दर्श वेळ अमावस्या

म्हणजेच ज्याचा अपभ्रंश होतो येळामुशा किंवा येळवस.
मूळचा कर्नाटकी असणारा, मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जाणारा हा सण महाराष्ट्रात मुख्यत्वे बीड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात साजरा केला जातो. याव्यतिरिक्त काही प्रमाणात सोलापूर व नांदेड जिल्ह्यात देखील हा सण साजरा होतो. यामध्ये लातूरची वेळ अमावस्या खास आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला वर्षातून तीन स्वघोषित सुट्या जाहीर करण्याचा अधिकार असतो. लातूरमध्ये यातली एक सुटी नेहमी वेळ अमावास्येला राखीव असते. या दिवशी लातुरात एकही दुकान, ऑफिस, हॉटेल जर सुरू राहिलं तर शपथ! सर्वजण आपापल्या गावी शेतात आपापल्या परिवारासह जातात, आणि जर कुणी लातूर बाहेरचं असेल किंवा जर कुणाकडे शेत नसेल तर काळजी नसावी. वेळ अमावस्या हे लातूरकरांच्या पाहुणचाराचे सर्वोच्च प्रतीक! चला जाणून घेऊया या सणाबद्दल.

पांडव पूजा
पांडव पूजा
वेळ अमावस्या पूजा


शेतामध्ये जाऊन पांडव पूजा आणि वनभोजन हे या सणाचे मुख्य औचित्य. आणि काय बेत असतो या वनभोजनाचा? सर्वप्रथम तर ज्वारी-बाजरीच्या भाकरी, बाजरीचे उंडे, विविध प्रकारच्या भाज्या मिसळून त्याला फक्कड अशी बेसनाची जोड देऊन तयार केलेला मिक्स व्हेज प्रकार म्हणजेच “भज्जी”, बेसनाच्या खमंग वड्या (ज्याला मराठवाड्यात मासवड्या असे म्हणतात), दोन तीन प्रकारचे ठेचे व चटण्या, गव्हाची खीर आणि किमान 15-20 ग्लास तरी पिल्याशिवाय समाधान होणार नाही अशी “आंबील”! आणि हे सगळं शेतात, डिसेंम्बर-जानेवारीच्या थंड वातावरणात आणि रबीची पीके उभारीवर असताना. केवळ बोलण्याकरिता म्हणून नव्हे, तर अगदी मनापासून वाटतं, सगळी फाईव्ह स्टार हॉटेल्स ची मेजवानी या वेळ अमावस्येपुढे फिकीच!

हा सण बऱ्याच अर्थांनी अतिशय खास असण्याचं कारण म्हणजे रबी हंगामातील पिके जेव्हा बहरून येतात तेव्हा आपल्या मातीशी, काळ्या आईशी कृतज्ञता व्यक्त करणे हा त्यामागचा मूळ शुद्ध भाव.या दिवशी शेतात धरणीमातेची ओटी भरली जाते व पांडवांची पूजा केली जाते. ही पूजा कडब्याची एक सुंदरशी खोप बनवून केली जाते. पांडव पूजनामागे कुठली पौराणिक गाथा असेलही, असं म्हणतात त्या दिवशी पांडव शेतात जेवण्यासाठी येतात. या सणाच्या निमित्ताने शेताशी, मातीशी आणि ग्रामीण भागाशी प्रत्येकाची नाळ घट्ट होते. परिवार एक दिवस का होईना, पण एकत्र येतो. खाद्यसंस्कृती जपली जाते.

वेळ अमावस्या


भारतीय सणांचं वरचेवर होत असणारं विकृतीकरण आणि त्यातून होणारी पर्यावरणाची हानी पाहता वेळ अमावस्या किती चांगला सण वाटतो ना? चला तर मग, पुढच्या वेळ अमावस्येला या तुमच्या बीड, लातूर किंवा उस्मानाबादकर मित्राच्या शेतात!
Warm Regards,
Dnyanesh Make “The DPM”


2 Comments

Vishal · 11 January 2021 at 6:29 pm

एकदम छान सविस्तर सांगितलं आहे.

    The DPM · 3 February 2021 at 11:43 am

    धन्यवाद!

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *