
गणेशोत्सव सुरू झाला. याहीवेळी उकडीचे विरुद्ध तळणीचे मोदक, घाटी विरुद्ध कोकणी असे विनोदी वाद सोशल मीडियावर पेटले. याहीवर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या ढीगभर पोस्टी, पुण्या-मुंबईच्या उत्सवांची क्रेझ, DJ चा वाद वगैरे गोष्टी देखील झाल्याच.
एक गोष्ट नेहमी निदर्शनास येते. “एका रात्रीत मुंबई रिकामी करण्याची ताकद फक्त कोकणवासीयात आहे” असं म्हणतात मुंबईत स्थलांतरित कोकणी चाकरमान्यांच्या गणेशोत्सवात निघण्याबद्दल. त्यांच्या रेल्वेची तिकिटे न मिळण्याच्या कौतुकापासून ते त्यांच्याच साठी अवघ्या महाराष्ट्रभरातील एसटी आगारातून उचलून नेलेल्या बसेस पर्यंत सर्व कोकणी गणेशोत्सवाचे कौतुक सोहळे बघायला मिळतात. अर्थात, आनंदाचीच गोष्ट आहे ही. महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या स्वर्गात संस्कृती जपणारे लोक राहतात हे पाहून अभिमानच वाटतो. पण मग पुण्यात राहणारे मराठवाडा – विदर्भ वासी गणेशोत्सवात आणि दिवाळीत घरी गेल्यानंतर “गेली बाहेरची घाण”, “आता राहिले ते खरे पुणेकर” किंवा “बाहेरचे नसल्यावर पुणे किती मोकळं दिसतं” वगैरे कमेंट्स येतात. मुद्दा हा आहे की कोकणाने आपली संस्कृती महाराष्ट्राच्या सार्वजनिक अवकाशात ठामपणे मांडली; मराठवाड्याने मात्र स्वतःची संस्कृती स्वतःच मागे ठेवली. प्रत्येक वेळी गणेशोत्सवात प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट ही की पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांचा सांस्कृतिक दबदबा, विशेषतः कोकणाचा. पण यात मराठवाडा आणि विदर्भ कुठे? खानदेश कुठे? ज्या सणाला मोठ्या कौतुकाने “गौरी गणपतीचा सण” म्हणतो की जिथे लेकी माहेरी येतात, अहो पण मराठवाड्यात तर लक्ष्मी येते ना त्या तीन दिवसात! हा आमच्यासाठी सुनांचा सण असतो. ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी बसते आमच्याकडे हे अनेकांना माहित नसतं.
गणपतीच्याच बाबतीत बोलायचं असेल तर मराठवाडा काही कमी समृद्ध नाही. हिंगोलीचा नवसाला पावणारा चिंतामणी, जालना जिल्ह्यातील राजुरचा महागणपती, बीड जिल्ह्यातील नवगण राजुरीचा गणपती, माजलगावचा टेंभे गणपती, लातूरचे अष्टविनायक मंदिर, नांदेड जिल्ह्यातील पुरातन त्रिकुट गणपती आणि अशी आणखी अनेक मंदिरं….मराठवाड्याच्या रक्तात तुळजा भवानी, येडेश्वरी, रेणुका देवी, योगेश्वरी यांच्या रूपाने ही शाक्त परंपरा सर्वाधिक असताना सुद्धा गणपतीवरील श्रद्धा तितकीच मोठी आहे. गणेशोत्सव मराठवाड्यात जल्लोषातच साजरा होतो, सार्वजनिक असो किंवा खाजगी, आणि गणेशोत्सवातील मानबिंदू म्हणजे महालक्ष्मी आगमन, पूजन आणि विसर्जन. षष्ठीच्या दिवशी आगमन, सप्तमीला पूजन आणि अष्टमीला विसर्जन. पूजनाच्या दिवशी सोळा भाज्या, सोळा चटण्या, पुरणपोळी, कढी, आमटी, करंजी, बेसन लाडू, अनारसे, खीर आणि साखरभात असा भरगच्च नैवेद्य असतो. महालक्ष्मीचे पूजन असल्याने घरच्या सर्व सुनांनी एकत्र यावे लागते. कोकण व पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्याची ही फार वेगळी पद्धत आहे. या महालक्ष्मी पूजनामागचे रहस्य हे की श्रावण महिन्यात ज्येष्ठादेवीची प्रतिष्ठापना आणि पूजा सुरू होते आणि त्या ज्येष्ठाला भेटायला कनिष्ठा येते अशी ती मान्यता आहे. यांना लक्ष्मी यासाठी मानतात कारण याच काळात खरिपाची पिके चांगली बहरलेली असतात आणि एकप्रकारे धान्य, समृद्धी ही लक्ष्मीची रूपं मानून लक्ष्मी देवी प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. घरच्या सुनांबद्दल देखील अशाच प्रकारे कृतज्ञता आणि सन्मान व्यक्त करण्याचा हा सोहळा मानला जातो. अगदी वर्ष वर्ष सासू सासऱ्यांपासून दूर राहणाऱ्या सुना देखील याच सणाला एकत्र येतात.
मराठवाड्याची इमेज ही केवळ दुष्काळ, मागासलेपण, जातीवाद एवढ्यापुरती मर्यादित होऊन राहिलीय. काही पुणेरी महाभाग तर मराठवाड्याला चक्क वाळवंट म्हणतात. अहो येऊन बघा मराठवाडा एकदा. मराठी भाषेने इथे जन्म घेतलाय, आद्यकवी इथे नांदले. इथे हेमाडपंथी मंदिरं बांधली गेली. इथं भारुडं रचली गेली. इथंच सह्याद्रीचा लहान भाऊ बालाघाट आहे. इथच नांदेड जिल्ह्यात पैनगंगा अभयारण्य आहे. इथेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी वसते, तीन ज्योतिर्लिंग आणि कोकणस्थांची कुलदेवता सुद्धा इथेच. गवळणी इथल्याच, देवीचा गोंधळ आणि कवनं इथलीच आणि आद्य संत ज्ञानेश्वर महाराजांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत थोर महापुरुषांची मुळं सुद्धा इथलीच.
मराठवाडा नेहमीच संस्कृती ठासून सांगण्यात कमी पडलाय तो काही विशिष्ट कारणांमुळे. सांस्कृतिक समृद्धी आर्थिक समृद्धीसोबतच चालते त्यामुळे मराठवाड्याचं मागासलेपण कारणीभूत आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या लोकांची मानसिकता. मराठवाड्यातील जवळपास प्रत्येक मध्यमवर्गीय घराची कथाच आज ही आहे की तरुण पोरं शिक्षण किंवा नोकरी निमित्त पुण्याला स्थलांतरित झाली आणि मराठवाड्यातील जी काही संस्कृती आहे तिच्यावर या पश्चिम महाराष्ट्रीय किंवा पुणेरी संस्कृतीचा संकर होत जातोय. शिवाय, सर्वार्थाने पश्चिम महाराष्ट्र अधिक समृद्ध असल्याने मराठवाड्याच्या पोरांना आपल्या संस्कृतीत काही चांगलं आहे का याचा एकतर विसर पडलेला असतो किंवा मुळात आपल्या संस्कृतीचे गाभारे किती खोल आहे हे माहित सुद्धा नसते. काही सन्माननीय अपवाद सोडले, की जे सोशल मीडियावर मराठवाड्याच्या इतिहास, भूगोल आणि संस्कृतीचा जागर करतात, तर बाकी बहुतांश लोकांमध्ये ही सांस्कृतिक अरसिकता ठासून भरलेली दिसते. मराठवाड्यातील सण उत्सवांमध्ये वरकरणी सगळं काही झगमगाटात दिसत असताना हरवत चाललेला अस्सलपणा आज कुणाच्या लक्षात येत नाहीये पण लवकरच तो नामशेष झालेला असेल. पुण्याच्या तोडीस तोड लातुरात ढोल ताशे दिसतील पण हलगीच्या तालावर लेझीम नाचणं मात्र दिसत नाहीये. उकडीच्या मोदकाचं गुणगाण होतच राहो पण गव्हाचे तळलेले मोदक मात्र घराघरातून कमी होत जातायत. मराठवाड्याहून कठीण परिस्थिती असताना सुद्धा राजस्थानची लोकपरंपरा किती जपून आहे याचा आपण विचार करायला हवा. आपल्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान असेल तरच इतरांच्या नजरेत आपला मान असेल. अन्यथा वाटचाल ऱ्हासाकडेच.
संस्कृतीचा ऱ्हास होणं हे परकीय संस्कृतीला आयतं कोलित असतं. यादव साम्राज्य बुडाल्यानंतर तोवर समृद्ध असणारा मराठवाडा नंतर अनेक परकीय सत्तांच्या हातून जाताना आपली ओळख कधीही विसरला नाही, अगदी हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या रक्ताच्या होळीत न्हाऊन निघून देखील ही ओळख मिटली नव्हतीच; परंतु विकासाचा असमतोल, निसर्गाची अवकृपा, वाढती स्थलांतरं, बदलती लोकसंख्या आणि काही प्रमाणात लोकांच्या बदलत जाणाऱ्या प्राथमिकता या सुरू असणाऱ्या ऱ्हासाला सरळसरळ कारणीभूत आहेत.
असो, गणेशोत्सवाच्या आणि 79 व्या हैदराबाद/मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा!
0 Comments