नाशिकच्या दहीपूल भागातील मार्केट मध्ये फणसाचे गरे खाताना मागून नीलिमा येते. होय मी माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींना नावाने हाक मारतो. तर नीलिमा म्हणते “काय रे, तुझ्या हिरोईन ला घ्यायचं का नाही काही ?”

जून 2014 मधील हा प्रसंग. अचानक “एक व्हिलन”, “सिटीलाईट्स”, “2 स्टेट्स” हे तेव्हाचे गाजलेले अलबम ऐकत असताना काही प्रसंग आठवले 2014 मधले. ते सर्व प्रसंग पुढीलप्रमाणे.

मोठे भावजी समोर आहेत आणि विषय डायरेक्ट तिचा काढला जातोय. कपाळावर टेन्शन ने आठ्या जमा झाल्या. एकतर निलिमा ला कळलंच कसं की ती माझी गर्लफ्रेंड आहे आणि दुसरं म्हणजे तिच्यासाठी गिफ्ट घेण्यासाठी इनसिस्ट करतेय? मी काही म्हणायच्या आत निलिमाने आकाशी रंगांच्या झुमक्यांची जोडीच दिली माझ्या हातात. “लातूरला गेल्यावर दे तिला. आणि फोनवर, SMS वर जरा कमी बोलत जा, बारावी चाललीये तुझी. तसंही ही पोरगी फार काळ राहणारी नाहीये.”

Photo with Nilima

If only had I listened to her, पण ते म्हणतात ना, “प्रेमातुराणाम न भयम न लज्जा”, त्यात आणखी एक शब्द जोडला पाहिजे, ‘न ही विवेकम’! मी अर्थात तिला लातूरला गेल्यावर दयानंद कॉलेज च्या चार नंबर गेटवर ते झुमके दिले. तिच्याकडे बघून लक्षात यायला हवं होतं की प्रियकराच्या बहिणीने खास आपल्यासाठी काही भेटवस्तू दिली असेल तर त्याचा आनंद खूप जास्त व्हायला हवा होता जो तिच्या चेहऱ्यावर कुठेच दिसत नव्हता. ही बहुतेक मनातल्या मनात त्या झुमक्यांची अंदाजे किंमत तरी काढत असावी किंवा जाताना कुठे फेकून द्यायचे याची प्लॅनिंग करत असावी. असो, निलिमाचे शब्द दीड वर्षानंतर सिद्ध झाले.

तो नाशिक मधला तिसरा आणि शेवटचा दिवस होता. शाळेतल्या सहलींशिवाय कुठे जास्त फिरलेलो नव्हतो. शाळेच्या पहिल्याच सहलीत पाचवीला असताना 2008 मध्ये नाशिक पाहिलेलं. मात्र 2014 ची ती ट्रिप आजही खूप जास्त स्पेशल होती. मी, दोन्ही बहिणी आणि भावजी असे 4 जण गेलेलो. एक दिवस त्र्यंबकेश्वर, एक दिवस सोमेश्वर आणि एक दिवस नाशिक. भर जून महिन्यात, मोसमाच्या पहिल्या पावसाच्या हलक्या सरींमध्ये भिजलेलं नाशिक पाहिलं आणि आजवर मी त्या शहराच्या तितक्याच प्रेमात आहे.

Nashik Panchwati Photos

नाशकात मिसळ मी पुण्याच्या अगोदर खाल्ली आणि म्हणूनच की काय, मला पुण्यातल्या कुठल्याच मिसळीचं फारसं कौतुक नाही. कढीभेळ आणि भेळभत्ता नावाचे प्रकार असतात हे मला नाशकात गेल्यावरच समजलेलं. फस्ट यिअर नंतर युनिव्हर्सिटी चेंज करताना पुण्याऐवजी नाशिकला जावं असा विचार आलेला आणि तेव्हा नाशिकची आणखी एक चक्कर पडलेली. तेव्हा कॉलेज रोड, पंचवटी वगैरे परिसर अगदी धुंडाळून काढल्यासारखे हिंडलेलो. एकंदर तीन वेळेला नाशिक पाहून झालंय आणि आजवर आठवणी ताज्या आहेत.

आल्यानंतर कॉलेज ची पोस्ट Vaccation वाली परीक्षा होती. विशेष अभ्यास नसतानाही परफॉर्मन्स चांगला राहिला. आठवणींच्या या खजिन्यात या काळात कॉलेज, सिपीटी बॅच, मनीषा मॅडम ची गणिताची ट्यूशन आणि जाधव सरांची अकौंटस ची ट्युशन अश्या पॅक शेड्युल मध्ये चाललेली माझी लव्ह स्टोरी. म्हणायला लव्ह स्टोरी पण as good as one sided. तिला माझ्याबद्दल कधीच काही वाटलं नव्हतं. बारावीच्या अभ्यासाचे तर तिने बहाणे सांगूच नयेत. मी फुल ऑन कमिटेड असताना, चालू वर्गात SMS वर चॅटिंग करत असताना आणि थिएटर ला एकामागे एक सिनेमे पाहण्यात मश्गुल असताना सुद्धा शेवटी तिच्यापेक्षा थोडेथोडके नाही तर 11 टक्के जास्त घेतले आणि मेरिट लिस्ट मध्ये आलेलो सुद्धा. मला 86% तर तिला 75%. उलट कमिटेड असती तर कदाचित दोघेही मेरिट लिस्ट मध्ये टॉप वर असतो.

त्या काळात एक मैत्रीण सुद्धा होती जिच्यासोबत मित्रांनी उगाच, म्हणजे अगदी विनाकारण माझी जोडी जमवलेली होती. ती मुलगी वर्गात इतर मुलांना फारशी बोलायची नाही म्हणून कदाचित पोरांना असला आगाऊपणा सुचत असावा. ती माझ्या आयुष्यातील अत्यन्त चांगल्या मैत्रिणींपैकी एक होती. आता कुठे आहे तिलाच माहीत. असंच होतं. काही नाती, काही मैत्री अगदी काही काळापूरत्या टिकतात आणि एक चांगली आठवण देऊन जातात. झम्पे, मिस यु बडी!

याच दरम्यान परभणीहुन “लातूरला दयानंद मध्येच ऍडमिशन घ्यायचं आणि कॉमर्सलाच घ्यायचं ज्ञानेश सारखं” असं म्हणत नेमकाच दहावी पास झालेला मावस भाऊ मंदार आला. माझे परभणी मध्ये नातेवाईक फार आणि मंदार काही लांबचा नव्हता मात्र लहानपणी इतका कधी संबंध म्हणावा तितका आला नव्हता. मंदार आयुष्यात आला, आज अक्षरशः आम्ही सख्या भावांप्रमाणे क्लोज आहोत. रिलेशन ओव्हर द पिरियड कसं डेव्हलप होतं याचं मूर्तिमंत उदाहरण आहोत मी आणि मंदार.

Me and Mandar

जून महिना गेला. जुलै महिन्यात मंदारचं देखील अकरावीचं कॉलेज सुरू झालं. पहिल्यांदा घराबाहेर राहत होता, पहिल्या आठवड्यानंतर दोन तीन दिवस सुटी काढून घरी गेला. 11 जुलै ला बहुप्रतिक्षित “लई भारी” रिलीज झाला. रितेशमुळे लातूरमध्ये काय हाईप असेल याचा तर अंदाजच लावावा. कॉलेज बुडवून, प्रोफेसर्सना तोंडावर खोटं बोलून 3 मित्रांसोबत मी थिएटर ला लई भारी बघायला गेलो. एकूणच 120 जणांच्या डिव्हिजन मध्ये अर्धे पोरं-पोरी एकाच दिवशी गायब होते हा खूप मोठा कन्सर्ण झाला आणि न विचारता absent राहणाऱ्यांच्या घरी फोन केले गेले. I made a narrow escape. मुळात अकरावी-बारावीला कॉलेज लाईफ नसतेच, ती दोन वर्गांची एकप्रकारे शाळाच असते.

photos collage

तरीही इंटर्व्हल नंतर दुपारी 3-4 वाजताचे गणिताचे तास बुडवून क्रिकेट खेळायला जायचा प्रकार करायचेच आमचे पोरं. बरेच वेळेला मी, नंदू जैस्वाल आणि दादूस लोहार तिघे नंद्याच्या बेकरीवर बसायचो. बारावी म्हणावं तितकं वाईटही गेलं नाही आणि म्हणावं तितकं हॅप्पनिंगही नाही.

पुढेही बारीकसारीक घडामोडी घडतच गेल्या. ऑगस्ट मध्ये फ्रेंडशिप डे फार मोठा सेलिब्रेट झाला, सप्टेंबर मध्ये शिक्षकदिनाचं मी सूत्रसंचालन केलं, Verve 2014 मध्ये जाहिरातींच्या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक पटकावलं. ऑक्टोबर मध्ये ‘यारों का यार’ असं स्वतःला समजणारा “वैभ्या” भेटला. ऑक्टोबरमध्येच वडिलांनी गाडी घेऊन दिली. नोव्हेम्बर मध्ये फारसं काही विशेष झालं नाही मात्र डिसेंम्बर मध्ये आयुष्यातला पहिला व एकमेव असा प्रसंग घडला जो व्हायला तर नको होता मात्र झालाच. असो, यात काही विशेष नसतं!

2014 मध्ये थिएटर ला मुव्हीज पाहणे हा माझा छंदच होऊन गेलेला. 2 स्टेट्स, रेगे, खूबसुरत वगैरे तर मी एकट्याने जाऊन पाहिले होते. माझं बारावीचं वर्ष असताना अथर्व, जो या साईटचा मूळ कर्ताधरता आहे, त्याचं दहावीचं वर्ष होतं. अत्यंत पुस्तकी किडा होता हा प्राणी, त्यालासुद्धा 15 ऑगस्ट च्या दिवशी बाहेर काढून सिंघम रिटर्न्स बघायला नेलेलं. 2014 मध्ये मी एकूण 13 चित्रपट थिएटर ला पाहिले होते.

घरच्यांचा ओरडा, शिक्षकांच्या तक्रारी, मित्रांसोबत मजामस्ती, अधूनमधून दगाफटका, गर्लफ्रेंडचं दुर्लक्ष, सातत्यहीन अभ्यास आणि तरीही दर परीक्षेत डिव्हिजन टॉप मारण्याचा आनंद, भावनांचे मोठमोठे हेलकावे आणि इगोचे पालनपोषण या सर्वांनी भरून गेलेलं 2014 चं वर्ष आयुष्यातील एका मोठ्या स्वप्नासारखं भासतं आता. आठवतं तर सगळंच, फक्त खरं वाटत नाही झालेलं काहीच…!

Warm Regards,

Dnyanesh Make “The DPM”

Categories: Personal

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *