पुण्यातील उपरे!

साधारण अडीच वर्षांपूर्वी पुणं सोडून लातुरात वापस आलो होतो. आज वापस पुण्यात आलोय. करिअर, आयुष्य सर्वच पुण्यात निघावं वाटतं इतकं पुणं सुंदर आहेच. मी एकटा नाही जो मराठवाड्यातून येऊन पुण्यात स्थायिक होण्याची स्वप्ने बघतोय, माझ्याआधी किमान आठ दहा लाख लोक तरी हे गेल्या तीन दशकांत करून बसलेत आणि आज पुणेकर झालेत. मात्र या सगळ्यात एक गोष्ट व्यक्तीगतरीत्या मनाला फार लागते ती म्हणजे “प्रॉपर” पुणेकरांचं मराठवाड्यातील लोकांना किंवा एकंदरच पुण्याबाहेरून आलेल्या सर्व विस्थापितांना पावलोपावली पाण्यात पाहणं. हां आता त्याने आम्हाला फार फरक पडतो अशातला भाग नाही; मात्र हा एक मोठा, कमी बोलला जाणारा एक सांस्कृतिक वाद आहे आणि त्यावर आज मी उघडपणे आणि परखडपणे बोलणार आहे. आणि यासाठी पुणेकर आणि पुणेत्तर या दोन्ही बाजूंच्या मतांना इथे मी प्राधान्य देईन आणि दोन्ही बाजूंवर टीका करेन, त्यामुळे कुठल्याही बाजूने मला पक्षपाती समजू नये.

पुणेकरांची बाजू

कधी काळी ज्या पेठा पुण्याची व्हीन्टेज शान होत्या आज तिथे विदर्भ-मराठवाड्यातून आलेले विद्यार्थी, छोटे व्यावसायिक रस्ता अडवून बसलेत. कर्वेनगर तर पूर्णपणे बाहेरील विद्यार्थ्यांनी गजबजलेलं असतं (कोरोनापूर्वी तरी असायचं आणि कोरोनानंतरही असेल). बाहेरून नोकरी करणारे विविध कंपन्यांचे कर्मचारी असो किंवा जंगली महाराज रोड वरील डोसा-पराठा च्या हातगाडीवाले छोटे व्यावसायिक असो, हे सगळे पुण्याच्या बाहेरून आलेले लोकच असतात. मग त्रास का होतो या सर्वांचा? तर हे समजून घेणं गरजेचं आहे की पुण्यामध्ये रहदारीचा प्रॉब्लेम बाहेरच्यांच्या येण्यामुळेच वाढलाय. पेठांच्या छोट्याश्या गल्ल्यांमधून शॉर्टकट काढत जे दुचाकीस्वार जातात त्याचा स्थानिकांना रोज किती त्रास होत असेल याची कल्पना केलीये? पेठांमधील “प्रॉपर”  पुणेकरांमध्ये वृद्ध लोक मोठ्या प्रमाणावर राहतात. त्यांना या रहदारीचा त्रास होतो. या वृद्ध मंडळींनी आयुष्यभराची कमाई घालवून घेतलेले फ्लॅट्स बाहेरील मंडळी भाड्याने घेऊन राहतात आणि अनेक उदाहरणं मी स्वतः डोळ्यांनी पाहिलीयेत की बाहेरून येणारे बॅचलर्स या फ्लॅट ची काय अवस्था करतात, बऱ्याच प्रमाणात त्यांचा सोसायटी वाल्याना कसा त्रास होतो वगैरे. अगदी प्रामाणिकपणे त्या सर्व बॅचलर मुला-मुलींनी सांगावं की तुमच्या स्वतःच्या घरी किरायदारांनी दारू प्यायलेली तुम्ही खपवून घ्याल का? मग इथे भाड्याने राहताय, थोडं स्वातंत्र्य मिळतंय तर मग दुसऱ्यांच्या घरी त्यांची परवानगी नसताना असले उद्योग करणं तुम्हाला तरी पटतं का? हे असे उडाणटप्पू बॅचलर्स इतरांच्या तुलनेत संख्येने कमी असले तरीही, काय म्हणून पुणेकरांनी बाकीच्यांवर तरी विश्वास ठेवावा? ज्या सोसायट्यांमध्ये हे सगळं चालतं तिथलं भाडं परवडत नसेल तर एक तर करू नका असलं काही किंवा तेवढं कमवायला तरी लागा जेणेकरून तुमच्या शानशौकीचा तुमच्या घरमालकास काही प्रॉब्लेम नसेल.

या व्यतिरिक्त सततच्या वाढत्या स्थलांतराने पुण्याच्या संसाधनांवर ताण येतोय. सहज म्हणून कधी पहाटे साडेपाच ते साडेसात च्या दरम्यान स्वारगेट चौकात उभे राहून बघा, एकट्या लातूर वरून किमान 50 ट्रॅव्हल्स बसेस रोज येतात, अगदी याही काळात; उर्वरित मराठवाडा आणि विदर्भाचं तर आणखी नाव पण नाही घेतलं मी. पहिल्या लॉकडाऊन च्या अगोदर जे लोक पुण्याहून वापस गावी गेले त्यांना त्यांच्या गावकऱ्यांनी तरी कितपत आपुलकी दाखवली होती ते अनेकांनी डोळ्यांनी पाहिलंय. मग इतक्या संख्येने जर बाहेरील लोक पुण्यात येत असतील तर वाढती रहदारी, प्रदूषण, इथल्या मूलभूत सुविधांवर येणारा ताण या सर्वांसाठी बाहेरून स्थलांतरित होणारे लोक जबाबदार नाहीत का? इथले प्रॉपर्टी रेट्स आभाळ फाडून गेलेत त्यासाठी ही स्थलांतरित लोकांची वाढलेली डिमांड कारणीभूत नाही का? पुणं विकसित आहे आणि तुमचं गाव नाही यामध्ये पुणेकरांची काय चूक? असे अनेक खरेखुरे प्रश्न पुणेकरांच्या मनात असतात मात्र तिरकस बोलण्याव्यतिरिक्त पुणेकरांनी आजवर काही विशेष केलं नाही, एकप्रकारे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागतच केलं आणि संधी दिल्या इथे समृध्द होण्यासाठी.

पुणेत्तरांची बाजू

मुळी बाहेरचे म्हणजे नक्की कुठले हाच पहिला प्रश्न. कारण आजचे पुणेकर तरी कुठले मूळचे, पिढ्यांचे पुणेकर होते? पुण्याला घडवलं, ओळख बनवलं, विकसित केलं ते बाहेरच्याच लोकांनी. आदिलशाहीने गाढवाचा नांगर फिरवलेल्या पुनवडीला पुण्य नगरी बनवलं सर्वप्रथम कुणी? तर सिंदखेडराजा, विदर्भातून आलेल्या राजमाता जिजाऊंनी! याच मातेने जो पुत्र दिला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा इतिहासाची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली आणि स्वराज्याचा विस्तार केला. मूळचे कोकणी असणाऱ्या पेशव्यांनी ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी पासून ते सातही वारांच्या पेठा, शनिवारवाडा पासून ते कधीही न विसरता येणारा जाज्वल्य राजकीय इतिहास पुण्याला बहाल केला; देशाच्या इतिहासात किमान एकदातरी पुणे शहर जवळजवळ सगळ्या देशाचं राजकीय केंद्रबिंदू बनलं. मूळचे कोकणी असणारे लोकमान्य टिळक असोत, गोपाळ कृष्ण गोखले असोत, साताऱ्याहून आलेले आगरकर असोत किंवा मुंबईचा जन्म असणारे, पुण्यात जन्म घातलेले आणि पुण्याला सांस्कृतिक विकासाचं शिखर गाठून देणारे पु ल देशपांडे असोत, ही सर्वच्या सर्व मंडळी आजच्या पुणेकरांच्या भाषेत बाहेरचीच होतात आणि याच लोकांचा जाज्वल्य अभिमान असल्याशिवाय तुम्हाला आज पुणेकर म्हणवून सुद्धा घेता येत नाही. मग बाहेरचे बाहेरचे म्हणता तरी कुणाला? जे तुमचं सर्वात मूळ दुखणं असतं पुण्याच्या सांस्कृतिक वारश्याला बाहेरच्यांच्या येण्यामुळे गालबोट लागण्याचं, त्या एका गैरसमजाच्या वर्मी घाव आहे हा. काय फरक पडतो पण तुमच्या ओरडण्याने? पुणे-पिंपरी चिंचवड मिळून आज लोकसंख्या एखाद्या कोटीच्या घरात आहे, त्यातले 25 लाख तरी मूळचे “प्रॉपर” पुणेकर असतील का? तरीही सर्वजण पुणेकर आहेत ना? तुम्ही किंवा तुमचे पूर्वज सुद्धा कधीकाळी असेच बाहेरून आलेत आणि पुण्याला समृद्ध बनवलंत.  कोरोना आला आणि अर्ध्याहून अधिक बाहेरची मंडळी निघून गेली, तर मोकळे रस्ते बघून तुम्ही खुश झालात पण तुमच्या घरी कामाला येणाऱ्या बाईपासून ते पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वत्र तुटवडा होता तृतीय श्रेणी कामगारांचा. विदर्भ-मराठवाड्यातील दुष्काळाची, अविकसिततेची किंवा तुलनेने कमी विकसित असण्याची अगतिकता या लोकांना इथे घेऊन येते आणि म्हणून तुमची सोय होते. विद्यार्थी सोडून गेले तर तुमचे फ्लॅट्स रिकामे पडले, भाडं यायचं बंद झालं. मेस बंद पडल्या, क्लासेस बंद पडले, कंपन्यांमध्ये कामाला लोक नाहीत आणि बघता बघता अनेक टोमणे मारणाऱ्या प्रॉपर पुणेकरांचे, थोडं स्पष्टच बोलतोय, पण धंदे बसले. बाहेरच्यांना शिव्या घालणं, पाण्यात पाहणं सगळं ठीक, पण बाहेरच्यांशिवाय तुमची अर्थव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी ढासळते याची प्रचिती तर आली ना हो पुणेकरांनो? अनेक वेळेला असं लक्षात आलंय की हा दुजाभाव केवळ विदर्भ-मराठवाड्याकरिता असतो. रोख फक्त विदर्भ- मराठवाड्यावर यासाठी कारण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तर तुमच्यातील अनेकांची स्वतःची मूळ गावं आहेत. मग तिकडून तुम्ही, तुमचे सगेसोयरे आलेले चालतात तर विदर्भ-मराठवाड्याने काय घोडं मारलंय? थोड्या वेगळ्या, ज्याला तुम्ही गावठी समजता, अशा शैलीची का होईना पण आम्हीही मराठीच बोलतो ना? तुमचं बोललेलं आम्हाला कळतं, आमचं तुम्हाला मग आम्ही तुमच्यासारखं शुद्ध मराठी नाही बोललं तर त्याने तुमच्या भाषा संस्कृतीवर थोडीच परिणाम होणार आहे? शेवटी बोलत तर सर्वजण मराठीच आहोत ना? तुळजापूर पासून ते अंबाजोगाई पर्यंत तुमची दैवतं मराठवाड्यात आहेत, आणि मराठवाड्यातील अनेकांची जेजुरीचा खंडोबा, कोल्हापूरची अंबाबाई. हे नातं जुनं आहे, देवानं घालून दिलेलं आहे, मग विदर्भ-मराठवाडा परके कसे?

पूर्वीचं पुणं राहिलं नाही हे तुमच्या एकट्याचं दुखणं नाहीये, जगातील जवळजवळ प्रत्येक मोठ्या शहराची तीच अवस्था आहे. इमिग्रेशन क्रायसिस चा काय प्रॉब्लेम असतो ते युरोपियन शहरांमध्ये आयुष्य गेलेल्या लोकांना विचारा, तुमच्यासाठी बाहेरचे असणारे तरीही महाराष्ट्रातलेच लोक आहेत, परदेशातील नाही. आणि शेवटचं, कर्म कुणाला चुकत नाही म्हणतात. तुम्ही बाहेरचे म्हणून इतरांना पाण्यात पाहता, तुमची मुलं परदेशात गेल्यावर त्यांनाही तीच वागणूक मिळते मग!

उपाय काय?

देशासमोर आणि जगासमोर काही अत्यन्त ज्वलंत समस्या आहेत, त्यातली सर्वात मोठी पर्यावरण आणि लोकसंख्येची वाढ. हीच समस्या दुष्काळास आणि पर्यायाने स्थलांतरास कारणीभूत आहे. त्यामुळे विदर्भ – मराठवाड्यात सध्या विकास सुरू असला तरीही पुण्याला येणारांचं प्रमाण बंद तर होणार नाही. गरज आहे ती नियोजनाची. पुण्याच्या प्रशासनाने काही गोष्टी मनावर घेऊन अवैध स्थलांतर रोखलं पाहिजे, शहराचं योग्य नियोजन केलं पाहिजे आणि पायाभूत सुविधा जसं की मेट्रो, रिंग रोड, पाणी, रस्ते यांच्यावर अधिक भर देऊन पुण्याच्या समस्यांचं कायमस्वरूपी समाधान काढलं पाहिजे, जेणेकरून भविष्यातील स्थलांतरांना पुणे झेलू शकेल. या सर्व समस्यांसाठी चालू असलेल्या उपाययोजना ज्या कासवगतीने सुरू आहेत ते पाहता समस्या मोठी आणि समाधान छोटंच राहणार आहे.

विदर्भ-मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नेतेमंडळींनी स्थानिक विकासावर भर दिला तर आपसूक ही स्थलांतरं बरीच कमी होतील. चांगली विद्यापीठे, औद्योगिकीकरण, सिंचन पुरवठा या दोन तीन गोष्टींवरच अर्ध्या समस्यांचं निराकरण होऊ शकतं. तरीही पुण्याला येण्यापासून अडवलं कुणीही नाहीये, फक्त इथे येऊन जाणीवपूर्वक त्रास होऊ नये याची दक्षता घेतली तर नक्कीच चांगलय आणि अर्थात इथे येऊन, इथे समृद्ध होऊन पुणेकरांनाच नावं ठेवणं जर सोडलं तर पुणेकर सुद्धा बाहेरच्यांना पाण्यात पाहणं सोडतीलच अशी अपेक्षा करू.

विदर्भ-मराठवाडा किंवा एकंदरच उर्वरित महाराष्ट्रातील विस्थापितांना पाण्यात न पाहता जर पुण्यात लपलेले बांग्लादेशी घुसखोर बाहेर काढण्यावर पुणेकरांनी जोर लावला तर अधिक चांगलं होईल. पुण्याची ओळख आणि सांस्कृतिक समृद्धी आपलं समजून सर्वांनी जपुया आणि पुण्याचं सौंदर्य अबाधित राखुया.

आणि हो, “ण” आणि “न”, “भेटलं” आणि “मिळालं” मधला फरक आम्ही लक्षात घेऊ, चार-दोन आमचेही शब्द ‘बायजेवार’ रुजू द्या की इकडे!

Warm Regards,

Dnyanesh Make “The DPM”

Categories: Social

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *