(सदर कहाणी सत्य इतिहासावर आधारित अशी काल्पनिक कथा आहे. प्राचीन भारतीय इतिहास, कंनौज येथील तिहेरी युद्ध व तत्कालीन राजघराण्यांचा, राजकीय घटनांचा व संबंधित राजांचा केवळ मनोरंजनापूरता उल्लेख असून कथेत सांगितलेल्या सर्वच घटना ऐतिहासिक नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी)

ई. स. 792

महाराज ध्रुव धरावर्ष राष्ट्रकुट परत एकदा मोठी सेना घेऊन कंनौज च्या दिशेने निघाले. मान्यखेताहून निघाल्यानंतर महादुर्ग धाराऊर येथे सेना विश्रांतीस थांबली. चालुक्यांच्या दरबारी कधीकाळी अमात्य असणारे हे राष्ट्रकुट अचानक सत्तेत येतात काय आणि त्यांनाच सिंहासनावरून खाली खेचून राजा बनतात काय, हे सगळं भारतवर्षासाठी तेव्हा नवीन राहिलं नव्हतं. चालुक्य देखील असेच राजा हर्षवर्धनला हरवून मोठे झाले होते. बरं चालुक्य आणि राष्ट्रकुटांमध्ये अनेकवेळा लग्नाचे संबंध प्रस्थापित झाले होते. मुळात राजकीय लग्न ही सत्ता टिकवण्यासाठीच होतात. तरीही इथे सत्ता गेलीच. भारतातील प्रत्येक राजा त्यावेळी स्पर्धा करत होता. पल्लवांपेक्षा चांगली मंदिरं आणि शिल्प बनवण्याची चोळांची स्पर्धा. चालुक्यांपेक्षा चांगल्या व मोठ्या लेण्या, किल्ले बनवण्याची राष्ट्रकुटांची स्पर्धा. या स्पर्धांना धन लागत असे, आणि ते धन सुपीक जमिनीच्या प्रदेशातच मिळत असे, कराच्या स्वरूपात जनतेकडून. असाच उत्तर भारतातील एक मोठा सुपीक प्रदेश नेमकाच ढिला पडला होता. गंगा, यमुनेपासून ते पार पश्चिमेला सिंध प्रांत आणि पूर्वेला मगध प्रांता पर्यन्त सर्व प्रदेशांना जोडणारे हे संगम, कंनौज! सौराष्ट्रावरून गुर्जर प्रतिहार, गौडवरून पाल आणि दक्षिणेतून राष्ट्रकुट अशी तीन राजांची तिथे तो प्रदेश जिंकण्यासाठी लागलेली स्पर्धा युद्धात बदलली.

काही वर्षांपूर्वी महाराज गोविंद राष्ट्रकुट द्वितीय यांच्या दरबारात नालंदा विद्यापीठातील एक प्राचार्य आले, आचार्य सूर्यदेव गुप्त. आचार्य सुर्यदेवांनी स्वतः तेव्हा राजकुमार ध्रुवचा राज्याभिषेक करून त्यांना महाराज बनवलं. आचार्य प्रचंड ज्ञानी होते. सगळं राष्ट्रकुट अमात्य मंडळ एकीकडे आणि आचार्य एकीकडे. ध्रुव धरावर्षाच्या काळात आचार्यांचा शब्दच शेवटचा झाला होता. कंनौज मोहिमेला आचार्यांचा विरोध होता. पण महाराज ऐकले नाहीत. मोहिमेत राजकोशातील धन, सुवर्ण आणि शस्त्र विनाकारण वाया जाईल असे आचार्यांचे मत होते. कंनौज पेक्षा दक्षिणेत कावेरी पार करून चोळांवर पूर्ण ताकदीने हल्ला करावा, त्यांचे नौदल हस्तगत करावे आणि सिंहल प्रांतावर विजय मिळवून राष्ट्रकुटांची पताका तशीच समुद्रमार्गे नव्या वाटा शोधत निघावी असे त्यांचे मत होते.

सूर्योदय होताच महाराज पुनःश्च मार्गक्रमण करीत कंनौज कडे निघाले. हे तिहेरी युद्ध सुरू होऊन आता 42 वर्ष झाली होती. राष्ट्रकुटांची संपत्ती झपाट्याने कमी होऊ लागली. आचार्यांवर मान्यखेता शहर व राज्याची जबाबदारी पूर्णपणे सोडून जवळजवळ सर्व राष्ट्रकुट राजपुत्र व काही वीरांगना राजकन्या देखील मोहिमेवर निघाल्या होत्या. नातेसंबंध असल्याने दरबारात सामंत असणारे काही चालुक्य सुद्धा गेले होतेच. राजकुळातील महत्वाच्या व्यक्तींच्या पश्चात राजधानीत होत असणाऱ्या गुप्त हालचाली पाहून आचार्यांना साम्राज्यावरील संकट गडद होताना साफ दिसत होते.

तक्षशिलेहून स्नातक होऊन आलेले व राष्ट्रकुटांच्या दरबारातील अमात्य असूनही चालुक्यांच्या विशेष जवळचे असणारे पंडित पृथ्वी शास्त्री यांची हालचाल आचार्य जवळून पाहत होते. राष्ट्रकुटांच्या सर्व दासी शास्त्रींना गुप्तपणे भेटून बातम्या द्यायच्या.

दरबारातील उर्वरित सदस्य, जे की जवळपास सर्वच चालुक्य परिवारातील होते, त्यांच्यासह शासकीय कार्याचे परिपत्रक बनवण्यासाठी आचार्य व शास्त्रीजी जमा झाले. एवढ्यात राजघोषकाने घोषणा केली. सर्वांची दृष्टी दरबाराच्या महाद्वाराकडे वळली. सुवर्णाक्षी वस्त्रांमध्ये, चेहऱ्यावर राजघराण्याचे तेज, डोळ्यात चमक, सुकुमार दिसणारे मात्र तरीही पुष्ट देहयष्टी असणारे राजपुत्र गोविंद गतीने चालत येत रिकाम्या सिंहासनावर बसले व त्यांनी आचार्य व शास्त्री दोघांनाही प्रश्न करण्यास सुरुवात केली. पंडित पृथ्वी शास्त्रींसाठी हे आश्चर्यकारक होतं कारण एकतर राजकुमार गोविंद सर्वात कनिष्ठ राजकुमार होते. त्यांचं वय त्यावेळी फक्त 18 वर्ष होतं. महाराज ध्रुवांनी त्यांना किंवा त्यांचा दोन्ही बंधूंपैकी कुठल्याही एकास युवराज घोषित केलं नव्हतं. विशेष म्हणजे राजकुमार गोविंद कधी राजनीतीच्या विषयांमध्ये अथवा शासकीय कार्यांमध्येही कधी दिसले नव्हते. त्यांना दोनच गोष्ट प्रिय होत्या, एक म्हणजे लढाई, आणि दुसरी त्यांची प्रेयसी. शक्यतो अशा राजपुत्राकडे अमात्यमंडळ कधीही कानाडोळा करतं. मात्र राजकुमार गोविंद प्रजेच्या अधिक जवळचे होते. प्रजेतील युवांमध्ये त्यांना प्रचंड मान होता. त्यांनी पहिला प्रश्न केला.

“आम्हास न सांगता आमच्या दासी अचानक निघून गेल्यात. शास्त्रीजी, आम्हाला याचं विश्लेषण हवं आहे.”

नजर न चुकवता शास्त्रीजींनी राजकुमारांना सांगितलं, “आपल्या मुख्य दासी, अलका कुमारी प्रतिहारांच्या गुप्तहेर होत्या असं आम्हास कळलं. आम्ही त्यांसी सप्रमाण आपणासमोर सादर करणार होतो मात्र त्याची चाहूल लागताच त्या इतर 12 दासींसह अज्ञात स्थळी निघून गेल्या”

“पंडितजी आपणास आम्ही गुप्तहेर खात्याचे प्रमुख का हा दिवस पाहण्यासाठी नेमलय? त्या 12 दासी आमच्यासमोर उद्या सुर्योदयासह सादर असाव्या अन्यथा आपणास मृत्युदंड देण्यात येईल. आणि आचार्य, आपण हे सगळं कसंकाय दृष्टिआड करू शकता?”

“क्षमा असावी राजकुमार! आमच्या अधिकारक्षेत्रात हेरगिरी येत नाही. शिवाय किशोरवयीन दासींना एकांतात भेटायला बोलवनं मला शोभत देखील नाही. त्यामुळे मला हे कार्य जमलं नाही.”

“आपला रोख कुणावर आहे आचार्य?” – राजकुमारांनी विचारलं.

“क्षमा असावी राजकुमार पण आपण अजून राजनीती साठी परिपक्व नाही आहात. महाराज परत येताच आपण या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावू हे मी वचन देतो.” – आचार्य

“महाराज परत येईपर्यंत या महत्त्वाच्या प्रकरणावर निर्णयासाठी प्रतीक्षा? राजकुमार आपल्या क्षमतेचा अपमान आहे हा, की कुठल्या मोठ्या कटाचं लक्षण? काय माहीत आचार्य स्वतःच या कटाचे सूत्रधार असतील? राजकुमार महाराज परत येईपर्यंत आचार्य राहिले नाहीत तर? हे प्रकरण आत्ताच मार्गी लागायला हवं राजकुमार. महादेव न करो पण आपण प्रतिहारांपुढे हरलो तर कंनौज सोबत विंध्य सुद्धा हातचा जाईल. सह्याद्री, बालाघाट व गोदावरी सुद्धा जाईल. राजकुमार, झालेल्या घटनेचं गांभीर्य लक्ष्यात घेता त्या दासींकरवी प्रतिहारांकडे जर गुप्त माहिती पोचली असेल तर आपल्या राजधानीवर आक्रमणाचं संकट स्पष्ट आहे. तूर्तास कृपया आचार्यांना दृष्टिबंद करण्यार यावे ही माझी गुप्तहेर खात्याचा प्रमुख म्हणून आपणास विनंती आहे” – पंडितजी

चेहऱ्यावरील एक रेषासुद्धा न हलू देता राजकुमार गोविंद यांनी आचार्यांकडे पाहिलं आणि म्हटले, “ काय म्हणता आचार्य? करावं का बंदी?” स्मितहास्य करत आचार्य म्हटले, “अवश्य”!

“इतर दासींना आजन्म बंदिवास घोषित करण्यात येत आहे. उद्या सूर्योदयापूर्वी कुमारी अलका आणि पंडित पृथ्वी शास्त्री यांना राजद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये मृत्युदंड देण्यात येईल.” राजकुमारांनी आदेश दिला. आदेश ऐकताच शास्त्रीच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या शास्त्रींनी आचार्यांना संपवण्यासाठी हा खेळ केला आता तो खेळ परत त्यांच्यावरच उलटला होता. दासी अलका कुमारीच्या हस्ते जी गुप्त माहितीची पत्रिका विविध संदेशवाहकांच्या हस्ते प्रतिहारांपर्यंत जात होती, आचार्यांनी त्या सर्व संदेशवाहकांनाच त्यांच्या मार्गात अडवून सर्व पत्रिका स्वतःकडे प्रमाण म्हणून घेतल्या. या संदेशवाहकांचा गुर्जर प्रांताकडे जाणारा मार्ग सहस्त्र मैलांचा होता. शिवाय हे सर्व कधी आदिवासींच्या तर कधी साधुच्या वेशात प्रवास करीत असत. हे सर्व षडयंत्र पृथ्वी शास्त्रींनी अत्यन्त सावधपणे साकार केलं होतं. तरीही याचा मागोवा घेत आचार्यांनी त्या संदेशवाहक टोळीस संपवलं. कुटनीती मध्ये शास्त्रींची नुसती हार झाली नव्हती, तर ते त्यांच्या जीवावर बेतलं होतं. स्वतःच्या बचावात एक शब्दही न बोलता त्यांनी मृत्युदंडाची शिक्षा मान्य केली. त्यांना माहीत होतं की इथून सुटलं तरी चालुक्य आणि प्रतिहार दोघंही आता त्यांना सोडणार नव्हते.

पुढच्याच क्षणाला पंडित पृथ्वी शास्त्री यांना बंदीगृहात नेण्यात आलं. आचार्य आणि राजकुमार दरबारातून निघून आचार्यांच्या अभ्यासिकेत आले. ही अभ्यासिका अत्यन्त रहस्यमयी जागा होती. आचार्यांशिवाय केवळ महाराज आणि राजपुत्रांना ही माहीत होती. आचार्यांचा इथे नेहमी अभ्यास असायचा. पदार्थशास्त्र, जीवशास्त्र, गणित, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूमिती, भूगोल, इतिहास आणि अंतराळशास्त्र अशा अनेक विषयांवर आचार्यांचा अत्यन्त गाढा अभ्यास होता. मौर्य, सातवाहन आणि शक काळात जगभरातील खलाशी व प्रवासी भारतात येऊन प्रवासवर्णनं लिहायची. त्या सर्व प्रवास वर्णनांची भाषांतरं आचार्यांनी या अभ्यासिकेत ठेवली होती. अभ्यासिकेत एक गुरू आसन होते. त्यावर आचार्य बसले. राजकुमार त्यांच्या  पायाशी बसले. काही वेळ ध्यानस्थ बसल्यानंतर आचार्यांनी मार्गदर्शनास सुरुवात केली.

“राजकुमार आपण अजूनही कुटनीतीच्या जगात एक बालक आहात. पंडित पृथ्वी शास्त्री गेल्या सहा वर्षांपासून प्रतिहारांसाठी हेरगिरी करत होते. त्या सर्व दासी त्यांच्या कनिष्ठ गुप्तहेर होत्या. त्यांच्या अवेळी होणाऱ्या भेटी आम्ही दोन वर्षांपासून पाहत होतो. राजकुमार, पंडितजी एकटे नाहीत. निश्चितच कुणीतरी त्यांना सहाय्य करत होतं. राजकुमार, राज्य एका कठीण प्रसंगात आहे.” – आचार्यांनी काळजी व्यक्त केली.

“आचार्य, क्षत्रिय धर्म आम्हास लढण्यास सांगतो, प्रजेचं रक्षण करण्यास सांगतो. राज्याचा विस्तारदेखील क्षत्रियधर्मच आहे. या भूतलावर आम्ही एकटे क्षत्रिय तर नाहीच. प्रतिहारांचं आपल्या राज्यात गुप्तहेर पाठवणं विस्मयादी नक्कीच नाही.” राजकुमारांनी भावना व्यक्त केल्या.

“राजकुमार मी यामुळेच आपणास अल्पवयीन म्हणतोय. आपल्याला अंतरयुद्ध जाणवत नाहीये? राजकुमार अहो प्रत्यक्ष रावणाच्या घरात भेदी होता, आपण तरीही कलियुगातील नृपद. विचार करावा कुंवर!” – आचार्यांनी विचारलं.

चालुक्यकन्या कुमारी राधिका यांच्याशी आमचा विवाह होणार आहे. हे अंतरयुद्ध कसे? बरं मान्य करूया की चालुक्यांनी आम्हास धोका दिला, तरीही ते आमचा परिवार आहेत.” – गोविंदानी सांगितलं.

“महाभारत देखील परिवारात झालं होतं कुंवर. राधिका आपल्या बालसखी असल्या तरी त्यांचे पिता आपल्या महाराज पिताश्रींचे मित्र नाहीत. चालुक्य परत एकदा सिंहासनावर बसण्यासाठी उतावीळ आहेत कुंवर. आणि पल्लवानी देखील आपल्याप्रमाणे चोळाना खाली खेचत तामिळ राज्याचं सिंहासन मिळवलं होतं. तीन शतकांनंतर चोळांनी परत एकदा त्यांना बाजूला करत सिंहासन घेतलंच. कुंवर लक्षात असुद्या, प्रभू श्रीरामांपासून ते चंद्रगुप्त मौर्यापर्यंत सर्वांनी आसेतुसिंधु भारतवर्षासाठी क्षत्रिय धर्म जपला आहे. त्या गौरवशाली भारतवर्षाच्या पुन:निर्माणासाठी हे यज्ञ आहे. हे राष्ट्रकुटांना जिंकावेच लागेल. गांधार प्रदेश यवनांच्या ताब्यात गेलाच आहे. हिमालय राखावा लागेल कुंवर. आणि समुद्रमार्गे घुसून यवनांच्या प्रदेशात देखील वर्चस्व गाजवावेच लागेल. भारतवर्षाच्या येणाऱ्या भविष्यासाठी हे गरजेचे आहे कुंवर. सर्वप्रथम चालुक्यांचा समूळ नाश करावा.”

“सद्यस्थितीत चालुक्य किती शक्तिशाली आहेत?” राजकुमार

“चालुक्यांप्रति आपली अर्ध्याहून अधिक सेना प्रामाणिक आहे. सेनापती विजयानंद चालुक्यांनी हे अतिशय व्यवस्थित केलंय. सैन्यासह तुंगभद्रेच्या प्रदेशातील प्रजेचा विश्वास देखील चालुक्यांप्रति आहे. कितीही प्रयत्न केला कुंवर तरीही युद्धात आपण हरणार.” – आचार्य

“पंडित पृथ्वी शास्त्री आमच्या पराभवाची भविष्यवाणी करत असताना गोदावरी व बालाघाट प्रदेश जाईल असं का म्हणत होते?” – राजकुमार

“पंडितजी अतिशय नीच व कुटील आहेत. त्यांनी एकाच वेळी चालुक्य व प्रतिहार दोन्ही घराण्यांसाठी आपली हेरगिरी केली आहे. पुढे चालुक्य व प्रतिहारांमध्ये युद्ध घडवून गोदावरी, बालाघाट व सह्याद्री प्रांतावर स्वतःचं राज्य करण्याची त्यांची योजना होती.” – आचार्य

“त्या प्रदेशात एवढं विशेष काय?” – राजकुमार

“सह्याद्रीच्या पर्वतांमध्ये आणि गोदावरीच्या प्रांतात अनेक उपनद्या, वन, औषधादी वनस्पती व मसाले आहेत. पूर्वी मिश्र व रोमशाम वरून व्यापारी यांच्या खरेदीसाठी येत असत व अजूनही येणारच आहेत. अरबस्तानात सध्या नवीन धर्माने आवेग घेतलाय. त्यांचे लोक जागोजागी युध्दादी रक्तपात करून प्रदेशावर राजकीय व धार्मिक वर्चस्व निर्माण करतायत. त्यामुळे मिश्र व पश्चिमेकडील प्रदेशाचा जम्बूद्वीपाशी संपर्क तुटला आहे. फार्सच्या पश्चिमेस सर्वत्र त्यांचे शासन आहे. आम्हास भीती आहे कुंवर की सिकंदर, सेल्युक्ष प्रमाणे कदाचित हे नव यवनी अरब आपल्याकडे देखील येतील” – आचार्य

“मिश्र व रोमशाम च्या पलीकडे जग आहे?” – राजकुमार

“अर्थात राजकुमार. या भूतलावर सात महासागर आणि सात महाद्वीप आहेत. जंबुद्वीप हा केवळ त्या सातपैकी एक द्वीपमात्र आहे.” – आचार्य

“कसं आहे ते जग?” – राजकुमार

“ते आपणास माहीत नाही कुंवर. माझे अनुमान सांगते की तो थंड हवेचा प्रदेश आहे. सिकंदर नंतर तिथे एक मोठे साम्राज्य होऊन गेले आहे. युनानी प्रवाशांनी आपल्या साहित्याच्या रचना व आपली शास्त्रे त्यांच्याकडे मार्गदर्शिका म्हणून नेली आहेत. त्यामुळे मज वाटते कुंवर की आज ते आपल्याइतके विकसित नसले तरी पुढे चालून हे पश्चिमेचे जग आपल्याच शास्त्रांच्या द्वारे भौतिक विज्ञानात प्रगती करून भविष्यात आपणास मागे टाकणार आहे. आचार्य चाणक्यानी त्यांच्या दैनंदिनी मध्ये नोंदवल्याप्रमाणे तिथले लोक क्रूर व जुलमी असून त्यांच्याकरवी आपल्या देशास असुरक्षितता आहे.” – आचार्य

“आचार्य, आम्हा राष्ट्रकुटांचं नेमकं उद्दिष्ट काय समजावं आम्ही?” – राजकुमार

“कुंवर, माझा इतिहासाचा अभ्यास सांगतो, जिथे रघुकुल व यादवकुळाचा देखील सर्वनाश झाला, तिथे आपण, चालुक्य, चोळ, प्रतिहार, पाल तर कोण आहोत? अगदी मौर्य साम्राज्य सुद्धा अस्ताला गेलंच. परंतु क्षत्रियांचा धर्म आहे प्रजेचं, संस्कृतीचं व साम्राज्याचं रक्षण. प्रजेच्या रक्षणासाठी युद्धनीति, राजनीती व कुटनीती आपणास मुभा मात्र आहे. आपण राजसिंहासनावर नेहमीच असणार नाहीत. त्यामुळे उद्दिष्ट मोठं असुद्या कुंवर. संपूर्ण भारतवर्षावर एक चक्रवर्ती सम्राट शासन करावा आणि त्या सम्राटाच्या छत्रछायेत प्रांतादी शासनव्यवस्था असावी. सर्व प्रांतांची मिळून एक मोठी, सशक्त व शस्त्रसज्ज सेना असावी. एक मोठे नौदल असावे. सिंध, हिमालयाच्या सीमा लांघून येणाऱ्या प्रत्येक शत्रूस धराशायी करावे. नालंदा, तक्षशिला प्रमाणे विश्वविद्यालये बनवावीत. वेदोपनिषदांसह इतर नवनवीन शास्त्रे भारतवर्षातील सर्व युवकांनी निःशुल्क शिकावित. विदेशी व्यापाऱ्यांकडून आपल्या व्यापाऱ्यांची लूट थांबवण्यासाठी चलन, मूल्यांकनाची राष्ट्रीय नीती असावी. 64 कलांचा विकास व्हावा. आणि महत्वाचं म्हणजे तिब्बतादी उत्तरेकडील प्रांत, सिंहल च्या दक्षिणेकडील प्रांत, गौडच्या पूर्वेकडील व फार्स, अरब, रोमशाम च्या पश्चिमेकडील प्रांत राजयात्रींकडून पादाक्रांत करवून घेऊन सर्व विदेशी प्रांतांचं वर्णन, त्या प्रांतासह तिथल्या प्रकृतीची नक्षी, तिथल्या भाषांचा अभ्यास व तिथल्या शासकांशी मैत्री साधणं गरजेचं आहे कुंवर.” – आचार्य

“या सर्वाने काय साध्य होईल आचार्य? आम्हास एकछत्री साम्राज्य, विश्वविद्यालयांची उभारणी, सशस्त्र विशाल सेना व नौदल, कला व संस्कृतीचा विकास या गोष्टी समजल्या. ही राजयात्री पाठवण्याची आवश्यकता काय?” – राजकुमार

“कुंवर, भारतवर्षातील सर्व क्षत्रिय सत्तेच्या मादात उन्मत्त होतात. त्यांना शत्रूबोध होत नाही. आचार्य चाणक्य नसते तर कदाचित सेल्युक्ष ने समस्त भारतवर्षावर केव्हाच राज्य करून इथल्या संस्कृतीचा विनाश केला असता. सेल्युक्ष कडे शस्त्रे काय आहेत, त्यांची कुटनीती काय आहे, त्यांचे आक्रमण कसे होईल हे चाणक्यांना अगोदरच ज्ञात होते कारण चाणक्यांच्या विषकन्या व राजयात्रींनी ही सर्व माहिती त्यांच्या प्रदेशात जाऊन युद्धाच्या अनेक मास पूर्वीच सांगितली होती. शुंगाच्या काळातील दुसरे यवनी आक्रमण यामुळेच यशस्वी झाले कारण यवनांना शुंगांच्या सैन्याची कमतरता कुठे आहे याचे ज्ञान होते. शत्रूचे संपूर्ण ज्ञान असल्याशिवाय आपण शत्रूचा सामना करू शकणार नाही कुंवर.” – आचार्य

“आणि हे शत्रू आक्रमण का करतील?” – राजकुमार

“गांधार च्या पश्चिमेस रोमशाम पर्यन्त सहस्त्रादी मैल केवळ मरुस्थल भूमी आहे. कृषीक उत्पादनाशिवायू कसलीही समृद्धी संपदा केवळ अशक्य. अरब, फार्स प्रांतातील यवन याच कारणामुळे आक्रमण करतील. रोमशाम व त्याच्या पश्चिमेस माझ्यामते दोन महाद्वीप आहेत. एक उत्तरेस आणि एक दक्षिणेस. हे दोन्ही महाद्वीप उपजाव भूमीचे आहेत आणि समृद्धता इथे देखील आहे, तरीही यवनांच्या दुसऱ्या पंथाचे इथे वर्चस्व असून त्यांची विचारशैली ही जडवादी आहे. ते मांसाहार करतात. मांसाहारास मोठ्या प्रमाणात मसाले लागतात आणि त्याच्या शोधात ते आज न उद्या भारतवर्षात येतीलच. या दोन्ही महाद्विपांच्या पश्चिमेस आणखी एक महासागर असण्याची शक्यता आहे. कुंवर, त्याच्या पश्चिमेस देखील आणखी दोन महाद्वीप असण्याची शक्यता आहे.”- आचार्य

“एवढ्या मोठ्या पृथ्वीतलाचा अभ्यास करण्यासाठी आपणास यात्रींची मोठी सेना लागणार आचार्य. त्यासाठी सुशिक्षित यात्री आणि त्यांना यात्रेसाठी देण्यास धनसुद्धा लागेल. परंतु यासाठी विशेष मार्गदर्शिका लागेल. कुणी अनुभवी यात्री आपल्या परिचयात आहे का आचार्य?” – राजकुमार

“वज्रयान शाखेतील बुद्ध भिक्कु हे असेच यात्री आहेत कुंवर. तिब्बतेच्या पूर्वोत्तर सिनो प्रदेशात आज भारतवर्षाचा बुद्ध धम्म प्रसवला आहे. आपण त्यांच्या मदतीने सर्व धार्मिक पंथांना यात्रेवर पाठवू शकतो. धार्मिक यात्रेकरूंना कुठल्याही राज्यात प्रवेश दिला जातो.” – आचार्य

“सद्यस्थितीत आपण काय करायला हवं?” – राजकुमारांनी एवढं विचारताच संदेशवाहक एक पत्रिका घेऊन आला. प्रतिहार राजकुमाराने चालुक्यकन्या राधिकास लिहिलेले ते पत्र होते. त्यात स्पष्टपणे राजकुमार गोविंद यांना छल करून मारण्याचे कपट वर्णिले होते. यात पंडित पृथ्वी शास्त्री यांची महत्वाची भूमिका होती. राजकुमारांनी तात्काळ दरबारात सर्वांना पाचारण केले. चालुक्यकन्या राधिका यांना बेड्यांमध्ये जोखडून राजकुमारांसमोर हजर करण्यात आले. यावेळी राजधानी सुरक्षा बलाचे सेनापती कुशलदेव त्यांच्या शंभर सैनिकांसह हजर होते. चालुक्याकन्या राधिकाचे पिता अमात्य माधवानंद चालुक्य देखील उपस्थित होते. त्याचप्रमाणे चालुक्यांच्या परिवारातील इतर काही महत्वाचे सदस्य सुद्धा उपस्थित होते. राजकुमारांच्या बाजूला उभे आचार्य अत्यन्त बारकाईने सर्वांवर लक्ष ठेऊन होते.

“कुमारी राधिका, चालुक्य माधवपुत्री, आपणास राज्याविरोधात कूट करून आम्हास छल करून मारण्याची योजना केल्याबद्दल दोषी ठरवण्यात येत आहे. राष्ट्रकुट राज्याचे परमशत्रू असणारे प्रतिहार राजकुमार श्री वीरेंद्र यांच्याशी पत्र संभाषण असण्याचे सप्रमाण सिद्ध होत आहे. आपणास स्वपक्षी काही बोलावयाचे आहे?” राजकुमारांनी अत्यन्त खडसावत व क्रोधात विचारलं.

नखशिखांत सौंदर्य व अफाट बुद्धिमत्ता असणारी

चालुक्यकन्या राधिका डोळ्यातील अश्रू पुसत उभी होती. राधिका व गोविंद यांच्यात बालपणापासून मैत्री व प्रेम होते. त्यांच्या प्रेमाची कहाणी संपूर्ण मान्यखेतास ज्ञात होती. अनेकवेळा एकाच घोड्यावर बसून कधी हे दोघे शिकारीला जात तर कधी प्रजेशी वार्तालाप करायला. कधी दोघेही महानवमी उत्सवात एकत्र भरतनाट्य सादर करीत तर कधी नदीकाठी एकत्र बसत. कंनौज च्या काही मोहिमांमध्ये त्या दोघांनी एकत्र लढाई सुद्धा केली होती. आज त्यांच्या प्रेमाच्या मधुरसात क्षत्रियधर्माने एक मोठा मिठाचा खडा टाकला होता. राधिकाने स्पष्टीकरण देण्यास सुरू केलं.

“कुंवर, आपल्यावर माझी प्राणांहून अधिक प्रीती आहे. आपल्या प्रेमासाठी मी तुम्ही मृत्युदंड दिलात तरी हसत हसत स्वीकारेन. मात्र माझ्या परिवाराप्रति माझे कर्तव्य, एक क्षत्राणी म्हणून माझा क्षात्रधर्म मी पाळला. मला मान्य आहे मी राजद्रोह केला, मात्र माझ्या पूर्वजांच्या सिंहासनावर बसलेल्यास जर उठवायचे असेल तर एक चालुक्यपुत्री म्हणून ते माझे आद्यकर्तव्य आहे. राजकुमार, आपण मला एक पुरुष म्हणून प्राणांहून प्रिय आहात. श्री शंभूमहादेवाकडे मी सातही जन्म तुम्हालाच मागेन. प्रतिहार राजकुमाराशी पत्रव्यवहार केवळ राजकीय संधीसाठी होता. त्यांच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव माझा नसून माझी भगिनी, कुमारी नंदिनी हिच्यासाठीचा आहे. तसे पत्र माझ्या हातात आहे हे पाहू शकता. माझं तुमच्यावरचं प्रेम खरं आहे आणि हे आपणास माहीत आहे. रुढींच्या विरोधात जाऊन विवाहपूर्व प्रणय कुठल्या राजकीय विवाहासाठी नसतो कुंवर.  मात्र क्षात्रधर्मात आपण माझे शत्रू आहात. महाराज ध्रुवांच्या नंतर कुठलाही राष्ट्रकुट सिंहासनावर बसला तर चालुक्यपुत्री म्हणून ते माझे अपयश असेल. आपण सिंहासनावरून अवनत व्हावं यापलीकडे माझा कुठलाही हेतू नाही. कृपया आपण अवनत व्हावं आणि मान्यखेताचं सिंहासन व साम्राज्य तात्काळ माझे पिता श्री माधवानंद चालुक्य यांना सन्मानपूर्वक हस्तांतरित करावं अशी मी विनंती करते. मला या पवित्र राजगृहात रक्तपात नको आहे कुंवर. राजधानी सुरक्षा बलाचे सैनिक माझ्या एका आदेशावर आपणास बलपूर्वक सिंहासनावरून काढू शकतात. कृपया संज्ञान घ्यावं.” – राधिका

राधिकाच्या बोलण्याने पूर्ण दरबारात एक तणावपूर्ण शांतता पसरली. चालुक्यांचं कूट फळाला येत होतं. राष्ट्रकुटांची जवळजवळ सर्व सेना व सर्व परिवार कंनौज च्या मोहिमेवर असताना उरलेली सर्व फौज चालुक्यांनी स्वतःच्या अधीन केली होती. कमकुवत स्थितीत येताच राष्ट्रकुटांना कात्रीत पकडून त्यांच्या सर्व राजकुमारांची व राजाची हत्या करून साम्राज्य ताब्यात घेण्याचा हा मोठा डाव होता. राधिकाच्या अटकेने आता तो डाव उघडा पडला असला तरीही सद्यस्थितीत चालुक्यांकडे जास्त ताकद होती. राजकुमार गोविंद एकटे पडले होते.

राजकुमार गोविंदांचे अंगरक्षक भाला काढून सज्ज झाले. इकडे चालुक्यांच्या अधीन असणारे राजधानी सुरक्षा बलाचे दरबारात उपस्थित असणारे शंभर सैनिक सुद्धा भाला काढून सज्ज झाले. दरबाराच्या बाहेर राजधानी सुरक्षा बलाचे आणखी एक सहस्त्र सैनिक जमा झाले. राजकुमार सिंहासनावरून उठले. अंगरक्षकांना विश्राम सूचित केला. तत्क्षणी राधिकाने देखील राजधानी सुरक्षा बलास विश्राम सूचित केला. माधवानंद साशंक नजरेने राजकुमारांकडे पाहत होते. राजकुमारांनी एक एक पाऊल टाकत राधिकाकडे प्रयाण केलं. राधिकाच्या जवळ जाऊन तिच्या ओठांचं चुंबन घेतलं. राधिकाच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. राजकुमार गोविंदानी तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हटलं, “क्षत्रियधर्म दोघंही दोघांचा पाळूया.” एवढं बोलताच राजकुमारांनी कंबरेला खोचलेली कट्यार निशाणा साधून माधवानंद चालुक्यांच्या दिशेने भिरकावली. ती थेट त्यांच्या छातीत खोलवर रुतली आणि माधवानंद तात्काळ गतप्राण झाले. पुढच्याच क्षणाला राजधानी सुरक्षा बलाचे सैनिक राजकुमारांवर हल्ला करण्यासाठी पुढे सरसावले. तेवढ्यात दरबाराबाहेर उभे असणारे सैनिक आत शिरले आणि आतल्या सैनिकांना त्यांनी मारून टाकलं. बाजूला आसनस्थ असणाऱ्या चालुक्यांना त्यांच्या बाजूला उभ्या असणाऱ्या दासींनी एकाच वेळी छातीत खंजीर भोसकून मारलं. आचार्यांनी महालाच्या दीपस्तंभावरून शंखनाद केला. शंखनाद होताच द्वितीय सेनेचे सैनिक राजधानीच्या घराघरातून तलवारी व भाले घेऊन बाहेर पडले. राजधानीस वेढा घालून असलेल्या तुंगभद्रेहून आलेल्या चालुक्य सेनेला त्यांनी सपासप कापायला सुरू केलं. द्वितीय सेना चालुक्य सेनेच्या अर्धी होती तरीही त्यांचा उत्साह गगनचुंबी होता. मान्यखेताची नदी रक्ताने न्हाली. दोन घटिकेत चालुक्य सेना परास्त झाली. एवढ्या काळात राधिका तशीच बेड्यांमध्ये जखडून गोविंदाच्या पायाशी पडून रडत होती.

“राधाराणी, हे राजतंत्र आहे. आम्हास विश्वास आहे की तुम्ही आमच्या जीवाच्या शत्रू नाहीत मात्र आपली महत्त्वाकांक्षा आमच्यासाठी घातक आहे. आचार्यांनी हे अगोदरच जाणलेलं होतं.” राधिकाच्या बेड्या सोडवत गोविंदाने बोलणं सुरू ठेवलं, “प्रियतमा, आपण राणी होणार आहात आमच्या. आपले अपत्य पुढे सिंहासनावर बसेल. तुमच्या पोटी जन्म घेणाऱ्या राजपुत्रात चालुक्यांचे रक्त नसेल काय? हा छल करण्याची काय आवश्यकता होती? तुमच्यासमोर तुमचा परिवार आम्हास संपवावा लागला.”

“कुंवर मी तुमचीच आहे. मात्र हे राज्य राष्ट्रकुटांचं नसून चालुक्यांचं आहे आणि म्हणून आम्हास हे करावं लागलं. आमच्या पिताश्रीस आपण जीवे मारलंत म्हणून माझं तुमच्यावरचं प्रेम कमी होणार नाही. तुमचे महाराज पिताश्री प्रतिहारांसोबत युद्धात आतापर्यंत धराशायी झाले सुद्धा असतील. आपण क्षत्रिय आहोत कुंवर आणि मृत्यू आपली सावली असते. माझं आपल्यावरील प्रेम या राजनीतीच्या कैक पटीने अधिक आहे.” एवढं बोलून राधिकाने परत एकदा गोविंदाचं चुंबन घेतलं आणि त्यांच्या मिठीत स्वतःला झोकून दिलं आणि सिंहासनावर दोघेही जण बसले.

द्वितीय सेना सेनापती भीमा सलकीच्या नेतृत्वात चालुक्यांच्या सेनेला दक्षिणेकडे ढकलत पुढच्या दीड दिवसात तुंगभद्रा प्रांतात पोचली. तुंगभद्रेच्या पैलतीरावर चालुक्यांची मोठी सेना युद्धाला सज्ज होती. इकडे प्रतिहारांनी कंनौजमध्ये राष्ट्रकुटांना तीन बाजुंनी घेराव घातला होता. महाराज ध्रुव धरावर्ष युद्धात गंभीर जखमी झाले होते. युद्धामुळे राजधानीत व जवळपास अन्नधान्याचा तुटवडा पडला. राजकीय कोषागारातून रक्षित साठ्यातील धान्याचं वितरण करण्यासाठी राजकुमार गोविंद अनेक बैलगाड्या व रथ घेऊन निघाले. रथात त्यांच्यासोबत राधिका सुद्धा होती. “रक्षित साठा संपेस्तोवर का आपण अडून राहणार आहात? प्रतिहारांनी अर्धं संपवलं आहेच आता बाकी आम्ही पूर्ण करू. आमचे बंधू विजयादित्य आपणास हरवण्यासाठी पूर्ण तयारीनिशी राजमहेंद्रबर्मन  नगरीहून कौशलांची मोठी सेना घेऊन तुंगभद्रेत आले आहेत. काय करणार आहात राष्ट्रकुट राजवंश?” राधिकाने खोचकपणे विचारलं.

“प्रतिहारांसोबत सरसकट हार तर आमची शक्य नाहीच. महाराज धारातीर्थ झाले तरी आमचे ज्येष्ठ बंधू राजकुमार केशव, राजकुमार कंबरस, आमच्या भगिनी राजकुमारी पद्मिनी राष्ट्रकुटांची पताका झुकू देणार नाहीत. आम्हास जर तुमचे प्रतिहारांसोबतचे पत्रव्यवहार माहीत असतील तर गेली तीन वर्षे तुम्ही बालाघाट प्रांतात आमच्या सेनेस अडवण्याचा यत्न मांडलाय तो आम्हाला माहीत नसेल? मंजिरी नदीच्या तीरावरील लट्टालूरू आमचं जन्मस्थान आहे प्रियतमा. तिथून सत्तर मैल दक्षिणेवरील उदयगिरी आमचा सर्वात मजबूत कोट आहे. नव्वद मैल उत्तरेस आम्ही स्वतः आमच्या महाराज पिताश्रींच्या नावे महादुर्गाच्या नगरी धाराऊर कोट बांधलाय. तो कोट तिन्ही बाजुंनी दऱ्यानी तर समोरून तलावाने वेढलाय. राजा नळाने दमयंतीसाठी बांधलेला नळदुर्ग, देवगिरी या सर्व कोटांवर आमचं नुसतं लक्ष नाही, तर सबळ नियंत्रण सुद्धा आहे. त्यात आमचं अत्याधुनिक शस्त्रागार आहे. आमचे अनुमान योग्य असेल तर तिथे असणारी आमची दंडकारण्य रक्षण सेना आतापर्यंत एक एका प्रतिहार सैनिकांस शोधून शोधून मारत असेल. सह्याद्री मधील गडांवरही आमचं नियंत्रण आहे. तो राष्ट्रकुटांचा महाराष्ट्र प्रांत आहे प्रियतमे. गुर्जरांसाठी स्मशानभूमी बनेल ती.” राजकुमार गोविंदानी शाब्दिक वार करत म्हटलं.

धान्य वाटप केल्यानंतर दोघेही दरबारात आले. राजकुमार सिंहासनावर बसले तर राधिका त्यांच्या बाजूस असणाऱ्या महाराणी सिंहासनावर विराजमान झाल्या.

एवढ्यात आचार्य तिथे आले. “राजकुमार, प्रतिहारांसोबत आपला तह झाला आहे. कंनौज च्या दक्षिणेस आपला तर उत्तरेस प्रतिहारांचा प्रदेश असेल. मात्र एक दुवार्ता आहे. द्वितीय सेना तुंगभद्रेच्या प्रदेशात हरण्याच्या स्थितीत आहे. कुंवर, माधवानंदाच्या मृत्यूने त्यांचे पुत्र विजयादित्य व चालुक्य सेना प्रतिशोधाच्या अग्नित चेतली आहे. राजमहेंद्रबर्मन नगरी वरून त्यांची मोठी सेना आली आहे. आपण आपलं साम्राज्य रक्षण करण्यासाठी तात्काळ चालुक्यांवर युद्ध पुकारावं. आपल्या साम्राज्याची कमीत कमी क्षती होत चालुक्यांना तुंगभद्रेच्या पैलतीरावर नष्ट करावं. चालुक्यांचा यावेळी समूळ नाश करावा कुंवर.”

“राधाराणी, आपणास ज्ञात असेलच की आमच्या उपस्थितीत आमची सेना तुमच्या दशपट अधिक सेनेस कशी किटकांप्रमाणे नष्ट करते. दरबारातील प्रकरण आपण पाहिले आहेच. शिवाय द्वितीय काय, तृतीय, चतुर्थ सेना सुद्धा आमच्या एका आदेशावर मान्यखेतापासून उदयगिरी, विजयपुरी पासून ते बदामीपर्यन्त घराघरातून निघेल. मोठा रक्तपात होईल. चालुक्यांचा समूळ नाश करावा असं आमच्या आचार्यांचं म्हणणं आहे. मात्र या नाशात संपूर्ण द्रविड प्रांताचा विनाश अधोरेखित आहे. श्रीकृष्णाने कौरवाना शांतीसंदेश दिला तसा आमच्यावतीने हा शांतीसंदेश गृहीत धरावा. सांगा काय तह करावा?  चालुक्यांच्या वतीने तुम्ही बोला.” – राजकुमारांनी प्रस्ताव देत विचारलं.

“कुंवर, आम्हांसही आमच्या बंधूंचा व तुमचा जीव प्रिय आहेच. हे सर्व ज्या राज्य करण्याच्या हेतूने सुरू आहे त्याची पूर्तता करा. चालुक्यांच्या व तुंगभद्रा प्रांतातील जनतेच्या हक्काचं राज्य आम्हास द्या. तुंगभद्रेपासून दक्षिणेकडे चालुक्यांचं राज्य. उत्तरेला राष्ट्रकुटांचं.” – राधिका

“मान्य. परंतु आमच्या काही अटी आहेत. प्रथम तर चालुक्यांनी कधीही राष्ट्रकुटांवर तलवार उचलायची नाही, राष्ट्रकुटांच्या मदतीस गरज पडेल तेव्हा चालुक्यांना यावं लागेल. द्वितीय, कुमारी नंदिनी चालुक्यांचा विवाह प्रतिहार राजकुमाराशी होणार नाही. आमचे ज्येष्ठ बंधू राजकुमार इंद्रकेशव यांच्याशी होईल. प्रतिहारांशी युद्धप्रसंग आल्यावर चालुक्यांना राष्ट्रकुटांसोबत यावं लागेल. तृतीय, भविष्यात उत्तरेत राष्ट्रकुटांची साम्राज्यवृद्धी झाल्यानंतर दक्षिणेत चालुक्यांनी चोळाना पराभूत करून राष्ट्रकुटांसाठी साम्राज्यवृद्धी करावी व राष्ट्रकुटांसाठी नौदल स्थापना करावी. चतुर्थ, आत्ता याक्षणी आपला आमच्याशी विवाह होईल आणि तुंगभद्रेच्या किनाऱ्यावरील दोन्ही सेनांसमोर आपण या व्यवहाराची पती-पत्नीच्या रुपात वाच्यता करून युद्धविराम घोषित करायचा.” – राजकुमारांनी सांगितलं.

चालुक्यकन्या राधिकाने यास मंजुरी दिली. आचार्यांनी ब्राम्हणांना बोलवून राजकुमार गोविंद व चालुक्यकन्या राधिका यांचा विवाह पार पाडला. दुसऱ्या दिवशी एका रथात बसून दोघेही मान्यखेतापासून दक्षिणेस असणाऱ्या तुंगभद्रेच्या काठी तहाच्या स्थितीत उभ्या असणाऱ्या चालुक्य व राष्ट्रकुट सेनेपुढे आले. चालुक्यांच्या वेगळ्या राज्याची व त्यांच्या विवाहाची घोषणा केली. चालुक्य सेनेचं नेतृत्व करत विजयादित्य हत्तीवर बसला होता. आपल्या सख्या बहिणीने पित्याच्या मृत्यूनंतरही राष्ट्रकुटांशी वैवाहिक संबंध आपल्याला अंधारात ठेऊन स्थापण केले हे ऐकताच त्याच्या क्रोधास पारावर राहिला नाही. त्याने कसलाही विचार न करता भाला उचलून थेट राधिकेच्या दिशेने भिरकावला. क्षणार्धात त्या भाल्याला त्याच्या मार्गातच छेदनारा दुसरा भाला राजकुमार गोविंदानी फेकला. शांतीप्रस्तावाचं रूपांतर युद्धात झालं. चालुक्यांनी तुंगभद्रेवर नारळाच्या खोडांचा सेतू बांधून तो लांघायला सुरुवात केली. आचार्यांनी राष्ट्रकुट द्वितीय सेनेस पाच वेळा शंखनाद करून विशिष्ट प्रकारचे आक्रमणाचे सूचन केले. त्याबरोबर राष्ट्रकुट सेना तुंगभद्रेच्या ऐलतीरावरील झुडुपात जाऊन लपली. चालुक्य सेनापती विजयादित्य हत्तीवरून उतरून घोड्यावर आला आणि त्याने तुंगभद्रा ओलांडली. त्याच्या मागोमाग एक एक करून सर्व चालुक्य सेना ऐलतीरावर येऊ लागली. गोविंदाच्या अफाट रणनीतीचा हा उत्तम नमुना होता. संख्येने मोठ्या असणाऱ्या सैन्यास नदी ओलांडायला जेवढा वेळ लागत होता, तेवढ्या वेळात राष्ट्रकुट सैनिकांनी चारही बाजुंनी त्यांना वेढा घातला. चालुक्यांसोबत आलेले राजमहेंद्रबर्मन वरील कौशल सैनिक मात्र ऐलतीरावरच राहिले. कौशलानी चालुक्यांच्या अगोदरच राष्ट्रकुटांशी व्यवहार केला होता. त्याच्या प्रित्यर्थ त्यांनी चालुक्यांसोबत छल केला आणि चालुक्य सेनेवर तिरांचा पाऊस सुरू केला. इकडून राष्ट्रकुट द्वितीय सेनेने अग्निबाणांचा वर्षाव करून राष्ट्रकुटांच्या सैन्यात अग्नितांडव माजवले. संधी मिळताच झुडुपातून बाहेर येऊन चालुक्यांच्या सेनेला त्यांनी सपासप कापायला सुरू केलं. राधिकास हा छल असह्य झाला मात्र एका राष्ट्रकुट राजकुमाराची विवाहिता पत्नी असल्याने तिला आता राष्ट्रकुटांच्या बाजूने ठामपणे राहणं क्रमप्राप्त होतं. शिवाय स्वतःच्या भावाने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने तो धोकासुद्धा तिला अगदीच धक्कादायक होता. शांतीप्रस्तावात पहिला वार तिच्या भावानेच काढल्यामुळे तिला राष्ट्रकुटांना दोष सुद्धा देता येत नव्हता. ती रथात अंगरक्षकांच्या मधोमध बसून राहिली. गोविंदा मात्र अत्यन्त त्वेषाने लढत होते. दोन्ही हातात तलवारी घेऊन ते पायदळी सैन्याचं नेतृत्व करत होते. विजयादित्य ने घोड्यावरून गतीने येत त्यांचा वेध घेतला. त्याच्या धावत्या घोड्याचा पाय गोविंदाने कापला. विजयादित्य जमिनीवर पडला. तसा धावत धावत तो गोविंदाच्या दिशेने आला. गोविंदाने क्षणाचाही विलंब न करता कट्यार त्याच्या दिशेने भिरकावली. त्याच्या गळ्याला चिरत कट्यारीने विजयादित्याचे मस्तक धडावेगळे केले. हे पाहून चालुक्य सेना थांबली आणि राष्ट्रकुटांना शरण आली. आचार्यांनी युद्धविरामाचा शंखनाद केला व युद्ध थांबलं.

रथातून राधिका उतरली. विजयादित्याची ती अवस्था पाहून तिला आपसूक दुःख होत होतं मात्र क्षत्रियधर्माची ती कर्मठ पाईक असल्याने तिने ते दुःख गिळलं. द्वितीय सेनेचा सेनापती भीम सुद्धा विजयादित्याच्या मृतदेहाजवळ आला. विजयादित्याचे व इतर सर्व मृत सैनिक, अश्व व हत्तींचे अंत्यसंस्कार करून सायंकाळी दोन्ही सैन्याने एकत्र भोजन केलं व तंबू टाकले. पेटत्या मशालींच्या प्रकाशात राजकुमार गोविंदानी सर्व सैन्यास पाचारण केलं. “द्वितीय सेनेचे सेनापती भीम सलकी हे चालुक्य माधवानंदांचे अनौरस पुत्र आहेत हे आपणा सर्वांना माहीत आहेच. चालुक्यांशी आमचं प्रेमाचं, घरचं नातं आहे. आमचे मेव्हणे विजयादित्य आमचे बालमित्र होते व आम्हास अत्यन्त प्रिय होते. मात्र राजद्रोहाला क्षमा नाही. म्हणून त्यांनाही नष्ट करणं कर्तव्य होतं. आमच्या भार्या, वीरांगना चालुक्यकन्या राधिका गोविंद राष्ट्रकुट यांना दिलेल्या वचनाला मी बांधील आहे. तुंगभद्रेपासून दक्षिणेस इथून पुढे चालुक्यांचे शासन असेल आणि भीम सलकी त्याचे राष्ट्रपती असतील. त्यांचे छत्र राष्ट्रकुटांचे असेल आणि त्यांची सेनासुद्धा. आजपासून ते राष्ट्रपती भीम सलकी चालुक्य म्हणून ओळखले जातील.” एवढे बोलून त्यांनी भीम सलकीस बोलावले. भीम सलकीने तलवार जमिनीत गाडून गुडघ्यावर बसून चालुक्य सेना व प्रांतास राष्ट्रकुट राज्यास समर्पित केले. गोविंदाने त्यास सन्मानाचा श्रीफळ व राजमुद्रा देऊन त्यास आधिकारीक राष्ट्रकुट राष्ट्रपती घोषित केले व पुढे बोलले, “त्याचप्रमाणे राजद्रोहाच्या विरोधातील या युद्धात महत्वाची कुटनीती पार पाडणारे कौशल शासक अमरेंद्र वर्मन यांनाही आंध्र प्रांताचे राष्ट्रकुट राष्ट्रपती घोषित करण्यात येत आहे.” अमरेंद्र वर्मन पुढे आले व त्यांनी गुडघ्यावर बसून आपला प्रांत, सेना व निष्ठा राष्ट्रकुटांना समर्पित केली. 1गोविंदाने त्यांनाही मानाचे श्रीफळ व राजमुद्रा देऊन पूर्व द्रविड प्रांताचे अधिकारीक राष्ट्रकुट राष्ट्रपती घोषित केले. अमरेंद्र वर्मन कौशल व भीम सलकी चालुक्य दोघांनीही तलवारी हवेत उचलून राजकुमार गोविंदाचा जयजयकार केला आणि त्यांना “प्रभुत्ववर्ष” या उपाधीने गौरवलं.

सैन्यात उत्साह वाढला. राजकुमार गोविंद आता केवळ राष्ट्रकुट राजकुमार राहिले नव्हते. जवळजवळ अर्धा द्रविड प्रांत त्यांनी स्वतःच्या बाजूने वळवून तिथली पूर्ण सेना जिंकली होती. या सेनेबरोबर आता या परिसरातील पन्नास टक्के कर सुद्धा थेट राष्ट्रकुटांच्या राजकोषात येणार असल्याने प्रतिहारांशी झालेल्या तहाची ही मोठी नुकसान भरपाई झाली.

परतीच्या प्रवासात आचार्यांनी मौन बाळगलं. एव्हाना इकडे महाराज ध्रुव धरावर्षांचं पार्थिव मान्यखेतामध्ये पोचलं सुद्धा होतं. राजकीय संस्कारात महाराज ध्रुवांचा अंत्यविधी पार पडला. मात्र यात वरिष्ठ राजकुमार  कम्बरस सामील नव्हते. प्रतिहारांशी लढत लढत ते गुर्जर प्रांतात पोचले होते. द्रविड प्रांतातील गोविंदाचा दिग्विजय त्यांना समजला होता. कंबरस आणि गोविंदमध्ये बालपणापासूनच थोडे कठीण संबंध होते. कम्बरसाचा कपटी स्वभाव कधीही कुणाच्या लक्षात आला नव्हता. राष्ट्रकुट परंपरेनुसार राजाचा उत्तराधिकारी सर्वोत्कृष्ट राजपुत्रास घोषित केले जात असे आणि नेमक्या त्यासाठी लागणाऱ्या सर्व कसोट्यांवर गोविंद कम्बरसाहून श्रेष्ठ ठरत होते. कम्बरसाने प्रतिहारांच्या मदतीने बालाघाट भेदून मान्यखेतावर आक्रमण करण्याची योजना बनवली. गोविंदास मारून कंबरसास स्वतः राजा बनायचे होते. मात्र गोविंदास याची चाहूल लागली होती. महाराज ध्रुवांच्या अंत्यविधीनंतर त्यांच्या विधवा व गोविंदांच्या माता, राजमाता सरस्वतीदेवी यांच्याकडे शासकीय अधिकार व उत्तरदायित्व सोपवून राजकुमार इंद्रकेशव व गोविंद गुर्जर प्रांताकडे निघाले. बालाघाट व सह्याद्रीची दंडकारण्य रक्षण सेना घेऊन ते प्रतिहारांवर थेट तुटून पडले. घनघोर युद्धामध्ये गोविंदाने नागभट्ट प्रतिहारला तर इंद्रकेशवाने राजद्रोहासाठी स्वतःच्या भावास, कम्बरसास रणांगणात ठार मारले. प्रतिहारांकडून सुद्धा त्यांनी गुर्जर प्रांत राष्ट्रकुट छत्रामध्ये समर्पित करवून घेतला. मान्यखेतास परत येताच त्यांनी राजधानीचे मयुरखंडी येथे स्थलांतरण केलं. पुढे काही दिवसात राजकुमार गोविंद तृतीय यांचा राज्याभिषेक होऊन ते राष्ट्रकुट घराण्याचे नवे शासक झाले. चालुक्यकन्या राधिका आता महाराणी राधिका राष्ट्रकुट झाल्या. महाराज गोविंद राष्ट्रकुट संपूर्ण भारतवर्षावर एकछत्र राज्य आणण्याच्या मोहिमेला सतत जात असण्याने महाराणी राधिकांनी त्यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रकुट साम्राज्याची शासनव्यवस्था चोख पार पाडली.

गुर्जरनंतर कंनौजला परत एकदा मोहीम घेऊन महाराज गोविंद गेले. कंनौज येथेसुद्धा राजा चक्रयुद्ध यास राष्ट्रकुट साम्राज्यात सामील करून घेतले. त्यालादेखील राष्ट्रपतीपदी नियुक्त करून राष्ट्रकुट साम्राज्याच्या सीमा हिमालयापर्यंत वाढवल्या. महाराज गोविंदांच्या घोड्याने सप्त हिमनद्यांचं, सिंधुचं, गंगेचं, यमुनेचं तर पाणी प्यायलच, मात्र गौडवर आक्रमण करून पाल घराण्यासही राष्ट्रकुट साम्राज्याच्या छत्रामध्ये समर्पण करवून ब्रह्मपुत्रेचही पाणी महाराज गोविंदांच्या घोड्यानी चाखलच. मगध साम्राज्याला देखील राष्ट्रकुट छत्रामध्ये त्यांनी आणलं. हिमालयापासून ते कावेरीपर्यंत शासन जमताच चोळानाही राष्ट्रकुट एकछत्र साम्राज्यात सामील करून त्यांनी राष्ट्रकुट साम्राज्य कन्याकुमारी व रामसेतू पर्यन्त वाढवलं. चोळांच्या अधीन असणारा सिंहल देश सुद्धा पुढे चालून महाराज गोविंदांच्या छत्रात आला. आसेतुसिंधु एकछत्री राज्य स्थापन करण्याचं त्यांचं स्वप्न त्यांनी केवळ 20 वर्षात साकारलं. करत करत विक्रम संवत 870, इसवी सन 813 आलं. विदेशी व्यापार सर्वोत्तम पातळीवर आला होता. राष्ट्रकुट राजकोषात धनाची मोठी वृद्धी झाली होती. आचार्यांना दिलेल्या वचनाला जागत महाराज गोविंदानी अगोदरच विक्रमशीला, तक्षशिला व नालंदा विश्वविद्यालयांमध्ये स्थापत्यशैली च्या विकासासाठी धनदान केले. तिथून स्थापत्यकलेत स्नातक झालेले 800 अभियन युवक त्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात पाठवून जागोजागी मंदिरं, विद्यालयं, बंधारे, मार्गिका, शिलालेख आणि गडकोट बनवले. जगाच्या शोधार्थ यात्रींना पाठवण्यासाठी मार्गदर्शनाची गरज होती. आचार्य सूर्यदेव गुप्त मात्र तुंगभद्रा लढाई नंतर कुणाशीही बोलले नाहीत. राजधानी मयूरखंडी येथे स्थलांतरित झाली तरीही त्यांनी मान्यखेतामध्ये राहणं कायम ठेवलं. त्यांच्या सेवेत महाराज गोविंदानी अनेक सेवक नेमले होते. आचार्य मात्र अधिकाधिक काल गुप्त अभ्यासिकेतच ध्यानस्थ राहू लागले. दिग्विजयांची मालिका संपवून महाराज गोविंद आचार्यांना भेटण्यासाठी मान्यखेतास आले. त्यांच्या डोक्यावर मुकुट होता. त्यांनी तो आचार्यांच्या पायावर ठेवला आणि म्हटले, “आचार्य, आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे दिग्विजय मिळवण्यासाठी आम्हास मोहिमेवर जावे लागले. आपले दर्शन गेल्या 20 वर्षात एकदाही झाले नाही. या भारतखंडावर एकछत्र साम्राज्य आणण्यासाठी आम्ही रक्ताची, घामाची होळी खेळली आचार्य. आता राजसूय यज्ञ करून राष्ट्रकूटांचे अश्वमेध आपल्याला दिलेल्या वचनाप्रमाणे जगभरात रवाना करायचे आहेत. त्या सर्व अश्वमेधांवर उन्मादक संदेश देण्याऐवजी मैत्रीची संधी पाठवण्यात येईल. जगाच्या अभ्यासासाठी राष्ट्रकुट कटिबद्ध आहेत.”

आचार्यांनी मौनव्रत तोडत सांगितलं, “एका कल्पनेतील कथा असुदे किंवा प्रत्यक्ष कुरुक्षेत्र, धर्म हाच की आपले कर्म निष्ठेने करावे. तुला तुझ्या कर्माची अनुभूती झाली आहे. हे कर्म निष्काम करत राहा. आपल्या दोघांनाही लवकरच या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. एका जन्मात साध्य होईल एवढा आपला धर्म छोटा नाही. काहीशा भूमीवरील दिग्विजयाने पूर्ण होईल एवढं मर्यादित कर्तव्य नाही. मनुष्यजन्मी येऊन काही सहस्त्र मैलाच्या प्रदेशावर राज्य करून, चार शुभ काम केल्याने तू जगज्जेता होत नाहीस. राजन, परमात्म्याची तुझ्यासह सर्वांवर समान कृपा आहे. तुझ्या या जन्मातील क्षमतेत जे जमेल ते तू केलंस. परत एकदा या पुण्यभूमीवर शत्रू माजतील तेव्हा प्रजेच्या रक्षणार्थ त्यांचा विनाश करून मानवतेला आणखी नव्या शिखरावर नेण्यासाठी तुला यावंच लागेल.”

महाराज गोविंदांनी अत्यन्त विस्मयादी व काहीशा भयभीत चेहऱ्याने विचारलं, “आचार्य, आपण कोण आहात?”

“हाच प्रश्न एका गुरूने आपल्या शिष्यास केला तेव्हा त्याचे उत्तर देताना जे वर्णन शंकराचार्यांनी केलं त्यास निर्वाण शतकं म्हणतात. राजन, तुझ्या विद्याभ्यासात जेव्हा समाधी अवस्था शिकवण्यात अली होती ती कशासाठी? प्रत्यक्षात तू आणि मी दोन वेगळी मनुष्य असलो तरीही तू ध्वनी आहेस आणि मी निनाद. मी सूर्य आहे आणि तू प्रकाश. तू समुद्र आहेस आणि मी जल. मी अग्नी आहे तर तू दाह. राजन, आपलं वेगळं असणं हा केवळ आभास आहे. आपण आहोत एकच. आपलं गंतव्य देखील एकच.” आचार्यांनी प्रतिपादन केलं.

“पण मग आचार्य, इतक्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये मध्ये आपला मनुष्यजन्म का झाला? जर आपण एकच असू तर आपली ही वेगळी रूपे का?” महाराजांनी विचारलं.

“राजन, हे सर्व दृष्य-अदृश्य ब्रह्मांडच एक मायास्वरूप आहे. आणि या मायेतील अस्तित्वाची जाणीव असणारी रचना म्हणजे मनुष्य. मनुष्याचं उद्दिष्ट हे परमसत्याकडे जाणं आणि याच अस्तित्वाचा शोध घेणं. हे करत असताना कर्मयोगाचं पालन आणि कर्माचे सर्व भोग भोगल्याशिवाय गंतव्य सिद्ध होत नाही राजन. यातच मनुष्य पथभ्रष्ट होतो. अधर्म वाढतो. त्यामुळे मनुष्यजीवनाच्या ज्या क्षेत्रात अधर्म आहे तिथे मलाही यावं लागतं आणि तुलाही. हे येणं केवळ जन्माला येऊन सिद्ध होत नाही. ते साकारावं लागतं. अनेक जन्मांमध्ये मिळून साकारावं लागतं. त्यामुळे या जन्मात जरी आपण हे असे गेलो तरीही मोक्षप्राप्ती नंतर मला भेटशीलच पण तोवर ना मला सुटी असेल ना तुला. आजपासून 800 वर्षांनी तू तुंगभद्रेच्या काठी असणाऱ्या राज्याचा राजा असशील आणि तेव्हा मी तुझा प्रधान असेन. त्याचनंतर शतकभराने तू माझा मुलगा असशील आणि त्याजन्मी मी तुझी आई बनून तुझ्यासह एक संपूर्ण स्वराज्य घडवेन. या आधीदेखील उन्मत्त मगध सम्राटास पायउतार करवुन मीच तुला राजा बनवलं होतं. आणखी एक सहस्त्र वर्षानंतर याच भारतभूमीच्या रक्षणार्थ मी आणि तू परत एकदा अवतरणार. जगभरातील महायुद्धांच्या मालिकांवर बंधन आणण्यासाठी मीच एक सर्वविनाशक अस्त्र बनवणार. जगाच्या कुठल्या कोपऱ्यात जर शोषण असेल आणि कुठे चंगळवाद, तर मीच धनी राजसत्तांमध्ये युद्ध घडवून विचारवंतांना जन्म देणार. क्रांतिकारकांच्या मनातील ज्योत मी, आणि त्यांचं उद्दिष्ट तू. संतांची वाणी तू, तर त्यांची समाधी मी. शास्त्र तू तर वेद मी, तंत्र तू तर ज्ञान मी. तू शोध आणि मी जिज्ञासा. तू जिव्हा आणि मी तुझी भाषा. अनेकवेळी एकच एक सर्वत्र सर्वज्ञ मी, एकाचवेळी अनेक ठिकाणी सर्वत्र साकारही मी. त्या मूर्त स्वरूपात बघण्याची दृष्टी असशील तू आणि मूर्त, अव्यक्त सर्वच ठिकाणी एक विशुद्ध मी. मोठ्या ताऱ्यांची टक्कर होऊन उत्पात ब्रह्मांडी माजवतो, शिशुच्या मुखात सुद्धा ते ब्रम्हांड सामावतो. आदी व अंताच्या मायेपलीकडे मी आहे आणि त्या मायेपलीकडे माझ्यातच तू अविभाज्य सामावला आहेस. जेव्हा जेव्हा धर्म व मानवतेवर संकट येईल तेव्हा तेव्हा मी अवतरणार. कधी सृष्टीच्या कोड्याला उलगडण्यासाठी गणित व शास्त्राचा विकास करायला, तर कधी शोषितांच्या हक्कांसाठी लढायला, कधी कलेचा विकास करण्यासाठी तर कधी उन्मत्त शासकास धडा शिकवण्यासाठी तुझ्यासह मी अवतरणार. प्रत्यक्षात तू आणि मी वेगळे नाहीतच राजन. तू कर्म करण्यासाठी व मी तुला त्या कर्माच्या रथाला पुढे नेण्यासाठी वेगवेगळ्या रुपात अवतरणार. कलियुगात परमेश्वराचे साक्षात दर्शन शक्य नाही, कारण आपल्याच अनुभूतींमधून जागृत होत होत एक दिवस कल्की येणार. त्या कल्कीच्या महावताराचे आपण अंशमात्र असू राजन. अनुभूतीच्या कुळाचे भगवान सुद्धा वंशमात्र असतील राजन. कलियुगात अंध:कार दरवेळी जिंकणार पण आपलं कर्म अनुभूतींच्या मालिका सुरू ठेवण्याचं आहे. अधर्म व अंध:काराचा सर्वनाश करण्यासाठी कल्की बनून एक दिवस आपल्यालाच यायचं आहे.

परित्राणाय साधूनां, विनाशय च दुष्कृताम। धर्मसंस्थापनार्थाय, सम्भवामि युगे युगे।।

एवढं बोलून आचार्य तिथून अचानक, क्षणार्धात नाहीसे झाले. तिथे फक्त आता एक मोरपीस पडलेलं होतं.

समाप्त!

  • The DPM

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *