‘होस्पेट‘ हे तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेलं, ऐतिहासिक महत्व लाभलेलं, आणि युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत असणाऱ्या हम्पीचे प्रवेशद्वार म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या एका छान ,स्वच्छ आणि टुमदार शहरात, जिथे गर्दी,गडबड याचा लवलेश नाही, अशा शहरातून वाट काढत आमची स्वारी निघाली रेल्वेस्टेशन जवळील ‘Hotel Hampi International’ कडे.
स्वच्छ,सुनियोजित असं ते हॉटेल पाहून आमचा पुणे ते हम्पी हा तब्बल १२ तासांच्या प्रवासाचा क्षीण कुठल्या कुठे नाहीसा झाला. भरपेट नाश्ता झाला आणि वेध लागले हम्पी सफरीचे. आम्ही हंम्पी ची सफर निसर्गाची मजा घेत बाईक रेंट वर घेऊन करायचे ठरवले आणि तो आमचा सर्वात बेस्ट निर्णय ठरला . पहिल्या दिवशी आम्ही हॉटेल मधून निवांत बाहेर पडलो आणि हंपीचे नैसर्गिक सौंदर्य पाहुन डोळ्यांचे पारणे फिटले,चहूकडे नजर जाईल तिकडे उंच उंच नारळाची झाडे आणि डोळ्यांना सुखावणारी हिरवीगार भाताची शेते….. असे वाटत होते जणु “हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे “या बालकवींच्या ओळी त्यांना इथेच स्फुरल्या असाव्यात. भात आणि केळी च्या शेतांमधुन वाट काढत, रस्ता शोधत शोधत आम्ही पोहोचलो ‘सानापूर लेक’ला. तिथे अगदी नीरव शांतता अनुभवायला मिळाली कसलीच गर्दी नाही की गोंगाट नाही. सानापुर लेक चे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ‘कोरॅकल राईङ’ म्हणजेच बांबू च्या काड्यांपासुन बनवलेल्या या छोट्याशा नावा, ज्याला पूर्वी आपल्याकडे कढई असे म्हणत. तिकडे बराच वेळ घालवुन आम्ही निघालो ‘पंपा सरोवर’ ला, असे म्हणतात की याच पंपा सरोवर काठी श्रीराम भक्त ‘शबरी’ ने राम लक्ष्मण यांना उष्टी बोरे खाण्यास दिली आणि अशी ही आख्यायिका आहे की ‘पंपा’ म्हणजेच पार्वतीने महादेवाशी आपले लग्न व्हावे म्हणुन तपश्चर्या केली. समोरच विष्णू-लक्ष्मी चे मंदिर आहे. आम्ही रात्री हॉटेल वरती परतलो, रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घेतला आणि झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी आम्ही लवकरच निघायचे ठरवले ,अगदी सकाळी आठ वाजताच हॉटेलच्या बाहेर पडलो. हाताशी होता फक्त हंपी चा नकाशा आणि गुगल मॅप. आम्ही आज साऊथ हंपी फिरणार होतो. आधी निघालो “विरूपाक्ष” मंदिराकडे.
मंदिराकडे जाण्याचा रस्त्यातच हेमकुंट टेकडीच्या उताराशी अतिशय सुंदर असे उंच कोरीव काम केलेल्या खांबांचा शामियाना आणि आत एक अखंड दगडात बनवलेली अवाढव्य अशी गणपती ची मूर्ती, म्हणजेच त्याच प्रसिद्ध कडलेकाळू गणेशाचे दर्शन घेतले. कन्नड मध्ये कडलेकाळू म्हणजे चण्या सारखा आकार. मूर्तीच्या पोटाचा आकार चण्यासारखा असल्याने हे नाव पडले. समोर हेमकुंट टेकडीचे मनोहारी दृश्य पाहुन फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही. भरपुर फोटो काढुन आम्ही निघालो विरूपाक्ष मंदिराकडे. विरुपाक्ष मंदिराची मुळं सातव्या शतकातील आहेत. याचा विस्तार मात्र 15 व्या शतकात विजयनगर साम्राज्यात झाला. विरूपाक्ष मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच एक नितळ पाण्याचे कुंड आहे, ज्याला “पुष्करिणी” म्हणतात.विरूपाक्ष मंदिर हे द्राविडियन शैली च्या शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे. ९ मजली ‘गोपुरम’ हे ही तेथील मुख्य आकर्षण. त्या नंतर आम्ही पाहिला “उग्र नृसिंह” अगदी नावाप्रमाणे मोठाले एकदम बाहेर आलेले डोळे, आणि नागांच्या वेटोळ्यावर विराजमान नरसिंहाची विशाल मूर्ती आणि डोक्यावर नागांनी धरलेला फणा,कल्पकता आणि सृजनशीलतेला अनोखा संगम. तिथेच अगदी बाजूला आहे ते “बदावी लिंगम” म्हणजेच महादेवाची विशाल पिंड, आणि तिथला आजूबाजूचा निसर्ग पण खूप सुंदर होता.

मग आमची स्वारी निघाली “विजय विठ्ठल” मंदिराकडे ज्याच्याबद्दल आम्ही बरंच ऐकलं होतं आणि पाहण्याची बरीच उत्सुकता होती.मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यानंतर दृष्टीस पडतं ते ‘stone chariot’ जे खरेतर मंदिराचे मुख्य आकर्षण आहे.ते भारतातील 3 stone chariot पैकी एक आहे आणि मंदिरातील दुसरं आकर्षण म्हणजे रंग मंडपम जे प्रसिद्ध आहे तिथल्या 56 संगीतमय खांबांसाठी. त्या खांबांवरती हलक्या हाताने स्पर्श केल्यानंतर त्यामधून संगीताचे सूर ऐकू येतात, परंतु काही वर्षांपासून सरकारकडून त्या खांबांना स्पर्श करण्यास मनाई करण्यात आली आहे, जेणेकरून त्या वास्तू ची वाताहत होणार नाही. विजय विठ्ठल मंदिराचे स्थापत्य हे “द्राविडीयन शैली” मध्ये केलेलं
आहे. कल्पकता आणि सृजनशीलता यांचा अनोखा संगम इथे पहायला मिळाला. आता झाला विठोबा मग पोटोबाचं काय…..आम्ही बाहेर येऊन तिकडेच थोडेफार खाल्ले आणि निघालो पुढच्या भ्रमंती साठी. हंपी मध्ये फिरताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजूबाजूच्या सुंदर निसर्गामुळे थकवा अजिबात जाणवत नाही, उलट रस्ता कधी संपूच नये असं वाटत.आता आम्ही निघालो “Lotus Mahal ” पहायला. लोटस महाल चे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या छताचा आकार हा कमळाच्या पाकळ्यांसारखा आहे. महाल दोन मजली असून तो राजांनी मनोरंजनासाठी बांधलेला आहे. तिकडून जवळच आहे ते “Elephant stable’ म्हणजेच विजयनगर साम्राज्यातील राज हत्तींसाठी बांधलेला पागा. भलीमोठी आयताकृती आकाराची लांब वास्तू आहे. या वास्तू मध्ये 11 विशाल घुमटाकार खोल्या आहेत. एका खोली मध्ये एक वेळी 2 हत्ती बसतील एवढी ती मोठी होती.

तिथले जवळच असलेले काही आणखी प्रेक्षणीय स्थळं पाहून आम्ही निघालो अंजनाद्री टेकडीच्या दिशेने, जिला स्थानिक लोक अन्नेगिरी असे देखील म्हणतात. मूळ वाल्मिकी रामायणातच असा उल्लेख आहे की हनुमानाचा जन्म माता अंजनी च्या पोटी याच अंजनाद्री पर्वतावर झाला. आजघडीला आपल्याला दिसते ती एक छोटीशी टेकडी, जिच्या ५७५ पायऱ्या सर करून आम्ही “जय श्रीराम” चा जयघोष करत वरती पोहोचलो. खूप दमलो होतो, परंतु वरतून अगदी विहंगम दृश्य पहायला मिळालं. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने आणि महाबली मारुतीरायाच्या वास्तव्याने पावन झालेली कोणे एके काळची हीच का ती किष्किंधा नगरी जिचे आता फक्त अवशेष च उरले आहेत या विचाराने सद्गदित होऊन हनुमानाचे दर्शन घेतले आणि हनुमान स्तोत्र म्हणत आम्ही परत खाली उतरलो. एव्हाना खूप अंधार पडला आणि आम्ही वाऱ्याच्या वेगाने हॉटेल वरती पोहोचलो. तर अशी झाली आमची कुठलंही पुर्व नियोजन नसलेली, छोटेखानी अशी ‘हम्पी ट्रिप’ but unplanned trips are always the best, नाही का?

केवळ इन्स्टावर ट्रेडिंग आहे, फोटो चांगले येतात किंवा दहा जण जाऊन आले म्हणून नव्हे, तर हंपीला जायचं ते त्या साम्राज्याचे जिवंत जागते पुरावे बघण्यासाठी ज्या साम्राज्याने छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या अगोदरची जवळजवळ तीनशे वर्ष भारतात परदेशी आक्रमकांच्या नाकावर टिच्चून भारतीय संस्कृती जिवंत ठेवली. आक्रमकांनी हम्पीवर हल्ला करून कित्येक महिने प्रयत्न केले तरी सुद्धा अस्तित्व पूर्णपणे संपवू नाही शकले. हंपी केवळ एक टुरिस्ट डेस्टिनेशन नाहीये, हंपी आठवण आहे आक्रमणाची, त्याविरोधात दिलेल्या लढ्याची आणि भारतीय संस्कृतीच्या समृद्धतेची. जेव्हा एकीकडे बाबर अयोध्येतलं राम मंदिर तोडत होता, तेव्हा इकडे विजयनगर हे जगातलं दुसरं सर्वात श्रीमंत राज्य म्हणून उभारीस आलं होतं. हंपीला जायचं ते बाबराच्या आठवणी पुसून कृष्णदेवरायाच्या जाग्या करण्यासाठी

फुल- ना-फुलाची-पाकळी

तनुजा जोशी – कोहणे


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *