Disclaimer – सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी कसलाही सम्बन्ध नाही, आढळल्यास योगायोग समजावा. All rights reserved with dpmspeaks.wordpress.com

———-////////////———-/////

ऑक्टोबर 2025.

दिवाळी निमित्त अमेय वेळात वेळ काढून कॅनडाहुन चार दिवस आलेला. एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कम्पनीमध्ये CFO होऊन गलेलठ्ठ पगार उचलणारा, सदैव महागड्या गाड्यांमध्ये फिरणारा अमेय आज खुश वाटत नव्हता. त्याचं आजोळ हरवलं होतं. तसा तो आज सुवर्णा मावशीकडे थांबलेला मात्र आजोळच्या आठवणी आज डोळ्यातलं पाणी थांबू देत नव्हत्या.

“अम्यादादा काय तोंड घेऊन बसलास असं सडकं? बरं सांग, तुझा बर्थडे येतोय, काय गिफ्ट देऊ? आणि ए, काहीतरी हलकं सांग हां, मी तुझ्याइतकी श्रीमंत नाहीये!” त्याची मावस बहीण मधुरा बोलली.

“मधुरा आपलं लहानपण तर नाही येणार ग वापस. आता बघ तुझंही एक दोन वर्षात लग्न होईल मग तु सुद्धा सांसारिक होशील. माझ्या सख्या बहिणी कधीतरी फोन करतात. काही गिफ्ट नको ग, वर्षातून एकदा भेटत तेवढी जा.” अमेय म्हंटला.

“खरंय रे अम्यादादा. साहिलदादा तर चार वर्षानंतर आत्ता यूएसमधून आला. मंदार सुद्धा बंगलोरला सेटल झालाय बायको सोबत. मृण्मयी आणि मीच काय ते मामाकडे जात असतो अधून मधून. आपले सगळे मामासुद्धा आता म्हातारे झालेत. प्रशांत मामाची तर गेल्या महिन्यात बायपास सर्जरी करावी लागली. बरं तुझी आई, शोभा मावशी, तिच्याकडे जावं तर तू नसतोस. मग सांग कुठलं आजोळ आणि कुठले कझिंस राहिलेत? साहिल दादा, राणी ताई, रेणू ताई, मंदार दादा सगळ्यांची लग्नं झालीत. आम्ही दोघी, मी आणि मृण्मयी, आहोत जुळ्या पण नाही जमत आमचं. राहिला छोटा विश्वेश, तो छोटा म्हणता म्हणता ग्रॅज्युएशन ला आलाय. चार चार गर्लफ्रेंड्स एकत्र फिरवतो तो काय मिसळणारे आपल्यात?” मधुरा ने काहीश्या चिडक्या सुरातच म्हंटलं!

“ए आठवतं या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? आपलं आजोळ तुटायला सुरू कधी झालं?” अमेय ने विचारलं

“का नाही आठवणार. छोटी मावशी इतक्या वर्षात भारतात तर आली नाहीच पण कधी साधा व्हिडिओ कॉल सुद्धा नाही. त्या दिवशी आईने फोन केला तेव्हा तिची सेक्रेटरी म्हणते मॅडम सहा दिवस अव्हेलेबल नाहीत म्हणून. आजी गेली तेव्हाही फक्त एक दिवस येऊन गेली. माझ्यात आणि मृण्मयी मध्ये फरक करता आला नाही तिला. गालावरच्या खळ्या मला पडतात याचं एकेकाळी सर्वात जास्त कौतुक छोट्या मावशीलाच होतं.” – मधुरा

“मधुरे त्या दिवशी सुद्धा माझा बर्थडे होता. छोट्या मावशीचं लग्न जमलं तर माझं सेलिब्रेशन विसरले सगळे. मी दहा वर्षांचा होतो पण कुणाला माझ्या फिलिंग्ज चं काही पडलं नव्हतं, सगळे आपले छोट्या मावशीचं लग्न ठरलं अन जावई ऑस्ट्रेलियन आहेत याच कौतुकात.” – अमेय

“हो आणि तू शिडीवरून पडला होतास. अरे हां आणि सागर मामा ने त्या दिवशी त्या kodak च्या कॅमेरा मधून आपले किती फोटो घेतले होते. थांब मी तो अलबम काढते. तू आई आणि शोभा मावशी ला आवाज दे आपण सगळे मिळून फोटो बघूया.” – मधुरा

आणि सर्वांनी अलबम बघायला सुरू केलं. आणि फोटो पाहताना अमेय त्या सर्व आठवणींमध्ये रमून गेला.

25 ऑक्टोबर 2006, नांदेड मधील एक जुना रहिवासी भाग आणि त्यातील देगलूरकर कुटुंबाच्या घरी दिवाळीनंतरही दोन दिवस थांबलेला पाहुण्यांचा गराडा. देगलूरकरांचं घर म्हणजे त्या कॉलनीमध्ये, किंबहुना संपूर्ण नांदेडमध्ये सर्वात प्रशस्त घर. साडेसात हजार स्क्वेअर फूट जागेत बारा खोल्यांचं भलं मोठं घर, समोरून अंगण, मागच्या बाजूस मोठी बाग इतकं प्रशस्त. दोन्ही बाजुंनी रस्त्याला लागून असणारे गेट्स आणि त्याच्या कमानींना वेलींनी घातलेला घेराव पाहता घर आतून किती समृद्ध असेल हे सांगायची गरज नको.

देगलूरकरांच्या मोठ्या मुलीचे तिन्ही अपत्य, मोठ्या मुलाचे दोन्ही मुलं, मधल्या मुलीच्या दोन्ही मुली आणि धाकट्या मुलाचा लहान मुलगा इतका सगळा लहान मुलांचा गराडा.

“अमेय, शिडीवर चढू नकोस, खाली उतर.” आशा मामीने सर्वात लहान भाच्यास रागावले. खोडकर अमेय ऐकणारा थोडीच होता. तेवढ्यात तो शिडीवरून पडला आणि त्याचा गुडघा फुटला. आजी धावतच तिथे आली आणि अगोदर तर एक पाठीत धपाटा ठेऊन दिला आणि नंतर डॉक्टरकडे नेऊन मलमपट्टी करून आणली. त्या रात्री सर्व बच्चेकंपनी खुश होती. सर्वात छोट्या सागर मामा/काका ने फिर हेरा फेरी ची डीव्हीडी आणून लावलेली आणि मोठ्या मामीने पावभाजीचा बेत केलेला. लहानग्यांच्या आनंदाला इतकं पुरेसं असलं तरीही आजी आजोबा पासून सर्वजण विशेष आनंदात होते. सर्वात छोटी मुलगी म्हणजेच पौर्णिमाचं लग्न ठरलं होतं त्या दिवशी. देगलूरकरांचे होऊ घातलेले सर्वात छोटे जावई ऑस्ट्रेलिया मध्ये मोठे बिझनेसमन होते, शिवाय एका नामांकित विद्यापीठात प्रोफेसर सुद्धा होते. लेकरांना पौर्णिमा मावशीचं/आत्याचं लग्न ठरलंय याव्यतिरिक्त ते काय कळणार, मात्र हे लव्ह मॅरेज होतं. पौर्णिमा बंगलोरला शिकायला असताना श्रीकांत आणि तिची भेट झाली. पुढे श्रीकांत ऑस्ट्रेलियाला गेला मात्र पौर्णिमेला विसरला नाही, रीतसर गजाननरावांकडे तिचा हात मागितला आणि लग्न ठरलं.

लग्नात भरपूर खर्च केला गजाननरावांनी. सर्वात छोट्या लेकीचं लग्न आणि येत्या निदान पंधरा वीस वर्षांसाठी तरी शेवटचं कार्य. दिवाळीनंतर लगेचच 27 तारखेपासून लग्नाची तयारी सुरू झाली. पासष्ठ वर्षांचे गजाननराव हिरीरीने सहभाग घेऊन कर्तव्य पार पाडत होते. त्यांच्या उरलेल्या पुढच्या 15 वर्षांच्या आयुष्यात नंतर कधीही स्वतःची सर्व मुलं, सुना, लेकी, जावई आणि नातवंडं असे एकत्र आले नाहीत. तो लग्नाचा कार्यक्रम खरोखरच एक मोठी आठवण होता. अलबम बघता बघता अनेक आठवणींनी सुवर्णा मावशी आणि अमेयच्या आईच्या डोळ्यात पाणी येत होतं.

आणि आज, 24 ऑक्टोबर 2025, हेच देगलूरकरांचं घर लिलावामध्ये निघालेलं.

हे कर्ज घेतलं गेलं होतं पौर्णिमा मावशीच्या शिक्षणासाठी. पौर्णिमेचा IIM बंगलोर ला पहिल्या लिस्टमध्ये नंबर लागलेला. या कर्जामुळे किती ओढाताण होत होती हे स्वाभिमानी असणाऱ्या आजोबा आजींनी मरेपर्यंत कुणाला कळू दिलं नाही. मात्र याची पूर्ण कल्पना पौर्णिमेला होती. तिने मात्र काहीही मदत केली नाही. स्वतःच्या आईवडिलांशी असा दगा केल्याच्या परिणाम बघा, आज लग्नाला वीस वर्षे होऊनही पौर्णिमेला अपत्य झालंच नाही.

तसे गजाननराव हे कर्ज फेडू शकले असते, पिढ्यांचे कापड व्यावसायिक असल्यामुळे हे फार काही अवघड नव्हतं. सुवर्णा मावशी च्या फी साठी तर एरवी सुद्धा पैसे असे निघाले असते, मात्र पैशांचं गणित योग्य जमवण्यात गजाननराव निपुण असल्याने त्यांनी घरावर कर्ज काढलं.

मोठ्या मामाने म्हणजेच प्रशांत मामाने हा पिढ्यानपिढ्या चाललेला व्यवसाय नांदेडच्या जुन्या मोंढ्यातून बाहेर काढून फॅक्टरी मध्ये आणला. जुनं कापड दुकान आता जवळजवळ बंद पडलं होतं. गजाननराव तरीही हौसेने स्वतः ते दुकान मरेपर्यंत चालवायचे. पुढे चालून प्रशांत मामाने नांदेड मध्येच दुसरा मोठा बंगला बांधला आणि गजाननराव-निर्मलबाईंना एकटं त्या घरात सोडून निघून गेला. सागर मामाने पुण्यात स्थायिक होणं पसंत केलं. 2015 मध्ये अशाप्रकारे हे भरलं घर बघता बघता विभक्त झालं.

2020 येताच कापड व्यवसायावर कुऱ्हाड बसली ती लॉकडाऊन आणि पाठोपाठ आलेल्या आर्थिक मंदीमुळे. गजाननरावांनी कधीही व्यवसाय बुडीत खाती जातोय म्हणून कुणासही मदत मागितली नाही; राहिले असते तर अगदी सहज परत एकदा दुकानाला सोन्याचे दिवस आले असते. मात्र गजाननराव कोरोनामुळे गेले. प्रशांत मामाच्या लाख आग्रहानंतरही निर्मला आजींनी गजाननराव गेल्यानंतर जुनं घर सोडून नवीन घरात स्थायिक होण्यास संमती दिली नाही. आजींनी सुद्धा त्यांच्या परीने दुकान सांभाळलं मात्र 2024 मध्ये त्यासुद्धा गेल्या. परिणामी बँकेने कर्जाला तारण असणारं जुनं घर जप्त केलं. आलिशान बंगला असणाऱ्या मामाला त्या जुन्या घराचं विशेष कौतुक नसल्यामुळे त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं.

आणि आता उद्या म्हणजेच 25 ऑक्टोबर 2025 ला या घराचा जाहीर लिलाव होणार होता बँकेकडून!

अमेय उद्या 29 वर्षांचा होणार. अद्यापही लग्न न केल्याबद्दल सगळीकडून बोल लावून घेत होताच. मात्र त्याच्या अमर्याद महत्त्वाकांक्षा लग्न-संसार यासारख्या गोष्टींना पार करून गेलेल्या. त्याच्या आजोळच्या सर्वांची लग्न झालेली, अगदी त्याच्याहुन दोन वर्षे लहान असलेल्या मंदारचं सुद्धा.

“ए अम्या, उद्या तू का नाही घेत ते घर लिलावामध्ये? तुझ्याकडे तर तेवढा पैसा नक्कीच असेल ना!” मधुरा ने सुचवलं.

“मधुरे ते आजोळ आहे माझं. जिथं मी हक्कानं लाड करून घ्यायचे तिथं मालकी हक्क कसा सांगू?” – अमेय

“तू आणि तुझे एथिक्स..!” कपाळावर आठ्या पाडत मधुरा बोलली, “बरं ऐक ना, लिलाव झाल्यानंतर थोडातरी वेळ जातच असेल ना पुढच्या कारवाई ला. बँकेला विचारून उद्या संध्याकाळ पुरतं घराच्या गच्चीवर तुझी बर्थडे पार्टी ऑर्गनाईज करूया ना. तशीही ती बँक माझी ऑडिट कलाईन्ट आहे माझी ओळख आहे मॅनेजर शी.”

“ग्रेट आयडिया. सीए होऊन ओळखी-पाळखी मस्त जमवल्यास हां. ठिके करू उद्या संध्याकाळी ऑर्गनाईज. आणि कोण कोण येईल?” – अमेय

“हे बघ साहिलदादा तर आणखी वापस गेला नाही, त्याला मृण्मयी ओढून आणेल. मंदार येतो म्हणलाय. विश्वेश तर आहेच. बाकी मामा, मामी, मावशी, आई आणि मृण्मयी आपण आहोतच.” – मधुरा

25 ऑक्टोबर 2025. स्थळ : देगलुरकरांचं जुनं घर. दुपारच्या बारा वाजता लिलावाची प्रक्रिया सुरू झाली. नांदेड-लातूर मधून मोठमोठे लोक सहभागी होते. एक ब्रिटिश महिला सुद्धा होती. सहा कोटीच्या सर्वाधिक बोलीवर नुपूर एडलर या भारतीय वंशाच्या ब्रिटिश महिलेने ते घर विकत घेतलं. यावेळी प्रशांत मामा सुद्धा उपस्थित होता.

“ए अगं ऐकलं का मधुरे…सहा कोटीला कुठल्यातरी NRI बाईने विकत घेतलं ते घर” – मृण्मयी

“हळू बोल. लिलावाचा विषय काढून अजून रडारड बघायचिये का घरात? आधीच आई आणि मावशी कालपासनं मूड मध्ये नाहीयेत आणि त्या अम्याला नालायकाला तर काही बोलायलाच नको. कारणच पाहिजे असतं रडायला त्याला” – मधुरा

“असं म्हणू नको ग बर्थडे आहे बिचाऱ्याचा. बरं ऐक, मॅनेजरने सांगितल्याप्रमाणे त्या नुपुरची परमिशन घेऊन आज रात्री जुन्या घराच्या गच्चीवर मंडप टाकून मोठी पार्टी करणार आहोत. मी आणि विश्वेश ने सगळी तयारी केलीये.” – मृण्मयी

“ग्रेट. चल तू आता घरी थांब मी अम्याला गिफ्ट घेऊन येते.” – मधुरा

त्याच दिवशी संध्याकाळी जुन्या घरच्या गच्चीवर अमेयचा 29 वा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला. प्रशांत मामा, आशा मामी, मंदार आणि साहिल सपत्नीक, विश्वेश, सुवर्णा मावशी, मधुरा मृण्मयी सगळ्यांना एकत्र बघून त्याला बालपण वापस आल्यासारखं वाटत होतं.

मात्र अजूनही प्रेयसीचा साधा मेसेजही आला नाही म्हणून हलकासा नाराज होताच अमेय. इतक्यात मधुरा ने गच्चीवरून पाहिलं, खाली एक गाडी येऊन थांबली ज्यातून नुपूर एडलर बाहेर आली. मधुरा धावतच खाली आली. नुपूर ला तिने गच्चीवर आणलं. नुपूर पुर्णपणे भारतीय वेशात नटून आलेली होती. अमेय तिला पाहताच अवाक झाला.

“Darling what a pleasant surprise….How come you’re here?” अमेयने विचारलं.

नुपूर ने काही उत्तर द्यायच्या आत मधुरा ने स्पष्टीकरण द्यायला सुरू केलं, “अम्या हे माझं बर्थडे गिफ्ट. नुपूर माझी क्लाएंट आहे. हिचे डिटेल्स चेक करत असताना तुमचं HSBC बँकेत जॉईंट अकाउंट पाहिलं आणि लावले सगळे अंदाज. गेल्या सहा महिन्यांपासून आमचं बोलणं सुरू आहे. तू म्हणे लग्नाला टाळाटाळ करतोयस? ऐकलं का मावशी, ही सून पाच वर्षांपासून माप ओलांडायला तयार आहे तुझ्या घरचं आणि हा अम्या काही लग्नाला तयार होत नाही. काही बहाणा नाही चालणार आता. Nupur, go and wear him the engagement ring. आणि विश्वेश ही घे अम्याला दे. अम्या अंगठी घाल तिला.”

“म्हणजे नुपूर तू हे घर विकत घेतलंस?” – अमेय

“अरे मी काय हिब्रू मध्ये सांगितलं का?” मधुरा वैतागून म्हटली.

“अम्यादादा आता तुझं लग्न पण याच घरी इथेच गच्चीवर होणार आणि आपल्या सगळ्यांचे सगळे कार्यक्रम आणि रियुनियन याच घरात होणार. याचं रिनोव्हेशन आपण सगळे मिळून करणार आहोत” – विश्वेश

“आणि दर दिवाळीला आणि उन्हाळ्यात एकदा आमरस खायला म्हणजे वर्षातून दोनदा आपण सगळे इथं जमणार” – मृण्मयी

हे सगळं होत असताना अमेय, त्याची आई, सुवर्णा मावशी, मामा, मामी, साहिल, मंदार सगळेजण अवाक होऊन बघत होते

“पाया पडते आई” नुपूर म्हंटली.

“अरे हिला तर मराठी येतं की!” मामा म्हटला

“अर्थात येणार मामा. माझी मामी या अमेयची मावशी पडते” – नुपूर

“पौर्णिमाची भाची लागते का ही! बरंय पौर्णिमा तर वापस आली नाही पण तू सून म्हणून येतेयस” अमेयच्या आईने नुपूरच्या डोक्यावरून हात फिरवत म्हंटलं.

“मामीला माहेरच्यांची कदर नाही हे जरी खरं असलं तरी तिच्या बिझी शेड्युल मधून मी तिला आणलेलंच आहे. अम्याशी लग्न करणारे हे ऐकून सगळं काम टाकून दुपारीच ऑस्ट्रेलिया वरून निघालीये.” – नुपूर

“अम्या हिच्या रूपाने लक्ष्मी आली रे. पौर्णिमेला वापस आणणं या जन्मात तरी शक्य वाटत नव्हतं. पोरी, तुटलेलं घर जोडलंस ग!” भावुक सुरात मामी म्हंटली.

“मी काय म्हणतो, एंगेजमेंट उरकूया का?” मंदार बोलला

“आणि हिचे आईबाबा?” सुवर्णा मावशीने प्रश्न केला.

“मला आईबाबा नाहीत. माझे आईबाबा लहानपणीच गेले. मामा-मामीनेच मला मोठं केलं आणि आज अम्यासोबत त्याच्याच कंपनीची सीईओ आहे.” – नुपूर.

“एंगेजमेंट ला थांबा आता. पौर्णिमा आणि श्रीकांतराव आल्याशिवाय नाही करायची. राणीला फोन लाव ग शोभा, उद्याच नागपूरवरून निघायला सांग आणि रेणुला सुद्धा इंदौर हुन विमानाने ये म्हणावं त्वरित! सागर ला सांगतो मी तो ताबडतोब पुण्याहून निघेल. पर्वाला मोठा जंगी साखरपुडा करूया. तोपर्यंत नुपूर तू सुवर्णाकडे थांब आणि अम्या तू माझ्या घरी ये. आपला परिवार परत एकदा एकत्र आनंद साजरा करेल.” प्रशांत मामा म्हंटला.

अनेक वर्षांच्या शीतसंघर्षातून हळूहळू नकळतपणे विभक्त झालेलं देगलूरकर कुटुंब परत एकदा एकत्र आलं आणि अम्याच्या वाढदिवसाला त्याचं हरवलेलं आजोळ परत मिळालं. गजाननराव आजोबा आणि निर्मला आजी स्वर्गातून नक्कीच पाहून आशीर्वाद देत असतील.

The End

——————–///////——////////———

Written with warm regards by

Dnyanesh Make “The DPM”


1 Comment

Monika Trivedi · 15 September 2021 at 7:30 am

mast story ekdam khupch sundar

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *