Disclaimer – सदरील ब्लॉग मध्ये कुठल्याही धर्माच्या भावना दुखावण्याचा उद्देश नाही. यात केलेली टीका ही त्या व्यक्तींवर असून त्यांच्या धर्मावर, किंवा त्यांच्या धर्मातील लोकांवर अजिबात नाही याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
हैदराबाद मुक्तीसंग्राम
आजच्या भारतीयांना इतिहासात झालेल्या बऱ्याचशा गोष्टींची किंमत नाही. जसं की देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी किती रक्ताचे पाट वाहिलेत याची नेमकी जाण तर नाहीच, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा पुढचे 13 महिने आपल्याच देशातील एक मोठा भाग पारतंत्र्यात, जुलूमात व अत्याचारात धुमसत होता याची साधी आठवण देखील नाही.
मुळी स्वातंत्र्य आपण घेतलं की आपल्याला शिळ्या भाकरीचे तुकडे टाकावे तसं ब्रिटिशांनी दिलं हा प्रश्न पडतो. दुसऱ्या महायुद्धानंतर एरव्हीच ब्रिटिश राजसत्तेकडे पैसा राहिला नव्हता. सैन्याचं म्हणाल तर त्यांच्या सैन्यात अर्ध्याहून अधिक तर भारतीय सैनिक. दुसऱ्या महायुद्धानंतर देशातील चले जाव, छोडो भारत सारखी आंदोलनं आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची बातमी येताच सैन्यातील असंतोष वाढला होता. यासह अनेक कारणांमुळे ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिलं, पण ते देताना परत काड्या केल्याच. त्यांनी सर्व संस्थानांना स्वातंत्र्य देऊन टाकलं व त्यांना होऊ घातलेल्या नवीन भारतात, किंवा पाकिस्तानात जाण्याचा किंवा स्वतंत्र देश बनवण्याचा अधिकार दिला. ही सगळी संस्थान जवळपास 565 इतकी होती.
सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्र भारताचे गृहमंत्री झाले व त्यांनी अत्यन्त मुत्सद्देगिरीने एक एक संस्थान भारतात विलीन करून घेतलं. गुजरात मधील जुनागड, काश्मीर आणि हैदराबाद ही तीन संस्थानं मात्र नकार देत होती.
त्यातलं हैदराबाद संस्थान म्हणजे जरा कन्सरनिंग इश्यू झाला. हिंदू बहुल प्रदेश असणाऱ्या या संस्थानावर मीर उस्मान हा मुस्लिम निजाम शासन करत होता. या निजामाने मोहम्मद अली जिन्नास पाकिस्तान च्या निर्मितीसाठी प्रचंड आर्थिक मदत केलेली. त्यामुळे पाकिस्तानच्या निर्मितीसोबतच निजामास आपणही एक वेगळं राष्ट्र निर्माण करावं अशी महत्त्वाकांक्षा वाटू लागली. सुरुवातीला पाकिस्तानात जायचे मनसुबे होते मात्र हे शक्य न झाल्याने निजामास वेगळा देश बनवण्याचे डोहाळे लागले. पण या प्रांतामधील बहुतांश जनता, विशेषतः हिंदू जनता याच्या साफ विरोधात होती. तेव्हा निजाम मीर उस्मान अली खानने कासीम रिझवीच्या हस्ते रझाकार या अर्धसैनिक दलाची स्थापना केली. हे रझाकार हिंदूंवर अनन्वित अत्याचार करीत. तत्कालीन संदर्भानुसार हे अत्याचार हिटलर च्या नाझी सैन्याने ज्यू लोकांवर केलेल्या अत्याचारांइतकेच क्रूर होते. एवढेच नाही, तर निजाम स्वतंत्र देशाची मागणी व त्या मागणीस पन्नास एक देशांची मान्यता घेऊन यूएन मध्ये सुद्धा गेला होता. थोडक्यात वेगळा देश बनवण्याची पुरेपूर तयारी झाली होती.
इकडे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली समस्त हैद्राबाद संस्थानातील अनेक स्वातंत्र्यसैनिक एकत्र आले. रझाकरांच्या विरोधात सुरुवातीला अहिंसक व नंतर सशस्त्र लढे झाले. अनेक ठिकाणी दंगली झाल्या व निष्पाप लोकांचे, विशेषतः निष्पाप हिंदूंचे बळी गेले. सरदार पटेलांनी अनेकवेळा निजामाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र निजाम स्वतंत्र देश बनवण्यावर आणि स्वतः च्याच जनतेवर अत्याचार करण्यावर ठाम होता. अखेर 13 सप्टेंबर 1948 रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी सदर्न कमांड चे लेफ्टनंट जनरल एरीक गोद्दर्ड, जनरल राजेंद्रसिंह, व जनरल जयंतो चौधरी यांच्या नेतृत्वात ऑपरेशन पोलो सुरू केले. या अंतर्गत विजयवाडा व सोलापूर हुन भारतीय सैन्य हैद्राबाद प्रांतात थेट घुसले. जागोजागी सैन्याच्या छोट्या छोट्या तुकड्या निजाम सैन्य व रझाकरांची धूळधाण उडवत त्यांना हरवत गेले. 17 सप्टेंबर 1948 रोजी अगदी परवापर्यंत वेगळा देश बनवतो म्हणणारा, आशियातील त्यावेळचा सर्वात श्रीमंत संस्थानिक असणारा निजाम मीर उस्मान अली खान गुडघ्यावर आला आणि त्याने शरणागती पत्करली. इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन आणि मर्जर वर सही करून त्याने हैद्राबाद संस्थान भारतात विलीन केले.
या हैद्राबाद संस्थानात आजच्या महाराष्ट्रात असणारा मराठवाडा किमान 3 शतकांपासून पूर्णपणे विलीन होता. त्यापूर्वी केवळ देवगिरीच्या यादवांच्या काळातच काय तो मराठवाडा महाराष्ट्रसोबत होता. हैद्राबाद मुक्तीसंग्रामात मराठवाड्यातील जनतेने काय काय सोसलय याचं बाकीच्यांना सोडा, खुद्द मराठवाड्यातील जनतेलाच फारसं सोयरसुतक नाहीये.
1857 च्या उठावानंतर इंग्रजांनी सर्व संस्थानं राजसत्तेत विलीन करून घेतली होती. हैदराबाद च्या निजामास मात्र बऱ्यापैकी स्वायत्तता दिली होती. थोडक्यात डोमिनियन स्टेट. निजमाचीही हेड ऑफ स्टेट शेवटी इंग्लन्ड ची राणी. केवळ शासन करण्याचा अधिकार होता. निजाम राजवट ही ब्रिटिश राजवतीपेक्षा कमी जुलमी नव्हती. मुळात हैदराबाद प्रांतात काँग्रेस ची स्थापना होण्यापूर्वीच त्याने बंदी घातलेली. म्हणजे देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि पर्यायाने होऊ घातलेल्या नव्या भारतात सामील होण्यात निजामास पूर्वीदेखील स्वारस्य नव्हते. इंग्रजांविरोधात बंड करायला निदान राष्ट्रीय पातळीवर लोकमान्य टिळकांपासून ते भगतसिंह, गांधीजींपर्यंत देशात नेते सक्रिय तरी होते. हैद्राबाद प्रांतात मुक्तीसंग्रामाचे गांधी असणारे स्वामी रामानंद तीर्थ यांना अगदी सुरुवातीलाच अटक झाली व त्यानंतर त्यांनी सुटका झाल्यावर पुढचं सगळं स्वातंत्र्यलढ्याचं कार्य भूमिगत राहूनच केलं. हे कमी म्हणून की काय, 1936 पर्यन्त तर खुद्द गांधीजींचा हैदराबाद प्रांतात काँग्रेस स्थापनेला विरोध होता. त्यानंतर मात्र निजामाच्या जुलमी राजवटीचे एक दोन किस्से कानी येताच त्यांनी हैद्राबाद काँग्रेस स्थापणेस मंजुरी दिली. मीर उस्मान च्या अगोदरचे निजाम तरी बरे होते. उस्मानच्या काळात तलाठी-कारकुनांपासून ते मंत्रिमंडळापर्यन्त सर्वत्र केवळ मुस्लिम लोकांची भरती केली. सर्वत्र उर्दू भाषेची सक्ती केली. हैद्राबाद प्रांतात आजचा मराठवाडा, कर्नाटकातील काही जिल्हे व जवळपास सर्वच्या सर्व तेलंगणा एवढा भाग येत होता. इथे कुठेच लोक हिंदी किंवा उर्दू बोलत नसत. म्हणजे ठरवून इथल्या बहुतांश जनतेला, आणि विशेषतः हिंदू जनतेला सुरुवातीला तर शिक्षणापासूनच वंचित ठेवणे आणि उर्दू शिक्षण एखाद्याने घेतलं जरी, तरीही नागरिकांना हिंदू म्हणून दुय्यम दर्जाची वागणूक देणे हे या मीर उस्मानचे कर्तृत्व. ही दुय्यम वागणूक पुढे चालून जुलूमात व अत्याचारात बदलली. इतकी धर्मांधता निजाम राजवटीत अगोदर नव्हती. जी तत्कालीन धर्माधिष्टीत शासनव्यवस्था होती त्यात अगदी नगण्य दखल असायची निजामाची. बहुतांश वेळा निजाम हा केवळ सत्तेत राहण्याचा प्रयत्न करीत असे आणि नियमितपणे इंग्रजांची सेवा सुद्धा करत असे. मग ही जिंनाची लागण त्याला कशी झाली? इस्लामिक देश हवा म्हणून अखा पाकिस्तान बनवणारा जिंना एकेकाळी नास्तिक होता म्हणे. मग ही धर्मांधतेची लागण त्याला आणि त्याच्याकरवी निजामाला झाली तरी कशी हा मोठा प्रश्नय.
मूळचा लखनऊ चा असणारा, अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून वकिली शिकून लातूरला आलेला व नंतर मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन करवी राजकारणात उतरलेला कासीम रझवी बऱ्याच अंशी मुक्तीसंग्रामात झालेल्या कत्तली व अत्याचारांना जबाबदार आहे. निजाम दरबारी मानपान वाढताच रझाकार आर्मीची स्थापना करवून घेऊन त्याने त्याचे दहशतवादी विचार आचरणात आणले. संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर स्वतः पाकिस्तानात पळून गेला व उरलेलं आयुष्य तिथेच काढून तो मेला. हैदराबाद चा निजाम कदाचित अटी शर्तींवर ऐकला असता तर एवढा रक्तपात झाला नसता. कासीम रझवी सारख्या आतंकवाद्यांने त्याचा मेंदू सडवला.
पण यात सामान्य जनता कुठे होती? अनेक जण लढा देत होते. हिंदू महासभा, आर्य समाज व हैदराबाद स्टेट काँग्रेस या तीन संघटनांची नावं यात प्रामुख्याने येतील. त्यातही हैदराबाद स्टेट काँग्रेस मध्ये स्वामीजींच्या नेतृत्वाखाली गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, बहिर्जी शिंदे, रमणभाई पारीख सारखे अनेक स्वातंत्र्यसैनिक तर होतेच, मात्र सामान्य लोक जे सुरुवातीला रझाकरांच्या अत्याचारास बळी पडून खचले होते, त्यांनी देखील तलवारी उचलल्या आणि लढा दिलाच. मुळी हैदराबाद मुक्तीसंग्राम हा शेवटच्या चार दिवसांचा नव्हे तर त्यामागील जवळपास 37 वर्षांचा लढा होता. होमगार्ड ट्रेनिंग, झेंडा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह सारख्या चळवळी तर झाल्याच, जिल्ह्याच्या सीमांवर निजामविरोधी कॅम्प असायचे. ज्या रझाकारी सैनिकांनी अगोदर केवळ हिंदूंना टार्गेट करून कत्तली, बलात्कार व दंगलीचा उत्पात गावोगावी माजवला होता आता त्या सर्वांना सामान्य लोकांनी गनिमी काव्याने वेचून वेचून मारले. यामध्ये महिलाही प्रचंड आघाडीवर होत्या. उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक किसनराव टेके यांना निःशस्त्र असताना रझाकरांनी शहीद केले. तेव्हा गोदावरीबाई टेके या त्यांच्या पत्नीनी स्वतः बंदूक उचलून रझाकरांवर गोळ्या झाडल्या. रझाकरांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. चकमकीत एका रझाकार सैनिकाचा गोदावरीबाईंनी बळी घेतला व नंतर रझाकरांनी त्यांचे घर पेटवून दिले. गोदावरीबाई शहीद झाल्या. उस्मानाबाद जिल्ह्यातीलच उमरगा तालुक्यातील गुंगोटी गावच्या सोनुबाई पाटील या महिलेवर एक रझाकार सैनिक डोळा ठेऊन होता. ती आडावर पाणी भरायला जात असताना तो तिचा पाठलाग करी. ही बाब समजताच स्थानिक स्वातंत्र्यसैनिकांनी युक्ती लढवली. एके दिवशी सोनुबाई आडावर पाणी भरत असताना तो रझाकार आला व सोनुबाईंनी त्याला लाजून इशारा केला. रझाकार जाळ्यात अडकला. संध्याकाळी अमुक ठिकाणी शेतात या असे सोनुबाईंनी सांगितले. तो तिथे आला. त्याने जसही सोनुबाईंचा हात धरला की अचानक 4-5 दबा धरून बसलेले स्वातंत्र्यसैनिक चारी बाजुंनी त्या रझाकारावर हल्ला करून आले. चार दोन कोयत्याने वार तर स्वतः सोनुबाईंनी केले व त्या नराधमाचा बळी घेतला. अनेक भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांना शिदोरी म्हणजेच जेवणाचा डबा पुरवण्यापासून ते आर्थिक मदत देईपर्यंत मराठवाड्यातील वीरांगणांनी सर्वप्रकाराचं योगदान दिलं, प्राणाचीही पर्वा केली नाही आणि मांसाहेब जिजाऊंपासून ते राणी लक्ष्मीबाईपर्यंत सर्वांची प्रेरणा प्रत्यक्षात आणून दाखवली. गोदावरीबाई टेके, त्रिवेणीबाई पाटील, दगडाबाई शेळके, लता बोधनकर, गीताबाई चारठाणकर, बकुळाबाई पेडगावकर ही फक्त काही नावं. अन्याय सहन करण्यापेक्षा स्वातंत्र्याचा सशस्त्र लढा देणाऱ्या मराठवाड्याच्या लोकांचा हाच तो जाज्वल्य इतिहास, ज्याचा विसर पडतोय.
यावर्षी एक सिनेमा आला जो भारतात आणि विशेषतः अमेरिकेत प्रचंड गाजला. तो म्हणजे RRR. ही RRR तरी खऱ्या स्वातंत्र्य सैनिकांवरील काल्पनिक कथा होती, एस एस राजामौळीनि मनावर घेतलं तर असे किमान 10 तरी चित्तथरारक खऱ्या कथानकाचे चित्रपट हैदराबाद मुक्तीसंग्रामवर बनू शकतात..
अनेकवेळा दंगली उसळल्या. लातूर, अंबाजोगाई, परभणी, जालना, औरंगाबाद नांदेड च्या रस्त्यांवर 2-2 किलोमीटर पर्यन्त प्रेताचे ढिगारे असायचे. मात्र एव्हढ्यातही मराठवाड्यातील जनतेने एकमेकांप्रती जिव्हाळा दाखवला. रझाकार जेव्हा फॉर्मात होते तेव्हा ते हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली माजवायचे. अशा वेळी अनेक स्थानिक मुस्लिमांनी हिंदूंना आश्रय दिला. ऑपरेशन पोलो च्या वेळी देखील अनेक निष्पाप मुस्लिमांचे जीव गेले तेव्हा हिंदूंनी आपापल्या गावातील निष्पाप मुस्लिमांचं रक्षण केलं. लढा हा निझामाविरोधात असुन निष्पाप लोकांचा बळी घ्यायचा नाही ही अगदी हाय लेव्हल ची clarity आमच्या लोकांमध्ये तेव्हा होती. हैदराबाद मुक्तीसंग्राम हा इतिहासातील एक अतिशय रक्तरंजित मात्र तरीही आदर्श असा लढा आहे.
75 व्या हैद्राबाद व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Warm Regards,
Dnyanesh Make “The DPM”
0 Comments