मावळला तो महिला दिन
आता बये तू स्वतःला सांभाळ
दुसऱ्यांची जी उमेदीची असते
तुझी असते जबाबदारीची सकाळ
आता नवरात्री पर्यंत सगळं काही
आधी सारखंच सुरळीत राहील
तुला स्पर्धेत मारू पाहणाऱ्यास
देवी देवळाच्या रांगेत पाहिल
मध्यंतरी थोडी राखी बांधून
भावाला रक्षणाची आठवण होउदे
आजवर ज्याने बंधनात ठेवलं
त्याच्याकडे रक्षणाचं वचन राहूदे
ज्याला अभिमान तुला जन्म दिल्याचा
तो तुला “दान”करण्याला मानतो पुण्य
तुला सुखी ठेवण्याची जबाबदारी म्हणवून
हक्क हिरावून घेऊन करेल तो धन्य
तुझ्या सौंदर्याचा अभिमान असेल ज्याला
तू मात्र त्याच्या मनाशी नातं जोडू पाहशील
तो तुला पत्नीच बनवू शकेल
तू मात्र त्याची आई सुद्धा होऊन जाशील
पण एकदा बये स्वतःला
कर्तृत्वाच्या आरशात बघून घे
जेव्हा नसेल कुणी त्या प्रत्येक वेळी
तुझ्या सहनशीलतेच्या घरट्यात राहून घे
मातेल जेव्हा प्रारब्धाचा महिषासुर आयुष्यात
आदिशक्ती होऊन त्याचा समूळ नाश करशील
लोळण घेईल पायाशी या सृष्टीचा विनाशकर्ता
कालहस्ती चे रूप जेव्हा जगास या दाखवशील
सन्मानास धक्का येता, घाबरतेस काय तू द्रौपदी
श्रीकृष्ण वासुदेवाने रण घडवले होते याच करिता
नीतीमूल्य अन विधीचे लिखाण सारेच बदलेल
जेव्हा अयोध्यावासीयांना सडेतोड उत्तर देईल सीता
लढ तू, लढ ताराराणी, बादशाह तडफडून मरेल
इतिहास विसरेल तुला, पण रयतेचा राजा कायम स्मरेल
महाराणी तू मणिकर्णीके, नकोस चिंतू
तुझी प्रेरणा अनेक शतके सर्व बंडांना तारेल!
अंबा हो, तुझ्या शापाने गंगापुत्र युद्धात हरतील
सरस्वती हो, प्रत्यक्ष ब्रम्हदेव, ब्रम्हानंदी टाळी विरतील
झुकू नकोस, घडव सुपुत्र, गौतमी घडवे सातकर्णी जसे,
पुन्हा जन्म घे जन्म देण्या, शिवराय घडवले जिजाऊंनी जसे!
- The DPM
0 Comments