oppenheimer poster

अमेरिकन शास्त्रज्ञ ज्युलियस रॉबर्ट ओपनहायमर याच्या जीवनावर आधारित हा हॉलिवूड चित्रपट नुकताच जगभरात प्रदर्शित झाला. हॉलिवूड जगतात, आणि संभवतः जगभरात प्रख्यात असणाऱ्या ख्रिस्तोफर नोलन या दिग्दर्शकाने या चित्रपटाची धुरा सांभाळली आहे. पुलित्झर विजेते काई बर्ड व मार्टिन शेर्विन लिखित “अमेरिकन प्रोमेथियस: ट्रायम्फ ऍन्ड ट्रॅजेडी ऑफ जे रॉबर्ट ओपनहायमर” या चरित्र पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. ओपनहायमरच्या मुख्य भूमिकेत हॉलिवूड चा सुप्रसिद्ध अभिनेता सिलियन मर्फी असून मॅट डेमन, रॉबर्ट डाऊनी ज्युनियर सारखे अनेक तगडे अभिनेते सुद्धा या सिनेमात आहेत.

दिग्दर्शक नोलन बद्दल

हॉलिवूड दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन त्या तुरळक लोकांपैकी एक आहे जो चित्रपटाला व्यवसाय म्हणून पाहत असताना आपल्या प्रेक्षकांना उत्कृष्ट अनुभव कसा येईल याची पुरेपूर काळजी घेतो. असं करत असताना त्याचे चित्रपट इतके गुंतागुंतीचे आणि समजण्यास अवघड असतात की बरेच वेळा एकदा बघून भागत नाही. द प्रेस्टिज, बॅटमॅन ट्रायलॉजी, इन्सेप्शन, डंकर्क सारख्या सिनेमांमधून नेहमीच काहीतरी भन्नाट, अफलातून दाखवत असताना त्याच वेळी मानवी भावनांच्या कसोटीवर इतक्या सहजगत्या नोलन ने कथांची मांडणी केलेली आहे की क्लिष्ट विषय, अत्यंत गुंतागुंतीची व कधीच सरळ रेषेत न जाणारी कथा, संभवतः प्रत्येक वेळी विचारही केले नसतील असे कथानक असताना देखील प्रेक्षकांना नोलन ची चित्रपटातील दुनिया नवखी किंवा परकी वाटत नाही. इंटरस्टेलर तर आजही जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणावा इतका परफेक्ट आहे. यातील डंकर्क काही प्रमाणात अपवाद आहे कारण तो सत्य घटनेवर आधारित आहे.

ओपनहायमरच्या निमित्ताने प्रथमच नोलन ने चरित्रपट अर्थात बायोपिक बनवलाय. अरेखिय कथन अर्थात नॉन लिनियर स्टोरी टेलींगच्या त्याच्या खास शैलीची इथेही आपल्याला मेजवानी मिळते. शास्त्रज्ञ ओपनहायमर याने अण्वस्त्रांचा शोध लावून जगातील पहिली अण्वस्त्र चाचणी घडली त्या मॅनहॅटन प्रोजेक्ट ची धुरा सांभाळली. थोडक्यात पहिली अण्वस्त्र घडवणारा हाच तो शास्त्रज्ञ. कथेची पार्श्वभूमी इतकी मोठी आणि व्यापक आहे की तुम्हाला त्याचं वरवरचं ज्ञान हे केवळ वर्षानुवर्ष शाळा महाविद्यालयांपासून ते पार मित्रांसोबत रंगलेल्या गप्पाटप्पा मधून casually आलेलं असेल तर तुम्ही कथेला किमान समजू शकता.

ओपनहायमरच्या कथेमागची पार्श्वभूमी

जगाची तत्कालीन राजकीय, सामाजिक, वैचारिक परिस्थिती, विज्ञानाच्या, विशेषतः पदार्थ विज्ञान अर्थात फिजिक्सच्या रुंदावणाऱ्या कक्षा नवनवीन वैज्ञानिक शोध घडवून आणत होत्या. युरोप अमेरिकेत अनेक नावाजलेल्या वैज्ञानिकांची मांदियाळी अगदी रोज नवीन शोध लावल्यासारखी व्रतस्थ होती. यात निल्स बोर पासून ते हायजनबर्ग आणि रिचर्ड फाईनमन पासून ते प्रत्यक्ष आईन्स्टाईन पर्यंत अनेक जणांचं योगदान होतं.

याच विज्ञानाचा गैरवापर करून अण्वस्त्र बनवण्यासाठी पहिला प्रयत्न हिटलरने सुरू केला. हा काळ पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या बरोबर मधला. दुसऱ्या महायुद्धाच्या वादळापूर्वीची ही जणू शांतता होती. हिटलरच्या सर्वश्रुत राक्षसी वृत्तीमुळे जर्मनीतील काही शास्त्रज्ञांनी आईन्स्टाईनच्या मदतीने ही बातमी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांच्यापर्यंत पोचवली. रुझवेल्ट यांनी निर्णय घेतला की हिटलरच्या अगोदर अमेरिकेने अण्वस्त्र बनवायचे. हे सगळं प्रचंड गोपनीयता राखत करायचं, इतकी की ही गोष्ट राष्ट्राध्यक्ष, शास्त्रज्ञ, सैन्यदलातील उच्चपदस्थ अधिकारी सोडता कुणालाही माहित नव्हती, अगदी उपराष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनाही. रुझवेल्ट यांच्या निधनानंतर जेव्हा ट्रुमन राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांना ही गोष्ट समजली.

हे होईपर्यंत शास्त्रज्ञ म्हणून ओपनहायमरचा कसा प्रवास राहिलाय हे चित्रपट पाहिल्यावर तुम्हा सर्वांना कळेलच. यात त्याच्यावर असणारा साम्यवादी विचारांचा प्रभाव, त्याचे अमेरिकन साम्यवादी नेत्यांसोबत असणारे संबंध, स्टॅलिन प्रणित सोव्हिएत रशियाची हेरगिरी या सर्व गोष्टी सुद्धा पार्श्वभूमी मध्ये थोड्याशा अवगत असणं गरजेचं आहे.

समीक्षा

आता येऊ चित्रपटावर. IMAX कॅमेऱ्याने शूट झालेला हा चित्रपट शक्यतो IMAX थिएटरलाच बघावा. महत्वाचं म्हणजे सिनेमात एकही CGI निर्मित सीन नाही. त्यामुळे अणुस्फोट घडतो ते दृश्य IMAX स्क्रीन वर न भूतो न भविष्यति असा अनुभव देऊन जातं. लुडविग गोरांसनचं पार्श्वसंगीत हादरवून सोडणारं, अंगावर काटा आणणारं, खुर्चीला खिळवून ठेवणारं आणि प्रसंगी रडवणारं सुद्धा आहे. यात सीलियन मर्फी, रॉबर्ट डाउनी ज्युनियर आणि फ्लॉरेन्स पुघ या तिघांचा अभिनय काळजाला भिडणारा आहे. सिलीयन मर्फी ने मुख्य भूमिका ऑस्कर जिंकण्याजोगी साकारली आहे. भावनांचे अनेक कंगोरे त्याने इतके चपखल साकारलेत की स्क्रीनवर सुरू असणाऱ्या संवादापेक्षा पात्राच्या मनात काय सुरु आहे त्याकडे आपण जास्त लक्ष देतो. फ्लॉरेन्स पुघ ने साकारलेली जीन टेटलॉक प्रसंगी रडवते सुद्धा.

चित्रपटाचं कथानक एकाच वेळी ओपनहायमरचा जीवन प्रवास, त्याचा भूतकाळ, अण्वस्त्र चाचणी नंतर त्याच्यावर राजकीय उद्देश्याने बसलेली चौकशी समिती, त्यानंतर भरलेला खटला आणि अण्वस्त्राचा शोध व चाचणी या व अशा अनेक आघाड्यांवर चालते. एक क्षणही विचलित न होता हा चित्रपट पाहावा लागतो.

चित्रपटातील संवाद हा आणखी महत्वाचा स्तंभ आहे ज्यावर हा सिनेमा अगदी सक्षमपणे उभा आहे. यातील एकूण एक डायलॉग येणाऱ्या काळात अगदी म्हणींसारखा वापरला जाईल यात शंका नाही.

महत्वाचे तीन सीन्स (Spoiler Alert)

चित्रपटातील तीन दृश्य खास प्रभाव सोडतात. पुढे वाचण्याच्या अगोदर, तुम्ही अद्याप चित्रपट पाहिला नसेल तर हा पॉइंट स्क्रोल डाऊन/स्किप करा कारण यात स्पॉइलर्स आहेत. पहिलं दृश्य म्हणजे ओपनहायमर आणि जीन मधील सुरुवातीचा संवाद ज्यात विचारधारेशी निष्ठा असणं आणि गुलामी असणं यात किती फरक असतो आणि वस्तुनिष्ठ आकलन करून स्वतंत्र विचार कसा करावा हे इतकं वेगळ्या ढंगात आणि इतक्या चपखलपणे मांडण्यात आलय की त्याचे एकाच वेळी अनेक अर्थ निघतात. एक सीन ज्यामध्ये हिरोशिमा आणि नागासाकी वर अणुबॉम्ब पडल्यानंतर ओपनहायमर भाषण देत असतो आणि एकाच वेळी भाषणात जहरी राष्ट्रवादी भाषेचा वापर करत असताना त्याला नजरेसमोर मात्र अणुस्फोट आणि त्याची भीषणता दिसत असते. एक आणखी सीन आहे जिथे राष्ट्राध्यक्ष ट्रुमनशी झालेल्या संवादात हिरोशिमा व नागासाकी बद्दल ओपनहायमर हळहळ व्यक्त करतो. तेव्हा ट्रुमनच्या बोलण्यातून राजसत्ता कशी शोध व निर्मितीच्या शक्तीचा गैरवापर करते हे आपल्याला दिसून येतं.

त्रुटी व चुका

असं नाही की चित्रपटात काही त्रुटी नाहीत. तीन तासांची अत्यंत लांबलचक मांडणी असल्याने डोळ्यांना क्षीण येऊ शकतो. ओपनहायमर यांचा संस्कृत व भगवद्गीतेचा गाढा अभ्यास होता. त्याचा संदर्भ देत असताना तो जीन सोबत होत असणाऱ्या सेक्स सीन मध्येच का दिला हे कळायला मार्ग नाही. मुळात दिग्दर्शक नोलन यांना भारताचं विलक्षण आकर्षण आहे, ते त्यांच्या अगोदरच्या चित्रपटांमधून  या-न-त्या प्रकारे दिसतं, जसं की टेनेट मध्ये दाखवलेलं मुंबई शहर आणि एक अत्यंत महत्वाचं भारतीय पात्र, इंटरस्टेलर मधील भारतीय वायुसेनेचं विमान, बॅटमॅन बिगिंस आणि द डार्क नाईट रायजेस मधील रास अल घुल च्या त्या कैदखाण्याचं जयपूर मध्ये झालेलं शूटिंग वगैरे. एकंदरच या माणसाला गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे हे माहीत नसण्याचं कारण नाही, मग अशा सीन मध्ये दाखवून शंभर कोटी लोकांच्या धार्मिक भावनांचा अनादर नोलन ला करावासा वाटला असेल? नोलन डाव्या आणि भारताचा द्वेष करणाऱ्या अमेरिकी लोकांपैकी नक्कीच नसल्याने हे त्याने जाणीवपूर्वक केलं असेल असं वाटत तर नाही, परंतु या सीनला विचारपूर्वक लिहायला हवं होतं हे नक्की.

हा ओपनहायमर चित्रपट एकंदरच या शतकातील, नव्हे आजवरच्या सर्व चित्रपटांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा व सर्वात उत्कृष्ट कलाकृतींपैकी एक असून, जमल्यास IMAX मध्येच हा सिनेमा बघावा. आमच्याकडून या चित्रपटास 4.5/5.

Warm Regards,

Dnyanesh Make The DPM


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *