वर्ष 2018.

farzand pavankhind pavankhind sher Shivray Movie poster

एक जण येतो, त्याला आपण D म्हणुया. अनेक वर्ष केवळ मालिकांपुरता मर्यादित राहिलेला इतिहासाचा विषय मोठ्या पडद्यावर मार्वेल च्या धाटणीवर हा D युनिव्हर्स बनवून मांडायला लागतो. सुरुवातीच्या दोन चित्रपटांमधून यश म्हणावं तितकं आलं नसलं आणि बजेटही जेमतेमच असलं तरीही मांडणी, अभिनय, दिग्दर्शन उत्तमरीत्या सादर करून आणि विशेषतः इतिहासाचा सखोल अभ्यास करून हे चित्रपट बनवले असल्याने यात जान राहते, आणि प्रेक्षक त्याच्या तिसऱ्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतात. कोरोना नंतर 2022 मध्ये तो चित्रपट येतो, बजेट आणि तांत्रिक बाबी अजूनही कमजोर असल्या तरी मागच्या दोन सिनेमांपेक्षा हा कैकपटीने अधिक चांगला निघतो व तुफान यशस्वी होतो.

दरम्यान हेच हेरून मराठीतला एक मोठा यशस्वी दिग्दर्शक, त्याला आपण P म्हणुया, मोठ्या बॅनरखाली असाच एक सिनेमा आणतो, जो तांत्रिकदृष्ट्या तर या तीन सिनेमांना पुरून उरतो, पण इतिहासाचा जो भक्तिमय अभ्यास त्या D ला दाखवता आला तो या P ला दाखवता आला नाही. तरीही, भरपूर “मास” आणि डायलॉग्ज चा मसाला ओतल्याने महत्वाचं म्हणजे कास्टिंग चांगलं केल्याने हाही सिनेमा चालतो.

sarsenapati hambirrao har har mahadev shivpratap garudjhep movie poster

त्या D ची एका मालिका बनवणाऱ्या दिग्दर्शकासोबत, याला आपण A म्हणुया, शाब्दिक चकमक होते आणि हा A खुन्नस मध्ये म्हणून की काय, बरोबर त्याच विषयावर सिनेमा बनवतो ज्याची घोषणा या D ने त्याच्या चौथ्या सिनेमात केलेली असते. A हा सिनेमा फक्त दोन तीन महिन्यात बनवून रिलीज करतो. सिनेमा आपटतो. दरम्यान या D ने सुद्धा काळ वेळ आणि संयम काहीही न पाळता तिसरा सिनेमा झाल्याच्या तीन महिन्यांचा आत चौथाही सिनेमा रिलीज केलेला असतो. एका मोठ्या दाक्षिणात्य सिनेमाच्या वादळात तो अत्यंत महत्वाचा असणारा चौथा सिनेमा सुद्धा कुठल्या कुठे हरवतो. हा चौथा सिनेमा तांत्रिकदृष्ट्या त्या तिसऱ्याच्याच जवळपास असल्याने तिसऱ्या सिनेमाला जे प्रेक्षकांनी भरभरून दिलं ते यांनी कुठं घातलं हा प्रश्न पडतो, पण मग त्यातला एक कलाकार म्हणतो की तिसरा व चौथा दोन्ही सिनेमे एकत्र बनून तयार होते. ठीक आहे, मान्य केलं, आता पाचव्या मध्ये तरी बजेट नीट लावतील अशी अपेक्षा.

या दरम्यान आणखी दोन तीन दिग्दर्शक याच विषयांवर असेच सिनेमे आणण्याचं जाहीर करतात. त्यातला एक तर कमालच करतो, चक्क एका माकडउड्या मारणाऱ्या हिंदी कलाकाराला महत्वाच्या भूमिकेत कास्ट करतो. दरम्यान D ने केलेल्या त्या सुपरहिट तिसऱ्या सिनेमाची तांत्रिकदृष्ट्या सक्षम मात्र ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत भिकार आवृत्ती दिवाळी मध्ये रिलीज होते. त्यात मुख्य भूमिकेत असलेला कलाकार त्या कॅरेक्टर ची तर आब घालतोच, स्वतःची सुद्धा घालतो. त्यावर राजकीय वाद सुद्धा होतात. सिनेमा मात्र दिवाळी मुळे हिट जातो.

आता या दोनचार सिनेमांचं यश पाहून अनेक दिग्दर्शक यात उड्या मारतात व याहीवर्षी असे सिनेमे यायला लागतात. मग कुठे घोगऱ्या गळ्याची गोरीपान नटी एका ऐतिहासिक मर्दानीची भूमिका करणार हे कळतं, कुठे D च्या पाचव्या सिनेमाचं शूटिंग तीन महिन्यात आटपल्याचं कळतं. कुठे P आणखी तीन सिनेमे त्या महत्वाच्या तगड्या कलाकाराला मुख्य भूमिकेत घेऊन करत असल्याची खबर मिळते तर कुठे A अजूनही स्वस्तातल्या मालिका आणि त्याच सेट व बजेट वर सिनेमा बनवत असल्याचं हलकं कानावर येतं.

PS1 AND PS2 Movie Poster

तामिळनाडूच्या इतिहासात तब्बल दीड हजार वर्ष चोल घराण्याचं नाव येतं. 1950 च्या दशकात पाच कादंबऱ्या सुद्धा प्रकाशित होतात ज्यामध्ये इतिहास व कल्पकतेमधून तमिळ लोकांच्या मनामनात चोल घराणं अजरामर होतं. तेव्हाच यावर सिनेमा बनवण्याचं अनेकांचं स्वप्न होतं मात्र तरीही 64 हून अधिक वर्ष हे स्वप्न पूर्ण होत नाही. खुद्द मणिरत्नम, ज्याने शेवटी सिनेमा बनवला, त्यालाही अगोदर 3 वेळा अपयश येतं. पण जेव्हा मागच्या वर्षी त्याने पोंनियीन सेल्वन बनवला, केवळ तामिळनाडू मध्येच त्या सिनेमाने 400 कोटीचा धंदा केला. त्यांचे सर्व मोठे कलाकार व दिग्दर्शक अमेरिकेत ह्युस्टन ला झालेल्या त्या सिनेमाच्या ट्रेलर व म्युझिक लाँच ला हजर होते.

तो सिनेमा दोन भागांमध्ये बनला, बाहुबली ची कॉपी करण्याचा त्यांनी प्रयत्न सुद्धा केला नाही. उलट action scenes जमतील तेवढे रियलिस्टिक ठेवले त्यांनी. पहिला भाग जर सोनं असेल तर दुसरा भाग अगदी रत्नांची खाण निघाला. कलाकारांचा अभिनय इतका सुंदर की प्रत्यक्ष ते चोल घराण्याचे लोक आहेत की काय असा भास होऊ लागला. बारकावे इतके, की अगदी त्या राजकुमारीच्या अंगावरील दागिने सुद्धा खरे सोन्याचे वापरले त्यांनी. एवढंच नव्हे, तर त्या काळचे सांस्कृतिक धागे, त्या काळच्या लोकांचे उद्योग, आपसातील संबंध सुद्धा प्रचंड बारकाईने दाखवले गेले आहेत. तब्बल 500 कोटी बजेट मध्ये हे दोन सिनेमे त्यांनी बनवले. संपूर्ण तमिळ फिल्म इंडस्ट्री या एका प्रोजेक्ट पुढे एकवटली.

आपल्या इतिहासात काल्पनिक मिरची मसाला घालण्याची तसूभरही गरज नाही इतका रोमांचक इतिहास आहे. जवळजवळ 250 वर्षांच्या कालखंडात मराठ्यांचे पराक्रम सांगावे तेवढे कमी आहेत. कसलाही वाद न करता छ्त्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी, बाळाजी विश्वनाथ, बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, माणकोजी शिंदे ते थेट झाशीची राणी व छत्रपती शाहू महाराजांपर्यंत एक चांगली, बिग बजेट, तांत्रिकदृष्ट्या सक्षम, उत्तम अभिनित व दिग्दर्शित अशी चांगली Pan India चित्रपट मालिका आपल्याला बनवता येणार नाही का? की जनतेच्या भावनांशी खेळून चिल्लर गोळा करण्यातच आमचे दिग्दर्शक धन्य आहेत? सुबोध भावे आणि अक्षय कुमार सारख्यांना महाराजांच्या भूमिकेत दाखवून मराठी प्रेक्षकांच्या माथी कुठलं पाप मारताय? बजेटच्या बाबतीत विड्याला चुना फासून तेच ते प्रकार कुठवर बघायचे आम्ही? मालिकेत दाखवतात तशी पटकथा व सेट्स, पोट सुटलेले कलाकार महाराजांच्या भूमिकेत हे का सहन करावं आम्ही तिकिटाचे पैसे देऊन? मसालेदार बनवण्यासाठी अनैतिहासिक गोष्टी सिनेमात घुसवून थेटर मध्ये टाळ्या शिट्ट्या किती दिवस मिळतील? तुम्हाला जाणीव तरी आहे का की तुम्ही कुठला विषय हाताळताय? तुमच्यापेक्षा चांगलं तर पोवाडे आणि भारुडांमध्ये स्टोरीटेलिंग केलं जातं. तुमचे हे असले थोतांड सिनेमे बघण्यापेक्षा चौथीचं इतिहासाचं पुस्तक पुन्हा पुन्हा वाचून जास्त ज्ञान आणि मजा दोन्ही येईल. तुमच्या या मसालेदार चित्रपटांपेक्षा अंगावर रोमांच आणणारी व्याख्यानं जास्त चांगली आहेत. सुधरा रे मराठी दिग्दर्शकानो, नका मराठी प्रेक्षकाला गृहीत धरू, अन्यथा तुमचे चांगले सिनेमे सुद्धा चालणार नाहीत आणि नेहमीप्रमाणे त्याचं खापर तुम्ही प्रेक्षकांवर फोडाल आणि स्वतः हिंदी सिनेमात कुठे साईड रोल मिळतो का म्हणून प्रोड्युसर्सचे उंबरे झिजवाल.

Warm Regards,

Dnyanesh Make “The DPM”


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *