1908 मध्ये इराणमध्ये तेलाचा शोध लागला. सुरुवातीचे अनेक वर्ष त्यावर ब्रिटीशांचाच ताबा राहिला. 1951 मध्ये मोहम्मद मोसादेघच्या नेतृत्वातील सरकारने तेलाचे राष्ट्रीयकरण केले. परिणाम? CIA ने इराणमध्ये अंतर्गत संघर्ष घडवून हे सरकार पाडले आणि पुढची 28 वर्षे मोहम्मद रझा शाह पहलवी या अमेरिकाधार्जीन्या नेत्याच्या हातात इराणची कमान राहिली. केवळ ब्रिटिश आणि अमेरिकन नव्हे, तर सोविएत संघाने सुद्धा एकदा ऐन दुसऱ्या महायुद्धात 1941 मध्ये इराणवर ब्रिटिशांसोबत आक्रमण करून उत्तरीय इराणवर कब्जा केलेला. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी इराणमधलं सैन्य काढलं मात्र स्टालिन सोविएत सैन्य काढण्यास तयार नव्हता. संयुक्त राष्ट्रसंघाने ठराव संमत करून स्टालिनवर दबाव आणला आणि सैन्य काढण्यास प्रवृत्त केलं.
साधारण 1979 पर्यंत या पहलवीचं सरकार होतं. 1979 मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीमध्ये आयातुल्ला खोमेनीचं जी एकहाती सत्ता आली ती आजतागायत सुरूच आहे. हे सरकार कटाक्षाने अमेरिका विरोधी आहे आणि त्यामुळेच अमेरिकेचा भारतावर सातत्याने इराणकडून तेल खरेदी न करण्याबद्दल दबाव राहिला. आधीच्या अनेक भारतीय सरकारांनी हा दबाव झुगारला मात्र 2018 पासून भारताने इराणकडून होणारी तेल खरेदी कमी केली. यावर अमेरिकेने कितीही उर बडवला की भारत आमच्या दबावात आला, तरी भारताने इराणचे तेल कमी करून रशिया कडून खरेदी वाढवली हे तथ्य पुरेसे आहे भारत दबावात नाही आला हे सिद्ध करण्यासाठी.
इराणचं अस्तित्व प्रामुख्याने अमेरिका व इस्राएलच्या डोळ्यात खुपतं. जिथं योम कीप्पुर युद्धामध्ये सहा दिवसांत सहा अरबी देशांना धूळ चारणारा इस्राएल ग्रेटर इस्रायलचे स्वप्न साकार करत होता, जिथं अमेरिका संपूर्ण पश्चिम आशियावर ताबा ठेवून होता, तिथं एकमेव इराण होता जो या महत्वाकांक्षेला अडसर बनून राहिला होता. इराणदेखील काही धुतल्या तांदळातला नाही. गाझा पट्टीमध्ये हमास दहशतवाद्यांना उभं करून इस्रायलच्या महिलांवर अत्याचार करण्याचं पाप इराणच्या माथी आहेच. भारताला याच्याशी देणंघेणं नाही. जो देश भारताच्या हिताचा नाही तो भारताचा शत्रू हे साधं सूत्र आहे. इस्राएल कडून आधुनिक शस्त्रांचं तंत्रज्ञान मिळतं म्हणून तोही मित्र, इराणकडून तेल मिळतं म्हणून तोही मित्र. बाजू घेण्याची भूमिका भारताची कधीच राहिली नाही.
आज सुरू असलेलं इराण वि. अमेरिका आणि इस्राएल युद्ध गेल्या महिनाभरापासून अमेरिकेला जड जातंय. मुळात दुसऱ्या देशाच्या भूमीवर जाऊन मात्रागमन करण्याचे प्रकार अमेरिकेचे नवीन नाहीत मात्र यावेळी अमेरिका इराणच्या नव्हे, तर चीन आणि रशियाच्या जाळ्यात अडकला आहे. चीन व रशियाने सावधपणे इराणला प्याद्यासारखं उभं केलंय. हवी ती सगळी मदत इराणला याच दोन देशांकडून होतेय हे स्पष्ट आहे. इकडे अमेरिकी लष्कराची जास्तीत जास्त ताकद मात्र विनाकारण खर्ची पडतेय. काही लाखात बनवलेले इराणी ड्रोन शेकडो कोटींची अमेरिकी शस्त्रास्त्रे निकामी करतोय. उद्या अमेरिका इराणच्या जमिनीवर सैन्य उतरवेल पण असच सैन्य व्हिएतनाम आणि अफगाणिस्तानात सुद्धा उतरवलं होतच की अमेरिकेने. सर्वार्थाने अमेरिकेची सर्व शक्ती अशा एका देशाला संपवण्यात खर्च होतेय जो खरं पाहता अमेरिकेच्या शक्तीपुढे फारसा टिकू शकत नाही, पण तो नुकसान मात्र पुरेपूर करतोय. रामायणाचा संदर्भ इथं आवर्जून द्यावा वाटेल. अमेरिका अहंकाराने माजलेला रावण आहे आणि इराण म्हणजे वानर राज बाली. बालीने आक्रमण करून आलेल्या रावणाला बगलेत धरून तिन्ही लोकी मिरवलं. शेवटी रावणाला बालीचं सामर्थ्य कळलं आणि त्याने हार मानली. इराणदेखील हरणार नाही, जिंकणार तर त्याहून नाही, पण अमेरिकेची अशीच नाचक्की करत राहणार.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *