
चित्रपटाची समीक्षा चित्रपट या एकाच दृष्टीकोनातून हवी. त्यातील कथानकाची वेगळी होऊ शकते. म्हणूनच पुरोगामी, प्रतिगामी, आस्तिक, नास्तिक, भाजप, हिंदुत्व, काँग्रेस, सेक्युलरवादाला वेशीवर टांगून देउळ बंद 2 वर प्रेक्षक म्हणून टाकलेला हा प्रकाश
सर्वप्रथम तर देउळ बंद 1 चं थोडक्यात अवलोकन करूया. एका वैज्ञानिकाचा नास्तिक ते आस्तिक प्रवास इतकंच ते मर्यादित नाहीये. कथानकात काही महत्त्वाच्या त्रुटी आहेतच मात्र कथाकथन अर्थातच storytelling, इतकं लाजवाब आहे की याच जोरावर सिनेमा जिंकला. क्लायमॅक्स सीन आजही मनात घर करून आहे. शिवाय गाणी, सिनेमॅटोग्राफी, गश्मीर महाजनी आणि मोहन जोशींचा अभिनय या तगड्या जमून आलेल्या बाबी होत्या. सिनेमा मनोरंजक तर होताच, परंतु एक निश्चितशी छाप सोडणारा होता. आता याचा सिक्वेल म्हटल्यास अपेक्षा तितक्या जास्त असणारच.
पण या अपेक्षा भंग पावल्या. शेतकरी आत्महत्या, हुंडाबळी, शेतकऱ्यांचे शोषण, नास्तिकता, कर्मसिध्दांत आणि अशा अनेक अगणित विषयांचा डोलारा सांभाळता सांभाळता चित्रपट कैक वेळा घसरतो. सुरुवातीला नायिकेच्या पतीची झालेली आत्महत्या आणि त्या गोष्टीचा उलगडा दाखवताना केलेला अतिरंजकपणा नंतर पूर्ण उघडा पडलाय. जंगल, नदी, डोंगर तुडवत चाळीस किमी पायी जाव्या लागणाऱ्या गावात नंतर सहजपणे बोलेरो पिकप पासून ते पार मर्सिडीज ऑडी पर्यंत गाड्या कशा येतात? दारात बुलेट उभारलेली असताना शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या काय करतोय, भोर सारख्या अतिशय सधन शेती असणाऱ्या तालुक्यात अक्षरशः दररोज एक शेतकरी आत्महत्या करतोच काय….सगळीच अनागोंदी. देउळ बंद 1 मध्ये स्वामी शेवटी स्वामीच आहेत आणि ते का देव आहेत याचं समर्पक उत्तर मिळतं. या भागात स्वामींना मात्र एक साधारण protagonist बनवलंय. पहिल्या भागातील नास्तिक राघव शास्त्री जवळपास शेवटपर्यंत नास्तिकच होता आणि म्हणूनच क्लायमॅक्स चा सीन प्रचंड भिडला. सर्व खेळच स्वामींनी या राघवचा अहंकार मोडण्यासाठी रचला होता हे अक्षरशः पटतं. नुसतं पटत नाही तर ते relate सुद्धा होतं. शिवाय पहिल्या भागाला दत्त परिक्रमेची एक छान आखणी होती. दत्त परिक्रमेत झालेला तो साक्षात्कार मध्यंतरानंतर सुरू होतो म्हणूनच क्लायमॅक्सला रंग आला. या भागामध्ये अगदी सुरुवातीलाच तसेच कॅरेक्टर पुन्हा दिसायला लागतात. बुद्धी असणाऱ्या कुणालाही साई बाबा, शंकर महाराज यांचं रहस्य सहज कळू शकतं इतकं obvious केलं आहे हे. दरवेळी एकच ट्रिक वापरायची नसते हे कुणी प्रवीण तरडेना सांगा. आणि मुळात आत्महत्या केलेल्या नवऱ्याचे शव तसेच लटकत ठेवून पन्नास किमी दूर कुठेतरी स्मशानातल्या वारुळासमोर जाब विचारायला कुठली नास्तिक महिला येईल हे कशाही प्रकारे मनाला पटू शकतच नाही. आणि मुळात कुठलाही नास्तिक इतक्या दुःखाच्या प्रसंगी देवाच्या दिसण्याबद्दल इतका आग्रही का असेल? एक ना अनेक प्रश्न आहेत. स्वामींना आठ दिवस आत्महत्या न होऊ देण्याचा “टास्क” दिला, त्यासाठी मानवी देह धारण करायला लावला.चमत्कार करण्यास सक्त पाबंदी आणली. हे सर्व स्वामी सहन करतील असं वाटत नाही. कुठल्या नास्तिकाला आपलं अस्तित्व सिद्ध करून देण्यासाठी स्वामी कुठले insecure teenager नाहीत.
चित्रपटाची सर्वात कमकुवत बाजू म्हणजे उपदेश. जिथे तिथे शेतकऱ्यांनी काय करावं हा सल्ला देण्याचा प्रयत्न केलाय. ते चुकीचं नाही, पण ते या कथानकाच्या विपरीत आहे. शिवाय प्रवीण तरडेंनी अनेक मुलाखतींमध्ये हेच सल्ले दिले आहेत. म्हणजे हा चित्रपट मुळशी पॅटर्न आणि देउळ बंद च खरकटं एकत्र करून बनवलाय की काय असच वाटतं.
सर्वात कहर म्हणजे याचे अकरा भाग आणायचे आहेत असं स्वतः प्रवीण तरडेंनी सांगितल आहे. पूर्ण हिंदी आणि त्यामुळेच मराठी चित्रपट सृष्टीला एक खोड आहे, फॉर्म्युल्यावर चित्रपट बनवण्याची. देउळ बंद चालला तर आता त्याचं पारायणच सुरू करा. प्रेक्षकांना गृहीत धरणं चूक आहे आणि प्रेक्षक त्याचं फलित तुमचे चित्रपट फ्लॉप करून देतातच.
चित्रपटाच्या निवडक जमलेल्या बाजूंमध्ये स्नेहल तरडे, मोहन जोशी, संस्कृती बालगुडे, सविता मालपेकर यांचा अभिनय. प्रवीण तरडे त्याच मुळशी पॅटर्नच्या नन्या भाईच्या भूमिकेत आहेत, फक्त नाव बदललं आहे. त्यांना असा रोल करण्यास मजा येते की हे सोडून दुसरं काही जमतच नाही असा प्रश्न पडतो. थोड्याच सीन पुरता, पण ओम भुतकर भाव खाऊन जातो. थिएटरच्या बाहेर पडताना पश्चाताप कमी झाला तो पोस्ट क्रेडिट सीन मध्ये गश्मीर महाजनीला बघून. त्या एका सीनमध्ये असं वाटलं की बाबांनो हे तुम्हाला तिसऱ्या भागात करायचं होतं तर हा दुसरा भाग आणला तरी कशासाठी? तसंही गश्मीरला मराठी इंडस्ट्रीने अक्षरशः वाया घालवलाय. चांगला दिसणारा, उंचापुरा, बॉडी बिडी असणारा आणि विशेष म्हणजे उत्तम अभिनय जमणारा इतका तगडा अभिनेता घेऊन मराठी चित्रपट किमान राष्ट्रीय पातळीवर आणता आला असता, पण दुर्दैव.
असो. प्रवीण तरडे आणि मित्र परिवार यांना रोजगार मिळवून देणाऱ्या या प्रकल्पाला पाचपैकी दीड स्टार.
0 Comments