अगदी सहाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेली महायुती, विशेषतः भाजप इतक्या त्वेषाने लढा देऊन विधानसभेला जोरदार मुसंडी मारते हे नवल वाटत असेल, तर हा आमचा ब्लॉग वाचा.
152 जागा लढवून तब्बल 132 जिंकल्या भाजपने, 80 जागा लढवून 57 जिंकल्या शिवसेनेने आणि 52 जागा लढवून 41 जिंकल्या राष्ट्रवादी काँग्रेस ने. महायुतीच्या मिळून जेवढ्या होतात त्यापेक्षा जास्त एकट्या शिवसेनेच्या, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या चौपट अधिक जागा अजित दादांच्या राष्ट्रवादीच्या आल्या. भाजपने तर युतीच्या घटकपक्षांच्या मिळूनही जेवढ्या होतात त्यापेक्षा 34 अधिक जागा जिंकल्या. आश्चर्याने डोळे दिपवणारा हा निकाल!
मुळात यात काही समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. आपण यात इतर लोकांनी चर्चिलेले मुद्दे घेणार नाहीत, मात्र एक वेगळा दृष्टिकोन ठेवून पाहणार आहोत की कुठलाही पक्ष एखाद्या निवडणुकीत चांगला ठरत असेल तर तो लगेच मजबूत ठरत नाही. महाविकास आघाडी बद्दल काहीसं असच झालं. लोकसभेत काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सर्वाधिक जागा जिंकण्यामागचे गमक काय? मुळात सर्वाधिक म्हणजे त्यांनी जागा कितिशा जिंकल्या? तर 13. म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी 16.92 टक्के मतदान घेऊन केवळ 13 जागा जिंकून बनता आलं. सेना उबाठा आणि राष्ट्रवादी शप यांच्या प्रत्येकी 9 आणि 8. एकुणात आघाडीच्या 30 जागा. भाजप मात्र मतदानाची सर्वाधिक टक्केवारी घेऊन सुद्धा नऊ जागांवर जिंकला, तिथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रत्येकी 7 आणि 1 असे युतीला 17 उमेदवार जिंकवता आले. मुद्दा इथेच आहे. मताची टक्केवारी पाहता युतीला तेव्हाही आघाडीच्या तुल्यबळ मते होती…म्हणजे आघाडीला एकूण 42 टक्के तर युतीला 41 टक्के. मग हा फरक कुठून येतो? तर कमी मतांनी हरलेले उमेदवार. उदाहरण घ्या बीड लोकसभा मतदारसंघाचं. साधारण 22 लाख मतदार असणारा या मतदारसंघात विक्रमी 75 टक्के मतदान झालं आणि अतिशय चुरशीच्या लढतीत भाजपच्या पंकजा मुंडे केवळ साडेसहा हजार मतांनी पराभूत झाल्या. त्यांना मिळालेली मतं ही थोडी थोडकी नव्हे तर 6,77,397 इतकी होती. तुलनेने राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणेंचा हा निसटता विजय आहे. आता एक लक्षात घ्या, संपूर्ण बीड जिल्ह्यातील ही पावणे सात लाख भाजपाची पारंपरिक मतं सहा महिन्यात आघाडीच्या पारड्यात जातील का? नाही. पण सोनवणेंना पडलेली मतं ही दोन गोष्टींमधून आली हे लक्षात घ्यावं लागेल, एक म्हणजे मुस्लिम समाजाचे भाजप विरोधात झालेले एकशिक्का मतदान आणि त्याचवेळी जरांगे फॅक्टर मुळे मराठ्यांचे मोठ्या प्रमाणावर झालेले भाजप आणि महायुती विरोधी मतदान. महायुतीने विधानसभेत हेच हेरलं. एकीकडे महायुतीची पारंपरिक मतं, मग ती मतदारसंघ निहाय अजित पवारांची असोत, शिवसेनेची असोत किंवा भाजपची, ती मतं अतिशय मेहनतीने आणि दारोदार जाऊन मिळवली. महायुतीच्या मतदारांनी घराबाहेर येऊन मतदान करावे आणि ते महायुतीलाच करावे यासाठी सर्व प्रकारची मेहनत घेतली. याव्यतिरिक्त जी मते जरांगे फॅक्टर असेल किंवा इतर कुठल्याही कारणास्तव महायुतीच्या विरोधात जाऊ शकत होती, तीही आपल्याकडे वळवली ती सरकारी योजनांच्या प्रचारामधून. लाडकी बहिण योजनेने तर तमाम बहिणींनी महायुतीला भरभरून मते दिलीच. इतके सगळे फॅक्टर बाजूने असताना युतीचा इतका मोठा विजय नवल वाटत नाही.
परंतु वर उल्लेख केला त्याप्रमाणे कुठलाही पक्ष एखाद्या निवडणुकीत लगेच मोठा किंवा लहान होत नाही. काश्मीर मध्ये भाजपने 370 कलम हटवून, विकासकामांचा सपाटा लावून सुद्धा काश्मीर खोऱ्यात आजही नॅशनल कॉन्फरन्स सारखे पक्ष निवडून येतातच की. पंजाब मध्ये भाजपची डाळ शिजते का? कर्नाटकात भाजपने मार खाल्लाच ना? बाकी सोडा, लोकसभेत अयोध्येच सीट सुद्धा गेलच की. एखादा पक्ष निवडणुकीत काय धोरणं घेऊन येतोय, शेवटच्या बूथ पर्यंत किती लोकांना कार्यान्वित करतोय, कटू सत्य असलं तरी पैसे किंवा तत्सम गोष्टींचं वाटप करतोय का, हवा आपल्या बाजूने वळवू शकतोय का, लोकांच्या मनावर सकारात्मक प्रतिबिंब सोडतोय का, धर्म आणि जातीची गणितं (अजून एक कटु सत्य) जुळवण्यात यशस्वी होतोय का, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. विधानसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीच्या उतरंडीमधील मधली घागर, इथे तर हे सर्व मुद्दे अतिशय ठळकपणे लागू होतात. त्यामुळे लोकसभेत सामूहिक रित्या दोन तृतीयांश जागा मिळवणाऱ्या आघाडीला हे लक्षात यायला पाहिजे हवं होतं की वैयक्तिक यांच्या प्रत्येक पक्षाची हालत ही युतीच्या पक्षांपेक्षा वेगळी नाही. एक राष्ट्रवादी काँग्रेस सोडता उरलेले पाचही मोठे पक्ष लोकसभेत तुल्यबळच होते. शिवाय मतदान जात-धर्मावरून (यांच्याच कृपेने) विभागल्या मुळे एखाद्या समाजाचा मतदानाचा टक्का दुसऱ्या समाजा पेक्षा जास्त झाल्याने जर तुम्हाला फायदा होत असेल, तर याच सारखा असा फायदा युतीला होऊ शकत नाही काय? इथे जात धर्मावर, पैश्यावर किंवा दारूवर मतं फोडण्याच किंवा संकलित करण्याचं समर्थन मुळीच नाही, पण तुमच्या विजयाची वास्तविकता हीच असेल तर युतीचा मतदार देखील आपापल्या विचारानुसार एक होऊन युतीला मतदान करण्यासाठी बाहेर येणार आणि मग जे घडणार, तेच तर या निकालात दिसतंय. मग आघाडीच्या पक्षांनी यात छाती बडवण्याच काय कारण? नेहमी प्रमाणे ईव्हीएम ला दोष देण्याचं काय कारण? जनता तुमच्याकडून योग्य मुद्द्यांवर विरोधाची अपेक्षा करते. जनता तुमच्याकडून चांगल्या, नवीन, तरुण नेत्यांची अपेक्षा करते. जर तुमच्या मते युती धर्माचं राजकारण करत असेल तर तुम्ही त्याच्या विरोधात बोलण्याच्या ऐवजी स्वतः जातीचं राजकारण कराल, कुणा एका समाजाची मतं एकगठ्ठा मिळवण्यासाठी दुसऱ्या समाजाला नावं ठेवत असाल आणि एकंदरच विकासाचा कुठलाही दृष्टिकोन, तुमच्यात आणि युतीतल्या धोरणांमधला फरक सांगत नसाल, तर विरोधी पक्ष म्हणून किंवा पक्षांचं संघटन म्हणून तुम्ही केव्हाच हरलेले आहात. समाजाची मोट बांधण्याची जबाबदारी तुमच्यावर असताना आज एका समाजाचं लांगूलचालन करून मतं मागत असाल, तर उरलेला समाज स्वतःहून एका पक्षाची एकाधिकारशाही स्वीकारेल. तेव्हा आघाडीच्या सर्व पक्षांना एकच विनंती, आत्मपरीक्षण करा. जनतेत मिसळा. विकासाच्या मुद्द्याला लावून धरा. लोकांसाठी बोला. लोक आपोआप समर्थन देतील. हे सगळं न करता सत्ता आली जरी तरी ती टिकणार नाही, जशी ती मागच्या वेळी सुद्धा टिकली नव्हतीच.
आता या सगळ्यामध्ये पक्षांची गल्लत कुठे होते? आणि केवळ राजकीय पक्षांचीच चूक आहे असं तरी कुठे म्हणता येईल? लोकांची चूक नाही का? सर्वात योग्य मुद्दे आणि सर्वात स्पष्ट भूमिका घेऊन कुठल्याही गटातटात न पडता स्वतंत्रपणे निवडणूक लढविणाऱ्या मनसेचा असलेला सुद्धा एकमेव उमेदवार पडला. जनतेला योग्य मुद्द्यांची जाण नाही का? जातीय आणि धार्मिक, दोन्ही प्रकारच्या कित्येक पटलांची गुंतागुंत असलेल्या ध्रुवीकरणामध्ये जनता असताना मुळातच फारशा अपेक्षा नाहीतच, वरतून आपल्याला हेही गृहीत धरावे लागेल की सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष काही निव्वळ बिनकामाचे नाहीत. निवडून येण्यासाठी असणाऱ्या महत्त्वाच्या शक्ती तुमच्याकडे असायलाच हव्यात, जसं की बँका, साखर कारखाने, दूध संघ, जिल्हा परिषदा, शिक्षण संस्था बाजार समित्या या सर्वांवर पकड,(साखर कारखाने हा मुद्दा सोडला तर भाजप सुद्धा या न त्या मार्गे या सर्व शक्ती बाळगून आहे). या शक्तींनी तुम्ही एक इकोसिस्टिम बनवता की ज्यात लोकांशी आर्थिक व सामाजिक नाती तयार होतात. तुमच्या बाष्कळ गप्पा ऐकून किमान ग्रामीण मतदार तरी मत देणार नाही. लोकांची वैयक्तिक कामे, अडचणी सोडवणारे (भले मग त्यातून आपला फायदा काढून घेईनात का), गुत्तेदारांना contracts मिळवून देणे, शेतीविषयक अडचणी सोडवणे हे सर्व निवडून येण्यास कारणीभूत असतं. मात्र अनेक ठिकाणी उमेदवाराची जात आणि धर्म बघून सुद्धा मतदान होतंच. फतवे निघतात की अमुक एका पक्षाला मत देऊ नका, सोशल मीडियावर प्रचार – अपप्रचार पासून ते दंगली पर्यंत गोष्टी जातात. भारतीय लोकशाही अशीच बहुरंगी आहे. याची ही काळी बाजू.
परंतु निवडणुकीत बूथ लेव्हल पर्यंत काम करणारे कार्यकर्तेच पक्षाला विजयाकडे घेऊन जातात. केवळ पाच टक्के मतदान वाढलं तर महायुतीच्या पारड्यात केवढं यश आलं, पण हे मतदान वाढलं कसं याचा विचार केलाय? संघाचे स्वयंसेवक, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर्वच जण महायुतीच्या प्रत्येक उमेदवारासाठी घराघरातून एक एक मत कसं येईल याची पूर्ण दखल घेत होते. बाहेरगावी असणाऱ्यांना प्रवासाची सोय करून देणे, मतदार यादीत नाव शोधून देणे वगैरे पासून ते लोकांनी मतदान केलंय याची निश्चिती करून घेणे, इथवर मेहनत केली महायुतीच्या कार्यकर्त्यांनी. हीच मेहनत कमीअधिक प्रमाणात लोकसभेला आघाडीने घेतली आणि तीस जागा आणल्या. ही मेहनत घेण्याची क्षमता, लोकांमध्ये मत बनवण्याची क्षमता, दूरदृष्टी असणारे तडफदार नेते या सर्व गोष्टींमध्ये महायुती खूप सरस आहे. त्यामुळे ही मेहनत त्यांना जास्त फळाला आली, तर आघाडीच्या अगोदरच कमतर शक्तिमध्ये त्यांचा लोकसभा विजयाचा अहंकार, एकगठ्ठा मुस्लिम मतांच्या जोरावर हिंदू मतांना गृहीत धरणे, हिंदू देवीदेवतांची विटंबना करणाऱ्या लोकांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणे, वक्फ बिल ला विरोध करणे, जातीय तेढ पसरविणे या गोष्टींनी तेल ओतले व आघाडी विरोधात एक मोठा मतदार वर्ग एकवटला. मुळात आघाडी विरोधात नव्हतच हे मतदान. हिंदुत्वाची लाट आली, लोकांना तो मुद्दा योग्य वाटला आणि लोकांनी जो हिंदुत्वाची बाजू घेतो त्याला मत दिले. मग हेच शंभर टक्के असच झालं का? तर नाही. महिलांनी लाडकी बहिण योजनेसाठी मत दिलं, अनेक मतदारसंघात नेहमीचा उमेदवार असतो म्हणुन लोकांनी त्यालाच मत दिलं, अनेक ठिकाणी नेहमीचा उमेदवार पाडण्या साठी मत दिलं. लोकांनी अनेक कारणासाठी मतं दिली, आणि सत्य हेच की सर्वच कारणं महायुतीला समर्थनाची ठरली.
अनेक ठिकाणी मतमोजणी मध्ये संशय व्यक्त केला जातोय. आघाडीची तर थेट ईव्हीएम विरोधीच भूमिका आहे. हे शक्यच नाही, असं नाही. होऊ शकतं. पण मग लोकसभेला पण झालं नाही का असं?
एकूणच काय, तर सर्वच प्रकारच्या मतदारांमध्ये महायुतीला मतदान करण्याची इच्छा होती. काही विशिष्ट समाजांनी नसेल केलं, मात्र बहुतेक लोकांनी आपापली कारणं शोधून महायुतीला मतदान केलं. मग यात केवळ हिंदुत्वामुळे झालं असही नाही, किंवा “बटेंगे तो कटेंगे” हा नारा निर्णायक ठरला असंही नाही, केवळ मुख्यमंत्री शिंदेंची लोकप्रियता होती म्हणून नाही, केवळ लाडकी बहीण योजना होती म्हणून नाही, केवळ ओबीसी एकवटले म्हणून नाही, केवळ जरांगे फॅक्टर हरला म्हणूनही नाही किंवा केवळ देवा भाऊंची राजकीय बुद्धिमत्ता होती म्हणूनही नाही. सर्वच्या सर्व कारणं एकत्रितपणे लागू आहेत. जनतेने स्वतःच्या इच्छेने महायुतीला निवडून दिले हेच सत्य आहे. आघाडीने सर्वप्रथम तर या भ्रमातून बाहेर यावं की भाजपविरोधी लाट आहे. भाजपचा मतदार हा शांत असतो. तो भाजपविरोधात बोलतो पण मत भाजपलाच देतो कारण त्याला इतर कुठलाही पर्याय भाजपच्या किंवा NDA च्या बरोबरीचा वाटत नाही. आघाडीने आता तात्काळ आपले मुद्दे ठरवून एक विश्वासू नेतृत्व उभं करावं आणि खरच जनतेची एवढी काळजी असेल, तर जातीय जनगणना, जातीय आरक्षणं, अल्पसंख्याकांचे लांगूलचालन या मुद्द्यांना फाट्यावर मारून चांगले मुद्दे घेऊन यावेत जे जनतेच्या हिताचे असतील.
असो….महायुतीला शुभेच्छा. आतातरी एवढ्या विजयानंतर मराठवाड्यात, विदर्भात व इतरत्र सुद्धा विकासाची गंगा दुथडी भरून वाहताना दिसावी ही अपेक्षा.
Warm Regards,
Dnyanesh Make “The DPM”
0 Comments