युद्ध, राजकारण, जादूटोणा, घराणी, सैतान, ड्रॅगन वगैरेंवर आधारित अमेरिकन मालिका गेम ऑफ थ्रोन्स मध्ये एक घराणे असते, लॅनिस्टर घराणे. हे त्या साम्राज्यातील सर्वात श्रीमंत व बलाढ्य घराणे असते. टायविन लॅनिस्टर या अतिशय धूर्त, क्रूर व तितक्याच चाणाक्ष असलेल्या व्यक्तीने सिंहासनावर न बसता सिंहासनाच्या दोऱ्या स्वतःच्या हातात ठेवलेल्या असतात. या टायविनचा नावडता मुलगा म्हणजे टिरियन. राजकारणात अतिशय हुशार, लोकांना एका नजरेत ओळखणारा, पाहिजे तिथे वाकड्यात शिरणारा, चांगल्याशी चांगला, वाईटाशी वाईट, कमालीची विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणा असणारा असा हा टिरियन केवळ मनोरंजकच नव्हे, तर हवाहवासा वाटायचा. त्याच्या असण्याने कथेतल्या गोष्टी ठीक होतील, गोंधळ दूर होईल असे वाटायचे. महाराष्ट्राचे राजकारण या गेम ऑफ थ्रोन्स पेक्षा फारसे वेगळे नाही, विशेषतः 2019 नंतरच्या घडामोडी पाहता गेम ऑफ थ्रोन्स फिकेच पडेल एवढे आपले मराठी राजकारण रंजक आहे, आणि या राजकारणातील टिरीयन लॅनिस्टर होते आपले अजितदादा पवार. 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात अचानक त्यांचं निधन झालं आणि मग महाराष्ट्राला जाणवलं, की अजितदादांचं अस्तित्व किती महत्त्वाचं होतं. 41 आमदार, सहा वेळा उपमुख्यमंत्री, तीन दशकांची सत्ता हे सर्व मोजमाप करण्याचं साधन. प्रत्यक्षात दादांची खरी ओळख हीच, की दादा प्रॅक्टिकल होते. उगाच विचारधारेच्या नावाने गळा काढणं नाही किंवा अमुक एक वर्ग पीडित आहे म्हणून त्यांच्या नावाने मतं मागणं नाही. अजितदादांनी त्यांचं राजकारण बऱ्यापैकी सरळसोट ठेवलं. त्यामुळेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, की ज्या पक्षाचा अगदी सुरुवातीपासून जातीय भेदाभेद करण्याचा, जातीय विषपेरणीला खतपाणी घालण्याचा इतिहास राहिलेला आहे, त्यात असूनही अजितदादांनी एकदाही जातीय तेढ निर्माण होईल अशी ना भूमिका घेतली, ना काही तसे वक्तव्य केले. यामागचे एकमेव कारणच हे, की दादा याबाबतीत प्रामाणिक होते. ते जे नाहीत, ते असल्याचा आव त्यांनी आणला नाही. सध्या देशात जसजशी हिंदुत्वाची घडी मजबूत होतेय, तसे आपण अनेकजणांना भगव्या रंगात अचानक रंगलेले बघतोय. काँग्रेसच्या काळात हेच लोक गांधी – नेहरूंच्या नावे भूपाळ्या गात असत. असा रंग अजितदादांनी कधीही बदलला नाही. त्यांची ओळख नेहमी कामावरून राहिली, आणि हेच त्यांचे यश होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला शरद पवारांनी मात्र त्याची खरी ताकद अजितदादाच होते, हे ठामपणे तेव्हा सिद्ध झालं जेव्हा 2023 मधलं दादांचं बंड कोर्टात टिकलं, घड्याळाचं चिन्ह सुद्धा दादांच्या गटाला मिळालं आणि त्यानंतरच्या काळात दादांनी राष्ट्रवादी सुद्धा, आणि स्वतःची प्रतिमा सुद्धा, अधिक बळकट करून दाखवली. ती इतकी, की कालच्या त्यांच्या निधनानंतर आजन्म भाजप समर्थक असणारे आणि एकेकाळी त्यांचा कट्टर विरोध करणारे सर्वच जण नुसते हळहळले नाहीत, तर त्यांनाही जाणवलं की अजितदादांना फडणवीसांनी का सोबत घेतलं होतं ते.
पवार घराणे हे महाराष्ट्राचे लॅनिस्टर घराणे. निर्विवादपणे सर्वात श्रीमंत, ताकदवर आणि सर्वाधिक काळ सत्तेत असणारे हे घराणे. शरद पवार बऱ्यापैकी टायविन लॅनिस्टर सारखेच आहेत. सत्तेत राहणं त्यांना नेहमी जमलं. उगीचच मोठमोठ्या लढाया करून ताकद वाया न घालवता राजकीय डावपेच, अदलाबदली, एक सांगून एक करणे या गोष्टींमार्फत त्यांनी नेहमी सत्ता कायम ठेवली. इंदिरा, राजीव आणि सोनिया गांधीना नडायला ते घाबरले नाहीत, आणि भाजपला सुद्धा मागच्या दाराने झुलवत ठेवून नेहमी पर्याय खुले ठेवले. अजितदादांना भाजपच्या सोबत जाण्यामागचे राजकीय गणित शरद पवारांपेक्षा जास्त चांगले समजले. जे शरद पवारांनी 1999 मध्ये वाजपेयींसोबत जाऊन करायला हवे होते, किंवा 2014 किंवा 2019 मध्ये मोदींसोबत यायला हवे होते, ते अजितदादांना 2023 मध्ये कळले, आणि त्यांनी भाजपची साथ धरली. सध्याच्या घडीला स्थिर सरकार कोण देऊ शकतं याचं आकलन दादांना साहेबांपेक्षा चांगलं जमलं, हे खरं पाहता दोन्ही काका – पुतण्यांचं यश. मागे कुणीतरी म्हणलेलं, की राष्ट्रवादी फुटल्यामुळे जास्त वाढली. एकसंध राष्ट्रवादीमध्ये जेवढे आमदार खासदार होते, आज त्यापेक्षा जास्त दोन्ही राष्ट्रवादीत मिळून आहेत.
मागच्या पाच वर्षात दोन पक्षांचं विभाजन झालं. पैकी एक, शिवसेना, हा असा पक्ष की आज स्पष्टपणे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये आपण टोकाची कटुता बघू शकतो. ही कटुता अजितदादांनी शरद पवारांच्या बाबतीत येऊ दिली नाही. उलटपक्षी, निधनाच्या काही दिवस आधीपर्यंत आपण ही बातमी ऐकत होतो की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. दादांच्या दुःखद निधनाच्या वेळी पवार कुटुंबाची जी एकी आपण सर्वांनी पाहिली, महाराष्ट्रातील सर्वच कुटुंब तेवढ्याच एकीने रहावेत अशी देवाचरणी प्रार्थना.
अजितदादांनी विकास देखील केलाच. किंबहुना, दादाच एकमेव असे व्यक्तिमत्व म्हणावे की राष्ट्रवादीत असून देखील विकास केला. पिंपरी चिंचवड, बारामती, हिंजवडी मधील औद्योगिकीकरण असो किंवा ग्रामीण भागातील साखर कारखाने, दादांच्या कृपेनं बऱ्याच जणांचे खिसे भरले, घरं चालली आणि सुबत्ता देखील आली.
कोरोना काळात जिथे उद्धव ठाकरेंसारखे निष्क्रिय मुख्यमंत्री केवळ फेसबुकवर लाईव्ह येऊन गप्पा मारीत होते, तिथे अजितदादा मंत्रालयात आठ वाजता हजर राहत. त्यावेळी त्यांच्या कामाचं क्रेडिट उद्धव ठाकरे घेऊन गेले मात्र दादांनी तोंडातून चकार शब्द काढला नाही. काम करत राहिले, आणि कामाने दाखवून दिलं. आज उद्धव ठाकरे वीस आमदार आणू शकले, तर बंड करून देखील दादांनी 2024 च्या विधानसभेत 51 जागा लढवून 41 आमदार निवडून आणले.
देवेंद्र फडणवीस आज केवळ राज्याचे मुख्यमंत्री नाहीत, तर जवळपास राजकीय सर्वेसर्वा आहेत. तसेच, अमित शाह देशाच्या राजकारणावर नियंत्रण ठेवून आहेत. या दोघांचाही विश्वास संपादन करून, स्वतःची व पक्षाची आब राखून, आपण केवळ पर्याय नाहीत हे कृतीतून दाखवून दिलं अजितदादांनी. अनेक भाजप समर्थकांना मागील दोन वर्षात शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस जास्त विश्वासार्ह सहपक्ष वाटू लागला होता.
पहाटे लवकर उठून दौरे करणारे दादा, बारामतीविषयी नितांत आत्मियता सहजगत्या दाखवणारे दादा, राष्ट्रवादी काँग्रेसची खरी ओळख असणारे दादा, जेव्हा गेले तेव्हा बारामतीत गेले, पहाटेच गेले आणि त्यांच्या मृतदेहाची ओळख सुद्धा त्यांच्या घड्याळावरूनच पटली यापेक्षा भयानक दुर्दैवी योगायोग तो काय म्हणावा. अजितदादा निर्विवादपणे महाराष्ट्राला लाभलेलं एक अद्वितीय नेतृत्व होतं, कारण हे नेतृत्व सहज बनत नसतं. लहानपणी शरद पवार साहेबांना भेटायला आलेल्या पाहुण्यांना चहा देण्यापासून ते पक्षासाठी वणवण हिंडण्यापर्यंत, कार्यकर्त्यांची चोख जमवाजमव करण्यापासून ते पूर्ण इकोसिस्टिमवर ताबा मिळवण्यापर्यंत, राज्याचं लाखो कोटींचं अर्थकारण सांभाळत असताना सुद्धा स्वतःच्या शेदोनशे कोटींच्या साखर कारखान्याचे व्यवहार सुद्धा नियमितपणे पाहण्यापर्यंत, आणि वर्षानुवर्ष पक्षाची धुरा सांभाळून सुद्धा जेव्हा अधिकार मिळत नाही तेव्हा पक्षच उचलून घेऊन जाई पर्यंत, जी व्यक्तिमत्वाची घडण असते, तिला अजित पवार म्हणतात.
महाराष्ट्र अशा “कामाच्या माणसाला” कायम लक्षात ठेवणार.
अजितदादा पवार अमर रहे.
0 Comments