि दहशतवाद पसरवतात, त्यांच्यावर आळा बसणे आता स्थानिक पोलिसांकडून शक्य आहे आणि दर दुसऱ्या कारणाला सीआरपीएफ जवानांना पाठवण्याची गरज नाही.

याव्यतिरिक्त दि. 08/08/19 रोजी देशाला संबोधून केलेल्या संदेशात पंतप्रधान मोदी यांनी जम्मू काश्मीरला काही काळाने पुन्हा एकदा पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचं नमूद केलं आहे. अर्थात तो शासकीय कमी आणि राजकीय जास्त मुद्दा आहे. परंतु मग इतर राजकीय पक्षांना अकलेचा थांगपत्ता का नसावा याचं फार आश्चर्य आहे. खास करून काँग्रेस सारखा जुना राष्ट्रीय पक्ष, की भाजप ज्याप्रमाणे प्रत्येक राज्यात जाऊन सामान्य लोकांमधून नेते शोधून आणतं आणि स्थानिक घराणेशाहीचा बिमोड करतं, हे काँग्रेस ला का जमू नये..? की उगाच भाजपच्या निर्णयांवर टीका करता येत नाही म्हणून लोकशाही धोक्यात अन असहिष्णुता वाढली म्हणून गळा काढायचा..? काँग्रेस ला हे कुणीतरी सांगा की जोपर्यंत तुम्ही एक मजबूत विरोधीपक्ष म्हणून उभे राहत नाहीत, तोपर्यंत तुमच्यासाठी लोकशाही धोक्यातच राहील. भाजपने काश्मीर खोऱ्यापासून ते लडाख पर्यन्त सर्वत्र नवीन आणि तरुण नेत्यांची फौज उभारण्याची जय्यत तयारी केली आहे. फुटीरतावादी काश्मिरी नेत्यांची हुकूमशाही वर्षभरात संपुष्टात येईल. असेही म्हणता येईल की तिथे आता भाजपची एकाधिकारशाही सुरू होईल. एकंदर, केंद्रशासित प्रदेश म्हणून जम्मू काश्मीर जरा विकासाला प्रवृत्त केला जाऊ शकतो. तसेच खोऱ्यातील फुटीरतावादास आळा बसेल याची आशा धरणे योग्य राहील.

आता आपण. जीवाला लाजा नसल्यागत काश्मिरी पोरींशी लग्न करणार वगैरे पोस्ट्स अशी मुलं टाकतायत ज्यांना गल्लीतल्या मुली बघून रस्ता बदलतात. लक्षात घ्या, काश्मीरमध्ये जाणे, व्यापार करणे वगैरे हे सगळं जरी आता शक्य असलं तरीही काश्मिरी लोकांशी आपुलकीने आणि प्रेमाने वागणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांना दुराग्रह वाटेल अशी कोणतीही वागणूक करू नये. भांडवल असेल तर जाऊन व्यवसाय उघडा. स्थानिक तरुणांना नोकऱ्या द्या. त्यांना भारतात इतरत्र येण्यास प्रवृत्त करा. त्यांच्या भल्यासाठी तुम्हाला जे जमतं ते सर्व करा. काश्मीर ना आपल्या बापाचा, ना त्यांच्या बापाचा! जम्मू-काश्मीर-लडाख आता आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे. पुन्हा एकदा पृथ्वीवरच्या नंदनवनास आपण मिळुन फुलवूया. ऐकण्यात आलंय की येवले चहा खरोखरंच काश्मीरमध्ये शाखा उघडणार आहे…; चला, पर्यटन वाढायला सुरुवात झाली!

Warm Regards

Dnyanesh Make “The DPM”

संदर्भ :-

1)श्री अविनाश धर्माधिकारी, माजी IAS आणि कलम 370 चे विशेष अभ्यासक यांनी विविध ठिकाणी नमूद केलेली माहिती

2) त्सेरिंग नामग्याल, खासदार, लडाख यांचे संसदेतील 6/08/2019 चे भाषण.

3) श्री शंतनू जोशी, केज जि. बीड यांचा श्रीनगर खोऱ्यामधील ग्राउंड रिपोर्ट. सदरील गृहस्थ हे भिक्षुक असून श्रीनगर खोऱ्यात संवेदनशील परिस्थिती मध्ये त्यांनी 2016 मध्ये आठ दिवस काढले होते.

4) श्री अमित शहा, माननीय गृहमंत्री, भारत सरकार, यांचे राज्यसभेतील दि. 05/08/2019 व लोकसभेतील दि. 06/06/2019 रोजीचे भाषण.

5) श्री भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार

6) श्रीमती बरखा दत्त, ज्येष्ठ पत्रकार

7) श्री गिरीश कुबेर, ज्येष्ठ पत्रकार


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *