श्री तुळजाभवानी Image
झालों जानकिच्याविणें थकीत मी आरण्य कंठावया
कौसल्येपरि धांवुनी आलिस या रामासी भेटावया
हा-हा काय! अजी, जगात जननी त्वां धन्य केले मला
माझा हा प्रणिपात आई तुळजाबाई, तुकाई तुला 

कौसल्येहूनि कैकयी जननीचा आभार हा केवढा
झाला दर्शनलाभ निश्चय जिच्या कोपामुळे एवढा
केलें सत्य तिनें कृतार्थ मजला या दाविले पाउला
माझा हा प्रणिपात आई तुळजाबाई, तुकाई तुला

आलो मी तुज हाननार्थ मूळ हें स्त्रीबुद्धिने वांकुडे
केलें कर्म विशेष लावुं कसला मी दोष देवाकडे
आतां या परिणामिं भोगहरणा मी भोगितो आपुला
माझा हा प्रणिपात आई तुळजाबाई, तुकाई तुला

रे वत्सा उपकार आठवु किती मी पाउला-पाऊलीं
भेटाया तुज कारणे मज आली विश्वाचि ही माऊली
धालों दर्शनि मीही चातक जसा पाहूनी मेघांबुला
माझा हा प्रणिपात आई तुळजाबाई, तुकाई तुला

हे चिंताभयशोकदायक वनं येथे तुकाई बरं
ऐसी कां सजलीस वल्कलपटे सोडुन पीताबरं
एकाकी दूर काननी आलीस कां सोडोनिया शंभूला
माझा हा प्रणिपात आई तुळजाबाई, तुकाई तुला

ऐशाही परि वल्कला विनटली जी आदिमाया कदा
दावी यां नयनांसि चंद्रवदना ती जानकी एकदा
अंबे सत्वर हो प्रसन्न मजला या पूरवी हेतुला
माझा हा प्रणिपात आई तुळजाबाई, तुकाई तुला

तेव्हां ती शिववल्लभा रघुविराच्या बोलिला मानवी
लौकिकास्तव पूर्णब्रह्म प्रभू हा दावी लीला मानवी
आला जानकिच्या मिसे क्षय कराया राक्षसांच्या कुळा
माझा हा प्रणिपात आई तुळजाबाई, तुकाई तुला


सीतेचें रुप त्यागुनी निजरुपें हेमाद्रिची बालिका
श्रीरामापुढे ठाकीली निलाग्रिवाच्या कंठीची मालिका
पाहुनी तिजला रघुवीर म्हणे ढाळीत प्रेमाश्रुला
माझा हा प्रणिपात आई तुळजाबाई, तुकाई तुला

येथे स्वस्थपणे निरंतर रहा भक्तांसी तारावया
व्हावे साह्य भवानीमाय मजला दुष्टासी मारावया
माझी जानकी शीघ्र भेटवी मला सिद्धांत हा ईतुला
माझा हा प्रणिपात आई तुळजाबाई, तुकाई तुला

ताराया पतितासी राहिली तशी तेथेंची अद्यापिती
दुर्बुद्धीच तिच्या कथामृतरसा टाकुनी मद्यापिती
विष्णुदास म्हणे ललाट कधी त्या लागेल पादांगुला
माझा हा प्रणिपात आई तुळजाबाई, तुकाई तुला!

-	संत विष्णुदास

अर्थ:-

सितेचं हरण झाल्यानंतर व्यथित झालेले प्रभू श्रीराम पंचवटी म्हणजेच नाशिकच्या दक्षिणेस शोध घेत घेत आजच्या आपल्या तुळजापूरच्या दिशेने निघाले होते. कैलासातून प्रत्यक्ष महादेव आणि पार्वती रामाचे हे दुःख आणि व्यथित होणं पाहू लागले तेव्हा पार्वती देवीस एक कल्पना सुचली. त्यांनी प्रभू श्रीरामाची परीक्षा घेण्यासाठी स्वतः सीतेचं रुप घेतलं आणि श्रीरामासमोर प्रकट झाल्या. तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी क्षणाचाही विलंब न करता पार्वतीमातेस ओळखलं. तेव्हा त्यांच्यातील काय संवाद असेल तो या अष्टकात संत विष्णुदास अत्यंत सुंदर पद्धतीने मांडतात. यात कविता रचनेची जी पद्धत किंवा जे प्रमाण दिसते त्यास शार्दुलविक्रिडीत असे म्हणतात.

पार्वती मातेस सीतेचे रुप घेतलेले पाहून श्रीराम म्हणतात की मी जानकी अर्थात सीतेच्या विरहात हे दंडकारण्य पार करून आलोय. मी व्यथित झालो आहे. अशा वेळी मला धीर देण्यासाठी तू माझ्या कौसल्या मातेप्रमाणे धावून आलीस. माझ्या या डोळ्यांनी मी साक्षात जगतजननीला पाहून धान्य झालोय. हे माते, माझा प्रणिपात स्वीकार कर.

पुढे श्रीराम म्हणतात की जन्मदात्या कौसल्ये पेक्षा मी कैकेयी मातेचा जास्त आभारी आहे कारण तिच्या कोपामुळेच आज मी इथे उभा राहून देवीचे प्रत्यक्ष दर्शन घेऊ शकतोय.

त्यापुढील कडव्यातील संवादाचा एकूण अर्थ असा की प्रभू श्रीराम कर्मयोग सांगतायत. मी माझे कर्म भोगत असल्याने देवाला काय दोष लावू असा प्रश्न ते करत आहेत. हा विरह, हा वनवास माझा भोग असून मी तो आनंदाने भोगत आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज मला तुझे दर्शन मिळाले असं प्रभू श्रीराम पार्वती मातेस म्हणतात. पुढे प्रभू श्रीराम म्हणतात की मी किती उपकार मानावे की विश्वाची माऊली मला भेटण्यासाठी आली आहे. तिला पाहून मी तसाच आनंदी झालोय जसा चातक पक्षी ढगाला पाहून आनंदी होतो.

पुढे पार्वती मातेस प्रश्न करताना प्रभू श्रीराम म्हणतात की हे माते, हे घनदाट भयानक वन आहे. इथे अशी सीतेच्या रुपात वल्कल नेसून का आलीस? तू महादेवाला एकाकी सोडून का आलीस? ज्याप्रकारे तू पितांबर सोडून वल्कल नेसले आणि सीतेचे रुप धारण केले, तोच चमत्कार दाखव आणि मला माझ्या सीतेशी भेटवून दे अशी प्रार्थना श्रीराम पार्वती मातेस करतात.

प्रभू श्रीराम असे म्हणताच पार्वती मातेने सीतेचे रुप त्यागले आणि आपल्या मूळ रुपात माता प्रकट झाली. इथे द्वैत आणि अद्वैत तत्वज्ञान अत्यंत सोप्या पद्धतीने मांडण्यात आलंय. पार्वती माता श्रीरामास संबोधून म्हणते की या सर्व पूर्णब्रह्म प्रभूच्या मानवी लीला आहेत. सीतेचा विरह हे फक्त निमित्त असून रावणाच्या विनाशासाठीच तुझा जन्म झाला आहे असं माता श्रीरामास सांगते. येथे विष्णुदास देवीचं वर्णन “निलाग्रिवाच्या कंठीची मालिका.” असं करतात. याचा अर्थ होतो निळा आहे कंठ ज्याचा त्याचा कंठीची मालिका म्हणजे गळ्यातला ताईत. अद्वैत आध्यात्मिक तत्वज्ञानानुसार शिव आणि शक्ती एकच आहे हा या एका ओळीमागचा बोध आहे. मातेचं हे मूळ रूप पाहून श्रीरामांना आत्यंतिक आनंद झाला आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले.

प्रभू श्रीराम मातेस विनंती करतात की हे माते आता तू तुळजाभवानीच्या रुपात येथेच रहा. इथे राहून तू भक्तांना आशीर्वाद दे आणि त्यांचं दुःख हरून ने. मला रावणाचा विनाश करण्याची शक्ती दे. माझी सीता मला लवकर भेटव.

शेवटच्या कडव्यात संत विष्णुदास आपल्याला उद्देशून म्हणतात की ही तुळजाभवानी आपल्यासाठी तेव्हापासून तुळजापुरात आहे. देवीच्या कथेचं अमृत इतकं पवित्र आहे की त्यापुढे कसलीही मद्याची नशा करणे म्हणजे दुर्बुद्धी. तिच्या पायावर डोकं ठेवण्याची आतुरता विष्णुदासांना आहे.

जय भवानी, आई राजा उदो उदो!

Warm Regards,

Dnyanesh Make “The DPM”


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *