मनाला चटका लावुन जाणारी एक्झीट….

तो आला, त्याने पाहिलं, तो लढला, त्याने सर्वांना जिंकून घेतलं आणि तो अचानक निघून ही गेला. त्याचं हे अनपेक्षित पणे जाणं खरंच मनाला चटका लावून गेल. कोण तो? तर तो आपल्या लातूरचा एक हरहुन्नरी कलाकार, साईकेदार बोधनकर. आपल्या YouTube channel  मार्फत खूप कमी वेळात घराघरात पोहोचला. चॅनल ची पूर्ण धुरा एकहाती सांभाळून त्याने अगदी कमी कालावधीत लोकप्रियता गाठली, आणि हे सगळं त्याने केलं ते अगदी स्वतःच्या कौशल्यांच्या जोरावर, कोणाच्या ही मदतीशिवाय. चॅनल साठी च फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, एडिटिंग, मिक्सिंग आणि तांत्रिक बाजू  हे सगळं तो एकटा सांभाळायचा ते ही अगदी चोख. तसेच गायन आणि वादन कलेत ही तो पारंगत. तबला, हार्मोनियम, गिटार ही सगळी वाद्य वाजविण्यात त्याचा हातखंडा. पोहणे आणि पाककला यात ही तो निपुण, अगदी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. एवढंच नाही तर त्याने जिद्दीने एम.ए इंग्लिश ची पदवी  तसेच संगीतातील विशारद ही पदवी देखील मिळवली. आणि हे सगळं केलं ते अगदी कोणाच्या ही आर्थिक पाठबळाशिवाय, स्वतःचे गाण्याचे कार्यक्रम आणि शिकवणीतून.

      एखाद्या लाटेवर स्वार व्हावे तसे आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांचा आनंद लुटत बेभानपणे जगणारा,धाडसी मनमोकळा, आपल्या प्रेमळ स्वभावाने क्षणात आपलसं करणारा, प्रत्येक आईला वाटावा की असा मुलगा असावा, प्रत्येक बहिणीला वाटावे की असा भाऊ असावा ,सगळ्यांच्या गळ्यातील ताईत असलेला तो असा आपल्या जीवनावर रुसून स्वतःचा जीव संपवेल असा कोणाच्या ध्यानी मनी ही नाही आलं.

    संघर्ष हा काय त्याच्यासाठी नवीन शब्द नव्हता , लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले म्हणून आईच्या आणि बहिणींच्या संगोपनात तो लहानाचा मोठा झाला, त्यामुळे एकंदरच परिस्थितीची जाणीव त्याला होती  आणि मुळातच कोंड्याचा मांडा करण्यासारखा धडपडा स्वभाव आणि आयुष्याच्या शाळेने शिकवलेली दुनियादारी याच्या जोरावर तो आपली स्वप्नं पूर्ण करू पाहत होता, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि तो सर्व काही सोडून एका वेगळ्याच प्रवासाला निघाला, जिथून तो परत कधीच नाही येणार.

       आत्महत्या करणं कितपत योग्य आहे हे मला नाही माहिती परंतु त्याच्यासारख्या वरकरणी सतत हसतखेळत, आनंदी  असणाऱ्या मुलाने असे करणे हे अगदी अनपेक्षित होतं. या घटनेवरून एक मुद्दा अधोरेखित करावासा वाटतो, की समजा आपल्याला कुठला शारीरिक आजार झाला, साधा ताप किंवा सर्दी जरी झाली, तर आपण त्याबद्दल बोलतो, किंवा काही उपाय करतो तेच जर आपलं मन ठीक नाहिये, कुठली गोष्ट आपल्याला त्रास देत आहे, तर त्याबद्दल आपण तेवढ्या सहजतेने का नाही बोलू शकत? का आपण त्याच्या वर  काही उपाय नाही शोधत ? खरतर मानसिक आरोग्य हा आपल्या आरोग्याचा अविभाज्य घटक आहे, परंतु का आपण त्याला इतकं कमी लेखतो की साधी त्याची दखल ही घ्यावीशी वाटत नाही. कुठलीच समस्या आपल्या आयुष्या पेक्षा नक्कीच मोठी नसते आणि समस्यांवर तोडगा निघतोच फक्त त्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, अगदी कोणाशीही आपले आई वडील, भावंडं, मित्र मैत्रिणी, या सर्वांशी  बोलावंसं नाही वाटलं तर एखाद्या समुपदेशकाची मदत आपण नक्कीच घेऊ शकतो. समुपदेशन घेणं यात काहीच चूक नाहीये, जर ते केल्याने समस्या सुटणार असतील तर त्यात कसलाच कमीपणा नाहीये. केवळ लोक काय म्हणतील या भीतीने जर आपण ते करणं टाळत असू, तर ते चूक आहे. जाणारा व्यक्ती एकटाच जात नसतो तर त्याच्यासोबत त्याच्या पूर्ण कुटुंबाची, हितचिंतकांची, मित्र मैत्रिणी या सर्वांची आयुष्याची घडी विस्कळीत होते. त्यामुळे असा काही विचार करण्या आधी आपल्या कुटुंबियांचा, आप्तस्वकीयांचा नक्की विचार करा.

   साईकेदार  बोधनकर यास भावपूर्ण श्रद्धांजली. त्याच्या जाण्याने एक चांगला माणूस, अवलिया कलाकार, सच्चा मित्र आणि सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व गमावल्याची खंत नक्कीच राहील.

साभार,

सौ. तनुजा जोशी-कोहणे

P.S.

Please visit Late. Saikedar’s Youtube Channel

https://youtube.com/c/SaikedarBodhankar


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *