नसते संभाजीनगर देशात, 
लाहोरची हळहळ लातूरसाठी असती
जशी बलोचची हिंगलाज माता आज नशिबी नाही 
तशीच नशिबी रेणुकाई अन् तुळजाभवानीही नसती
जरी आहे अमरनाथ काश्मीरच्या बर्फाळ डोंगरामध्ये
घृष्णेवर, नागनाथ अन् वैजनाथाच्या कळसावर कुऱ्हाड चालली असती
असता भारताच्या पोटात दक्षिण पाकिस्तान
जर आमच्या आज्या पणज्याने नसता वाहिला या मराठवाड्यासाठी प्राण

त्या वेरूळ अन् अजिंठाची बामियान सम असती गत
अन् नांदेडच्या त्या गुरुद्वाऱ्याची काय असती धडगत
नसता दक्षिण गंगेचा लाभला तुम्हास किनारा
नसता बालाघाट डोंगरातील फुललेला मयूर पिसारा
अरे राहिला असता का महाराष्ट्राचा सांस्कृतिक अभिमान
जर आमच्या आज्या पणज्याने नसता वाहिला या मराठवाड्यासाठी प्राण


तिसरा डोळा महादेवाचा जणू उघडला तिन्ही ज्योतिर्लिंगातून
अन् नृसिंह भगवान सुद्धा आले बिदरच्या त्या झरणी गुफेतून
कोपली भवानी तुळजापुरातून पोलोचा गोंधळ खेळण्या
रझाकार राक्षस मारण्या अन् निजामास निर्दाळण्या
भाग्यनगरची भाग्यलक्ष्मी बनली भारतमाता
रक्ताने लिहिली हैद्राबाद मुक्तीसंग्राम गाथा
दंडकारण्य हे गोदातीराचे परतुनी भारतात मांडे ठाण
सार्थकीच लागला आमच्या आज्या पणज्यांचा प्राण!

-	The DPM

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *