जगात मुख्यत्वे आस्तिक, नास्तिक आणि अज्ञेयवादी लोक असतात. अर्थात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती! परंतु प्रत्येकजण आपापला वाद थोपवण्यासाठी सतत जणू कुठल्या संधीत असल्यासारखा वागतो.

कोरोनाचे संकट यात खूप नवी उदाहरणे देत आहे. प्रत्येकजण आपापल्या धर्माचा प्रचार करतोय आणि पटवून सांगायचा प्रयत्न करतोय की कसा धर्मातच कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याची ताकद आहे. हे सर्व अर्थात चूकच. अंधश्रद्धा बाळगणे, वैज्ञानिक दृष्टीकोन नसणे हे खरेतर अशिक्षितपणाचे लक्षण. पण म्हणून स्वतः फार जास्त शिक्षित असल्याचा आव आणणारे नास्तिक काही वेगळे नाहीत.

सर्वप्रथम तर नास्तिकांनो तुम्हाला कुणी सांगितलं की देव फक्त माणसाच्या भल्याचाच तेवढा विचार करतो? साधा कोर्टातला जज न्याय देताना पक्षपात करू शकत नाही, तर जो सनातन आहे तो केवळ मानवासाठी पक्षपात करेल असे का वाटते? मुळात तुम्ही अध्यात्म वाचलंय किती हाच प्रश्न पडतो जेव्हा तुम्ही म्हणता की कोरोनाचे संकट आले असताना कुठला देव उपयोगी पडतोय, सगळे धर्म विज्ञानाकडे आस लावून बसलेत.

एक प्रश्न, अगदी साधा, या जगात विज्ञानाची प्रगती माणसानेच का केली असावी, नाही म्हणजे गाढवांना सुद्धा थोडं विज्ञान माहीत असायला हवं होतं नाही का? माणसांचीच केवळ उत्क्रांती का झाली? सगळे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारत बसा आणि सृष्टीच्या मुळाशी जाऊन थांबाल. विज्ञानाने सृष्टीचं मूळ 13.5 अब्ज वर्षांपूर्वी झाल्याचं सिद्ध केलय (The Big Bang Experiment). सृष्टीच्या जन्मापूर्वी काळही अस्तित्वात नव्हता मग त्याच्या पूर्वी असं काही आहे की नाही? हाच प्रश्न प्राचीन ऋषीमुनींना पडत राहिला आणि त्यांनी अध्यात्मिक अनुभूती घेतली, जिचं वर्णन करणं सोपं नसतं मात्र इथं गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या आधारे मी प्रयत्न करेन.

सृष्टीच्या मुळाशी एक सनातन ऊर्जा आहे. त्यातून सतत ब्रह्मांडांची निर्मिती होत राहते आणि ब्रह्मांडे संपुष्टात येत असतात. याच प्रकृतीचे तीन गुण आहेत. रज, तम आणि सत्व. विश्वातली प्रत्येक गोष्ट या तीनपैकी एका गुणाने नेहमी बद्ध असते आणि हे गुण आपसात बदलत राहतात. म्हणूनच साडेचार अब्ज वर्षांपूर्वी जी पृथ्वी केवळ आगीचा गोळा होती ती आज एक सुंदर ग्रह आहे आणि कदाचित उद्या पुन्हा तामसिक गुणात प्रवेश करेल तेव्हा आपण किंवा मानवता राहिलेले नसू. या प्रकृतीच्या बदलांमुळेच माकडाचा माणूस झाला, राजेशाही गेल्या आणि लोकशाही आल्या. प्रकृतीत क्षणाक्षणाला होणारे हे बदलच आयुष्याला अर्थ देतात. परमात्मा म्हणजेच ती सनातन निर्गुण निराकार शक्ती या गुणांची कर्ती आहे. आपण त्याच शक्तीचे जडत्व रूप म्हणून तुम्ही आम्ही आणि ही सृष्टी आत्ता दिसतेय. एक दिवस हे जडत्व सोडून जायचे आणि त्या अनादी अनंत शक्तिमध्ये विलीन व्हायचे हा मूळ अध्यात्मिक विचार आहे. हे करत असताना जेव्हा आपण या जडवादी म्हणजेच materialistic जगात राहत असतो तेव्हा आपसूक आपणही याच्या नियमाने वागतो. म्हणूनच भावनांच्या सागरात आयुष्य बुडून जातं. सुख दुःखाची जाणीव होते. आस्तिक असण्याचा अर्थ असतो की या सर्व भावनांच्या पलीकडे जाऊन त्या सनातन शक्तीला शरण जाण्याची भावना ठेवणे म्हणजे देवाला मानणे. मुळी तुमच्या मानण्या न माणण्यामुळे सनातन सत्य बदलणार नाहीये. नास्तिकांना केवळ इतकी जाणीव व्हावी की कधी गर्व तर कधी व्यापक विचार न करण्याची क्षमता यामुळे तुम्ही आज जरी नास्तिक असाल तरीही एक दिवस तुम्हाला नक्की समजेल. कारण कुणाच्या सांगण्याने तुमच्यावर प्रभाव होत नाही आणि उपरोक्त आध्यात्मिक अनुभूती साठी हे सर्वात जास्त गरजेचे आहे.

मग आस्तिकांनी दगडाची पूजा केली किंवा नमाज पढल्याने संकटं दूर होतात का? तर प्रार्थनेचा मूळ उद्देश हा संकटांमध्ये शक्ती आणि धैर्याचे अनुसरण करणे हा असतो. दुर्दैवाने जगातील जवळपास सर्वच धार्मिक प्रार्थना इतक्या भोळ्या भावाने होत नाहीत आणि कर्मयोगाच्या सिद्धांताप्रमाणे त्या फळाला येणे शक्यही नाही. “दे रे हरी खाटल्यावरी” असं होत नाही. गीतेचा तिसरा अध्याय कर्मयोग हेच सांगतो की कर्म करणे आपल्या हातात आहे. कर्म केलेच नाही तर फळ कसे मिळणार? कोरोनाच्या संकटावर काय असेल कर्म? तर काळजी घेणे आणि औषध शोधणे. निश्चित फळ मिळेल जर प्रयत्न सुरू असतील तर. दुसरं म्हणजे देव आहे तर मग माणसांवर संकटं का आणतोय? भोळ्यानो तो केवळ माणसाचा नाही, या सृष्टीचा कर्ता आहे. हा कोरोना व्हायरस सुद्धा एक जीवच आणि तो ही त्याचाच. तो व्हायरस त्याचं आयुष्य जगतोय जसे आपण. आपण आपलं आयुष्य जगत असताना वनस्पती आणि प्राण्यांना मारतो, खातो तसाच तो आपल्या शरीरातील पेशी खातोय. ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात एक ओवी आहे

“पार्था जयाचे ठायी, वैषम्याची परी नाही;

रिपुमित्रा दोन्ही, सरीसा पाडू!”

याचा अर्थ असा की देवाकडे वैषम्य म्हणजेच पक्षपात नाहीये. शत्रू, मित्र, उच्च, नीच, प्राणी, माणूस ग्रह-तारे सर्वजण त्याच्यासाठी समान. त्यात व्हायरस ची मानवाला लागण होणे हे मानवाच्या स्वार्थास हानिकारक आहे परंतु तो तर अनादी अनंत. त्याने प्रत्येकाला प्रत्येकाच्या वाटचे लढण्याचे गुण दिलेले आहेत. वाघाकडे हिंस्रपणा असेल तर मानवाकडे बुद्धी आहे. त्याच जोरावर तो आज विज्ञान जाणू शकलाय आणि त्याच विज्ञानाच्या जोरावर या संकटावर मात करणं अपेक्षित आहे. अंधश्रद्धा बाळगणं जसं चूक, तसंच माहीत नसताना शेखी मिरवणं सुद्धा चूकच.

देव आहे की नाही याचे उत्तर अध्यात्मात आहे. स्वतः अध्यात्मिक असल्यामुळे माझं मत म्हणणार नाही पण अनुभूती सांगायचा प्रयत्न केला. माणसाच्या जन्माला आल्यावर कर्मयोगी राहणं आणि कर्माने बद्ध न होणं हेच देवत्वाचं मूळ आहे मात्र अनेक भोळ्या भक्तांनी देवाचं अस्तित्व स्वार्थपुरतं केलं ज्याचा शतकानुशतके धर्मगुरूंनी फायदा उचलून अंधश्रद्धा वाढवल्या आणि देवाला भिणाऱ्या समाजाला निर्माण केलं आणि म्हणून तेवढ्या अंधश्रद्धाळू धार्मिक संकल्पना पटल्या नाहीत म्हणून तुम्ही लोक नास्तिक झालात. अध्यात्म तुमच्या अगदी जवळ आहे, उघड्या डोळ्यांनी बघा आणि जमलं तर अनुभवा!

Warm Regards,

Dnyanesh Make “The DPM”


0 Comments

Esha Writes..... · 22 March 2020 at 3:29 am

Throwing light on all the literature in your simple words!!!!
Beautiful😊💯

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *