रायरेश्वर मंदिर

रायरेश्वर,हे नाव तुम्ही शेवटचं कुठे ऐकलं होतं,काही आठवतं का? चौथीचा इतिहास? होय, हेच ते रायरेश्वर. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ती याच रायरेश्वराच्या साक्षीने. हे मंदिर प्रत्यक्ष पाहण्याची, अगदी डोंगर चढून, निसर्गाची मज्जा लुटत गिर्यारोहणाची संधी मला नुकतीच मिळाली ती ‘अनादि – एक विचार’ या पुण्यातील संस्थेमुळे. चला तर मग माझ्यासोबत रायरेश्वरच्या पठाराची शाब्दिक सैर करूया.

रायरेश्वर पठार

रायरेश्वर पठार हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं आहे, शिवरायांनी काबीज केलेले बरेच गड,किल्ले हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आहेत,त्यामुळे सह्याद्री नेहमीच शिवप्रेमींना खुणावतं.

रायरेश्वर पठार पुण्यापासून ८४ किमी वर भोर तालुक्यात वसलेले आहे. कोराळे गावापासून अस्वल खिंडी पर्यंत पूर्व-पश्चिम पहुडलेल्या या पठाराचा विस्तार १६ किमी असून पठारावर असलेल्या सर्वोच्च टेकडीच्या माथ्यावरून उत्तरेला तुंग,तिकोना,लोहगड व विसापूर, प्रतापगड, केंजळगड,कमळगड,विचित्रगड व मकरंदगड हे किल्ले दिसू लागतात. पठारावर पाहण्यासारखे पांडवकालीन शिवमंदिर, पांडवकालीन लेणी, गोमुखकुंड आहे. हे पठार समुद्रसपाटीपासून १३३६ मिटर उंचीवर आहे. रायरेश्वर ला जाण्यासाठीचा मार्ग हा भोर तालुक्यातूनच जातो. भोर वरून रायरेश्वरला दोन मार्गांनी जाता येतं.पहिला मार्ग टीटे धरण मार्गे आंबवडे गावातून जातो, तर दुसरा मार्ग हा रायरी गावातून जातो.

सुरुवातीची जुळवाजुळव

ट्रेक ला जाण्याचा निर्णय तसा माझ्यासाठी सोपा नव्हता, ट्रेक या शब्दाचा आणि माझा दूरदूरचा संबंध नव्हता असं म्हणायला हरकत नाही. याची सुरुवात झाली, जेव्हा माझा मित्र DPM  म्हणजेच ज्ञानेश याने मला ट्रेक ला येण्याबाबतीत विचारले. माझी मनस्थिती अगदी द्विधा झालेली. एकीकडे तर ट्रेकिंग ला जाण्याची ईच्छातर खूप, पण त्याच वेळी धाकधूक ही होती की एकतर ट्रेकिंग बाबतीत मी नवखी आणि त्यात उंचीची भीती. परंतु रायरेश्वर पठार हे जास्ती उंच नाहीये आणि चढाईलाही तितकेसे अवघड नाहीये, अशी ग्वाही  जेव्हा ज्ञानेशने दिली,तेव्हा मी मनाचा हिय्या करून ट्रेक ला जाण्याचा निर्णय घेतला. ट्रेकिंग चा पहिलाच अनुभव, त्यामुळे सगळी तयारी साग्रसंगीत, ट्रेकिंग शुज पासून कॅप पर्यंत! लातूर वरून ट्रेकिंग ला जाणारी तशी मी काही एकटी नव्हते. तरीही अनेक आढेवेढे घेत ट्रेक ला जाण्याचा निर्णय झाला. लातूर वरून ट्रेक ला जाणारे आम्ही तिघे होतो. मी,ऋतुजा आणि साई. आमची थोडीशी तारेवरची कसरत होणार होती हे नक्कीच. कारण ट्रेक ची सुरुवात पुण्यातील केसरी वाडा येथून होणार आणि आम्ही रात्री च्या ट्रेन ने लातूर वरून निघून नंतर ट्रेक गाठणार. तर आमची ट्रेकिंग ची सुरुवात येथूनच झाली अस म्हणायला हरकत नाही, पण चलो…कोई नही! तारांबळ नाही उडाली तर तो ट्रेक कसला?

रायरेश्वर ट्रेक group photo

ट्रेकचा दिवस

आम्ही आमचा लवाजमा घेऊन अखेर केसरीवाडा ला पोचलो आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. ट्रेक मध्ये आम्ही तिघे वगळता बाकी मंडळी पुण्याचीच. अमेय, अभिषेक, आरती, अवंती, ज्ञानेश, चैत्रा….. अशी एकूण आम्ही १७ जण ६ मुली आणि ११ मुले. तशी आमची कोणाशीच साधी तोंडओळख हि नव्हती परंतु हळूहळू जशी जशी प्रवासाला सुरुवात झाली आम्ही त्यांच्यातलेच एक झालो. आम्ही भोरला यथेच्छ न्याहारी करून रायरेश्वर कडे प्रस्थान केलं. हा मार्ग घाट रस्ता असल्यामुळे थोडासा कठीणच, वाट बरीच नागमोडी. आमच्या अंताक्षरी च्या गोंधळात काही जाणवले नाही,पण एखादे वळण काळजाचा ठोका चुकवल्याशिवाय राहत नाही. भोर च्या  थोडं अलीकडे लागलेला ‘नेकलेस पॉईंट. धरणीआईच्या गळ्यातील निसर्गाने ओवलेली पोत भासावी अश्या आकाराची ही वेळवंडी नदी. गमतीजमती करत,प्रवासाची मजा घेत,गाणी म्हणत, आम्ही डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो, तिथे एकमेकांची ओळख झाली आणि आमची वानरसेना सज्ज झाली चढाई ला. तसा डोंगर एक तासात चढून होण्यासारखा, सराईतपणे चढणारे पुढे निघून गेले आणि आम्ही नवखे थोडेशे मागे राहिलो,परंतु आमच्या सोबतीला आरती, अभिषेक, ओंकार, ज्ञानेश, मोनिका, मन्मथ हे सगळे होतेच सर्व अगदी आमच्या सोबतीलाच होते. चढत चढत जेव्हा मी पायऱ्यापाशी आले,तेव्हा वरती पाहिल्यावर थोडसं गरगरायला झालं,पण आता वरती पाहायचाच नाही,फक्त जी पायरी समोर आहे तिच्याकडेच पहायचं,हा आयुष्याला लागू होणारा नियम मी पाळायच ठरवलं.  थोडीशी उन्हाची काहिली जाणवत होती पण जसे आम्ही थोड उंचावर गेलो तसा गार रानवारा शीळ घालत आमच्या अंगाखान्द्याशी खेळू लागला,तसा सगळा थकवा कुठच्याकुठे पळून गेला, एकदम मस्त वाटल आणि आम्ही पठारावर पोहोचलो. तिथे आमचे लक्ष वेधून घेतले ते तिथल्या माकडांनी व त्यांच्या मर्कटलीलांनी. ही सर्व माकडे तहान-भुकेने व्याकुळलेली दिसत होती. सह्याद्रीचा हा स्वर्ग खरं पाहता या जनावरांचाच! वाघ, सिंह, कोल्हे, मोर आणि असे कैक प्रकारचे प्राणी इथे वास्तव्य करत असत मात्र आज त्यांचं अस्तित्व अगदी संपुष्टात आल्यासारखं आहे. स्वतः शिवाजी महाराज अनेक पत्रांमध्ये जंगली श्वापदांचा विनाकारण जीव घेऊ नका अशी सक्त ताकीद देताना आढळतात!

रायरेश्वराच्या पठाराच्या वरतून दरीचे दृश्य अगदी विहंगम वाटत होते. हे  दृश्य कॅमेऱ्यामध्ये साठवुन घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु झाला. काही वेळाने पठारावरचं फोटो सेशन संपवून आम्ही रायरेश्वरच्या मंदिराकडे मोर्चा वळवला.

रायरेश्वर ट्रेक experience

रायरेश्वराचा इतिहास आणि ऐतिहासिक शपथविधी 

रायरेश्वराचं नाव इतिहासाच्या सुवर्णपानांवर कोरलं गेलं ते शिवरायांच्या शपथविधीमुळे. या घटनेमुळेच रायरेश्वराला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले.

      २६ एप्रिल १६४५ हाच तो सोनेरी दिवस ज्या दिवशी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. सोळा वर्षांच्या बालशिवरायांनी बारा मावळातील सवंगडी – कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापुजी मुद्गल, यांच्या सोबतीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तर ही घटना एका रात्रीत घडलेली नाहीये तर यामागे बराच इतिहास आहे.

रायरेश्वरास पूर्वी रोहिरेश्वर या नावाने सुद्धा ओळखले जात असे. १६४२ साली दादाजी नरस प्रभू यांनी यांनी एक गाव रायरेश्वर मंदिरास पूजेसाठी नेमून दिले होते व तेथे पुजारीही नेमला होता मात्र आदिलशाहास हि बातमी समजल्यावर आपल्या फतव्याविरोधात ही गोष्ट झाल्याचा राग येऊन त्याने तेथील शहाजी महाराजांचे मुतालिक दादोजी कोंडदेव यांना बडतर्फ केले व त्यांच्या जागी घोरपडे यांना सुभेदारी दिली. पुढे आदिलशहा व शहाजी महाराज यांच्यात समेट झाल्यावर दादोजी कोंडदेव यांना पुन्हा एकदा कोंढाण्याची सुभेदारी प्राप्त झाली.

यावेळी मावळ प्रांताचे प्रमुख देशमुख असलेले कान्होजी जेधे यांना शहाजी महाराजांनी शिवाजीराजांसोबत बंगळूरहून पाठवले होते शिवाजी महाराजांची अगदी सुरुवातीस साथ देणाऱ्यांमध्ये कान्होजी जेधे, बाजी पासलकर व त्यांचे बालपणीचे सवंगडी तानाजी मालुसरे हे होते. हळू हळू प्रांतातील मावळे शिवरायांच्या छत्राखाली एकत्र येऊ लागले. पावसाळ्यात चार महिने शेती करणारे मावळे पावसाळा झाल्यावर स्वराज्य निर्माणार्थ शस्त्र हाती घेऊ लागले. बघता बघता हजार बाराशे मावळे तयार झाले व स्वराज्याच्या पहिल्या मोहिमेचा बेत तयार झाला व तो होता रोहीड खोरे नावाचे मावळ स्वराज्यात सामील करून घेण्याचा.

यावेळी रोहीड खोऱ्याचे अधिकारी दादाजी नरस प्रभू शिवरायांना अनुकूल झाले व स्वराज्याच्या संकल्पाची सुरुवात रोहीड खोऱ्याचे दैवत असलेल्या रायरेश्वराच्या साक्षीने घेण्यासाठी शिवरायांच्या नेतृत्वात सर्व मावळे रायरेश्वराच्या दिशेने हातात ढाल तलवारी घेऊन हर हर महादेव असा जयघोष करीत चालू लागले. सर्व मावळ्यांना घेऊन महाराजांनी रायरेश्वाराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला व रायरेश्वराच्या साक्षीने सर्वांनी स्वराज्य निर्मितीचा अभूतपूर्व संकल्प केला.

“काय कमी रायरेश्वरा तव

असल्यावर आधार

उचलतो म्हणुनी बेलभंडार!”

रायरेश्वर मंदिर

रायरेश्वर मंदिर

हे रायरेश्वराचे मंदिर पठारावर स्थित आहे. हे मुळ मंदिर खूप प्राचीन दगडी आहे, परंतु १८ व्या शतकात त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. आम्ही जेव्हा आत मंदिरात गेलो तेव्हा एक वेगळ्याच प्रकारची नीरव शांतता जाणवली आणि मुळ दगडी बांधकाम असल्यामुळे खूप थंडगार वाटले, अगदी A.C मधे बसल्यासारखं. मंदिराच्या मूळ गाभार्यात स्वयंभू असे शिवलिंग होते. तिथेच मागच्या बाजूला शिवाजी महाराजांचे त्यांच्या मावळ्यासोबत शपथ घेतानाचे छायाचित्र आहे.हे मंदिर पांडवकालीन आहे असे म्हंटले जाते. हे मंदिर म्हणजेच स्वराज्याचे जन्मस्थान असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.या मंदिराला ऐतेहासिक वारसा लाभलेला आहे.पठारावर रायरेश्वर मंदिराव्यतिरिक्त पांडव लेण्या हि आहेत.तर मंदिराचे दर्शन वगेरे घेऊन  आम्ही  तिकडेच थोडसं वेळ घालवला. गडकिल्ले म्हणजे साक्षात तीर्थक्षेत्र मानणाऱ्या अभिषेक ने रायरेश्वर च्या इतिहासाबद्दल थोडी माहिती दिली. एव्हाना आम्हाला चांगलीच भूक लागलेली,आम्ही पठारावर मस्त जेवण केले, आणि गड उतरायला सुरुवात केली. उतरत असताना आम्हाला पाण्याचा एक नैसर्गिक स्त्रोत दिसला, तेच गोमुखकुंड. filtered water ला ही लाजवेल इतकं नितळ आणि मधुर पाणी. पठार उतरताना चा अनुभव वेगळाच होता ,चढताना जेवढी दमछाक झाली नाही तेवढी उतरताना जाणवली,पाय अगदी उचलतच नव्हते, चेहरा तर अगदी लाल कोकंबासारखा झालेला.  

परतीचा प्रवास

परतताना आंबवडे ला ब्रिटीशकालीन “झुलता पूल” (Jijasaheb Suspension Bridge) पाहिला,तसेच नागेश्वर मंदिर ही पाहिले. कुतुहलाची गोष्ट आहे, ज्या निरव शांततेचा अनुभव रायरेश्वराच्या मंदिरात आला अगदी तसाच नागेश्वर मंदिरात हि आला. बराच वेळ तिथून निघावेसेच वाटले नाही.शेवटी निघणे भाग होते. परतीचा प्रवास तितकाच मजेदार होता,गाडी मध्ये बराच कल्ला केला, माहित नाही अश्यावेळी उत्साह कुठून संचारतो, पण एकूणच धमाल आली. सायंकाळी 8 वाजता आम्ही  केसरी वाडा ला परतलो, सगळे जिकडे तिकडे पांगले, अर्थातच परत दुसरीकडे ट्रेक ला जाऊ, हे आश्वासन देऊनच!

Raireshwar treak Jijasaheb Suspension Bridge

व्यक्ती आणि वल्ली

ट्रेक मधील सर्वात मजेदार भाग म्हणजे ‘अंताक्षरी’. खरंतर आमच्यात सुरवातीला थोडासा “ऑकवर्डनेस” होता, तो नाहीसा झाला अंताक्षरी मुळेच. गाण्यांनी आमच्या मध्ये एक वेगळाच दुवा निर्माण केला, आणि बऱ्याच जणांची ओळख झाली, जसे कि उत्साहाचा अखंड उर्जास्त्रोत म्हणावी अशी आरती. तसं पाहायला गेला तर सगळेच जण म्हणजे अमेय, अभिषेक, अवंती, आम्हाला ट्रेक मध्ये सामावून घेत होते .अवंती, अतिशय गोड असं व्यक्तिमत्व,मोठेपणाचा थोडा हि लवलेश तिच्या चेहऱ्यावर नव्हता. मनसोक्त आणि बेफिकीर चैत्रा, “मी तुला या आधी कुठेतरी पाहिलंय” असं म्हणणारा संकेत, ज्याच्याशी बोलताना ओळखीची पण गरज पडली नाही असा शांत आणि कविमनाचा प्रथमेश, अंताक्षरी प्रकारात बेताज बेगम म्हणावी अशी बोल्ड,बिनधास्त मोनिका, सतत मला motivate करणारा ज्ञानेश, ज्याच्या मुळे मी खरतर या ट्रेक चा भाग बनू शकले आणि आणखीन बरेच जण..! खरतर या सर्वांमुळे हि ट्रेक आणखी लक्षात राहिली.अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे सर्वांनी परतताना केलेला धमाल नाच..; अगदी बिनधास्त कुठलीही भीडभाड न बाळगता. माझ्या आयुष्यातील पहिलावहिला ट्रेक खरंच खूप सुंदर झाला तो या सर्वांमुळेच.

रायरेश्वर ट्रेक group photo

अनादी बद्दल थोडसं….

आजकालची तरुण पिढी खूप स्वार्थी आहे,स्वतःच्या पलीकडे त्यांना काही दिसतच नाही. सामाजिक भान जिथे फक्त भाषण आणि राजकारण बनून राहिलंय अश्या जमान्यात काही अवलिया, कॉलेजला जाणारे, सीए वगैरे सारखे अवघड कोर्सेस करणारे पुणेरी मुलं-मुली २०१५ मध्ये एकत्र येतात आणि “डेव्हलप, इंटिग्रेट, सर्व्ह” हे ध्येय घेऊन बनवतात अनादी – एक विचार. अमेय लिमये,ओंकार साबणे,श्रद्धा पोंक्षे आणि इतर काही जण अश्या माझ्याच वयाच्या या सर्वांनी एकत्र येऊन हि संस्था चालू केली. आज या संस्थेचे १०० सदस्य आहेत. “स्वराविष्कार” सारखे शास्त्रीय संगीताचे मोठे कार्यक्रम घेणे असो, “पिक-अ-बुक मधून वाचनाचा छंद जोपासनं असो किंवा दर विकेंड ला सकाळी टेकड्यांवरती झाडांची निगा राखण्यासाठी जाणं असो, कुठल्याही वैयक्तिक फायद्याशिवाय केवळ मनापासून ही विधायक कामं करण्यासाठी “अनादी” असणाऱ्या दैवी पॉझिटीव्ह शक्तीचा वाहता झरा मनात हवा आणि अनादी मधल्या सर्वांमध्ये ते मला जाणवलं! या ट्रेक चं नियोजनही त्यांनी अगदी चोख केलेलं, सतत सगळे leaders सगळे सोबत आहेत कि नाही, याची खबरदारी घेत होते.कोणी नवीन असेल तर त्याची पुरेपूर काळजी घेत होते आणि मदत करत होते.

 एकंदरच हा ट्रेक आणि अनादी संस्था माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता.

रायरेश्वर ट्रेक anadi group

फुलनाफुलाची पाकळी

तनुजा जोशी!


7 Comments

Shriprasad · 4 April 2022 at 6:13 pm

Tanuja, You write like a professional. Keep writing, keep reading, keep exploring.

    Team Words of DPM · 7 April 2022 at 10:55 am

    Thanks Shriprasad!

Aishwarya Kulkarni · 5 April 2022 at 4:59 pm

Very nice tanuja I appreciate your wisdom of words right from school …n after reading this made me remind of my memories too …keep posting such blogs 👍☺️

    Tanuja joshi · 6 April 2022 at 6:40 am

    Thanks a lot 😊surely looking forward for more such blogs ….

    Team Words of DPM · 7 April 2022 at 10:54 am

    Thanks Aish!

आसावरी बोधनकर जोशी · 6 April 2022 at 6:20 pm

खूप छान अनुभव..
त्याचबरोबर सुंदर शब्दरचना होती. वाचत असताना आम्हाला तिथे गेल्यासारखे वाटत होते. अगदी जिवंत चित्र तयार झालं.. keep it up

    Team Words of DPM · 7 April 2022 at 10:54 am

    Thanks Asavari Ji!

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *