Maniac या इंग्रजी शब्दाचा अर्थ होतो वेडसर. उर्दू मध्ये अगदी चपखल शब्द आहे याला, तो म्हणजे दीवाना. रेहमानियाक म्हणजे थोडक्यात रेहमानचे दीवाने. हा संगीतातला चालता फिरता देव त्याच्या कामामुळेच इतका जास्त पुजला जातो. संगीतातले जाणकार त्याच्या संगीतातील एकेका बारकाव्याचे निरीक्षण करून सांगतात, एकेक बीट किती युनिक आहे याचं वर्णन करतात. निश्चित आणि निर्विवादपणे रेहमानच्या संगीत प्रतिभेला तोड नाही. उगाच नाही कोण ग्रॅमि आणि ऑस्कर आणतो.
मी शास्त्रीय गायनाच्या “प्रवेशिका पूर्ण” लेव्हल ला जाऊन संगीताची साथ सोडली. त्यामुळे स्वर लागतो की नाही, हरकत बसतेय की नाही, सप्तक कोणतं आहे इतकंच काय ते बेसिक कळतं. वाद्यसंगीत आणि त्यातही अनेक प्रकारचे वाद्य जेव्हा एक धून अलंकृत करत असतात तेव्हा त्यात नावीन्य किती आणि परफेक्शन किती हे मला नाहीच कळत, म्हणूनच मी सामान्य श्रोत्यासारखं संगीताची भावनेशी गाठ पडू देतो. मी रेहमानियाक असण्याचं तेच कारण आहे. विस्तृतपणे सांगतो.
पूर्वी मी या गोष्टीकडे लक्ष द्यायचो नाही की कोण गाण्याचा संगीत दिग्दर्शक आहे. पराकोटीचा रेहमान भक्त असणारा माझा मित्र वैभव जोशी याने मला जाणीव करून दिली की माझ्याच आवडीच्या अनेक गाण्यांचा संगीतकार रेहमान आहे.
जेव्हा आपण कुठलं गाणं ऐकत असतो, तेव्हा आपसूक ते आपण आपल्या अनुभवांशी जोडत असतो. जसं की मोटिव्हेशनल गाणी, रोमँटिक गाणी वगैरे. पार्टी सॉंग ऐकताच मन नाचू पाहतं. आता किती जणांना त्यांच्या आवडीच्या गाण्यांचे फक्त कराओके ऐकवले तर तसाच मूड होईल? म्हणजे बघा, कुमार विश्वास लिखित-रचित “कोई दीवाना कहता है” गीत साधारण संगीत असताना सुद्धा थेट काळजाला हात घालतं कारण ओळी तितक्या खोल आहेत. पण गीताचे बोल साधारण असतील तर ते तितकं आपल्याशी रिलेट होणार नाही unless that particular song is composed by A R Rahman.
जेव्हा जेव्हा “चुपके से” गाणं ऐकतो, ते संगीत ऐकताच असं फील होतं की मी कुठल्यातरी उंच डोंगरावर दगडी चिऱ्याच्या वाड्याच्या खिडकीत बसलोय आणि थंडगार वारं सुटलंय. अशा वेळी ज्या प्रकारे मनात भावनांचं काहूर उठेल ते आणि अगदी तसंच चुपके से आणि आओ ना गाणं ऐकताना होतं. रोजा मधील “ये हंसी वादियाँ” चं सुरुवातीचं म्युझिकच अगदी अंगावर शहारे आणतं. बरोबर आपण बर्फात आहोत याची फिलिंग येते. आता हे गीत असो किंवा “आओ ना” असो, गीताचे बोल अगदीच साधारण आहेत, पण गाणं काळजाला भिडतं संगीत. संगीताच्या माध्यमातून शब्दांच्या मर्यादा पार करून रेहमान श्रोत्यांशी बोलतो. त्याच्या कल्पना तो संगीतातून मांडतो आणि श्रोत्यांना त्या बरोबर जाणवतात.
“रंग दे बसंती” गाण्याची सुरुवातीची पंजाबी ट्यून असो किंवा “साड्डा हक” मधील रॉक गिटार असो, अगदी सिग्नेचर ट्यून आहेत. छोट्याश्या पंधरा वीस सेकंदाच्या एका बीट मध्ये पूर्ण गाण्याची चाल सामावून जाते. पुन्हा पुन्हा कितीही वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही. Law of Diminishing Marginal Utility ला संगीत अपवाद आहे, आणि जरी नसेल, तरी रेहमान चं संगीत नक्कीच आहे.
“कुन फाया कुन” ऐकून गाणं अप्रतिम वाटत नसेल त्या माणसाने जीव द्यावा. त्यातली “रंगरेजा रंग..”, “सजरा सवेरा मेरा तन बरसे”, “सल्लल्लाहु अलैहि वसल्लम” या ठिकाणी असणाऱ्या बिट्स इतक्या प्रभावी आहेत की अर्थही माहीत नसताना मी ते गुणगुणत होतो. गरज काय अर्थ जाणून घेण्याची, संगीत थेट भिडत असतं.
जागतिक दर्जाचे संगीतकार पाहता अगदी एल्विस प्रिसले पासून ते आताच्या रॅमिन जावेडी पर्यंत सर्वांचं संगीत याच तोडीचं आहे. म्हणजेच दुसरी बाजू ही की रेहमान जागतिक तोडीचा संगीतकार आहे.
एकंदरच सर्व प्रकारच्या वाद्यांवर प्रभावीपणे संगीत बनवणे, सर्व प्रकारच्या लोकसंगीतात सहजगत्या संगीत दिग्दर्शन करणे, अनेक प्रकारच्या गाण्यांना गहिऱ्या चाली लावणे हा रेहमान चा तांत्रिक हातखंडा. मात्र तरीही प्रत्येक वेळी संगीतात भावना जिवंत ठेवल्याने ते संगीत भिडतं. रेहमानची अनेक गाणी अशी आहेत ऐकताना बेभान होऊन माणूस स्वतःला विसरून जातो. स्वतःला विसरून आपण ते संगीत ऐकतो म्हणजेच अध्यात्मिक भाषेत तितक्या वेळेपुरता आपल्याला मोक्ष मिळालेला असतो, किंवा आपण मेडिटेट करत असतो. ज्या माणसाच्या मेंदूतून इतकं प्रतिभाशाली संगीत निघत असेल, तो निश्चित देवदूत म्हणजे “अल्लाह रखा” असायलाच हवा..!
Warm Regards
Dnyanesh Make the DPM
0 Comments