प्रकटीकरण

देशात इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास तेजीने सुरू आहे. रस्ते, रेल्वे, विमानतळ, मेट्रो सगळं अगदी दणक्यात वाढतंय. विचार केला नव्हता, मात्र रेल्वेने मनावर घेतलं विद्युतीकरणाला आणि गेल्या तीन चार वर्षांतच साधारण साठ टक्के असणारं रेल्वेमार्गाचं विद्युतीकरण आता शंभर टक्क्यांच्या जवळपास पोचलंय. देशातील चौथा व महाराष्ट्रातील पहिला रेल्वेच्या डब्यांचा कारखाना जवळजवळ बनून तयार आहे लातुरात. म्हणजे उद्या देशाच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या रेल्वेच्या डब्यावर “Coach built by Marathwada Rail Coach Factory, Latur” असं दिसेलही. याच्या फेज 2 मध्ये तर मेट्रो डब्यांचा कारखाना देखील होऊ घातलाय. एकंदरच लातूर आता रेल्वेच्या नकाशावरचं अत्यन्त महत्वाचं ठाणं आहे यात दुमत नाही.

Marathwada Rail Coach Factory, Latur

मात्र असं असतानाही काही मूलभूत सुविधांमध्ये अजूनही का बरं अडकून पडलीये लातूरची रेल्वे? का म्हणून लातूर रोड हे जंक्शन असूनही एक दुर्लक्षित स्थानक आहे? का म्हणून लातूर स्टेशन ची इमारत आजही गावखेड्याच्या छोट्या स्टेशन एवढीच आहे? का बरं दिवसाउजेडी एकही महत्वाची ट्रेन लातूरला येत नाही? घेऊया आढावा सर्व समस्यांचा.

साधारण पंधरा वर्षांपूर्वी स्व. विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नाने सुरू झालेली लातूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस आजही आहे तशीच आहे. त्यात ना डब्यांची वाढ, ना फेऱ्यांची. उलट अगोदरच तुफान गर्दीने ग्रासलेल्या या गाडीला 2018 मध्ये बिदर पर्यन्त वाढवण्यात आलं. हे करत असताना लातूरकरांचा विरोध फाट्यावर मारला. नाही म्हणायला आठवड्यातले तीन दिवस बिदर-यशवंतपुर (बंगळुरू) एक्स्प्रेस लातूरपर्यंत वाढवून एक प्रकारचं साटंलोटं करण्यात आलं. पण मग लातूर एक्स्प्रेस मध्ये एसी, जनरल, स्लीपर सर्वच डबे कमी पडतात. डब्यांची संख्या किंवा गाडीची एखादी फेरी वाढवण्याची कल्पना कुणालाच का आली नसेल देव जाणे, पण लातूरकर आर्त स्वरात लातूर-मुंबई गाडीची एक फेरी दिवसा पुण्यापर्यंत करावी ही मागणी अनेक वर्षांपासून लावून आहेत.

समस्यांच्या विळख्यात लातूरची रेल्वे!

एखाद्या स्टेशनवरून गाडी सुरू करण्यासाठी Pit Line ची रेल्वेपट्टी असावी लागते जेणेकरून रेल्वेची स्वच्छता नियमितपणे राखली जाते. लातूर स्थानकावर पिटलाईन बनवण्याची मागणी अगदी मागच्या महिन्यात मंजूर झाली. म्हणजे नवीन गाड्या सुरू करायला स्कोप आहे. रेल्वेगाड्यांसंदर्भात खालीलप्रमाणे काही मागण्या आहेत लातूरकरांच्या:

रेल्वेगाड्यांच्या मागण्या

  1. लातूर – मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसचे डबे वाढवण्यात यावे व सर्व डबे LHB कोचेस चे असावे
  2. लातूर – मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस आठवड्यातले 4 दिवस लातूरमध्ये 16 तास रिकामी उभी असते. सदर काळात गाडीची एक फेरी पुण्यापर्यंत करण्यात यावी.
  3. वरील मागणी शक्य नसेल तर लातूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस दिवसाच्या वेळी सुरू करण्यात यावी.
  4. कोल्हापूर-नागपूर व हडपसर-हैदराबाद गाड्यांना डेली करण्यात यावे.
  5. लातूर-छत्रपती संभाजीनगर अशी एक डेली अथवा वीकली गाडी सुरू करण्यात यावी
  6. लातूरवरून दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, आग्रा, लखनऊ, वाराणसी, अजमेर, रामेश्वरम, त्रिवेंद्रम, विशाखापट्टणम इ. दूरस्थ शहरांना रेल्वेची सोय करण्यात यावी.
  7. कुर्डुवाडी जंक्शन ते लातूररोड जंक्शन लोकल सुरू करण्यात यावी.
  8. मिरज-परळी व पंढरपूर-निजामाबाद डेमु एक्स्प्रेसच्या वेळा बदलून दिवसा ठेवण्यात याव्यात.
  9. हरंगुळ, औसारोड, मुरुड, ढोकी येथे एक्स्प्रेस गाड्यांना तर घरणी, भातांगळी येथे डेमु/पॅसेंजर गाड्यांना थांबा देण्यात यावा.
  10. लातूर-नाशिकरोड मार्गे दौंड-अहमदनगर-मनमाड अशी रेल्वेदेखील सुरू करण्यात यावी.
  11. भविष्यात लातूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात यावी
  12. धनबाद-कोल्हापूर दीक्षाभूमी एक्स्प्रेस सारख्या इतरही लांब पल्ल्याच्या गाड्या लातूरमार्गे वळवण्यात याव्यात.
  13. तेजस, दुरोंतो, गरीबरथ, गतिमान, राजधानी इ. प्रकारच्या गाड्यादेखील लातूरमार्गे वळवून मोठ्या शहरांशी लातूरला जोडण्यात यावं.

स्थानक-सुसज्जतेच्या मागण्या

Latur railway station

लातूर रेल्वेस्थानक आजही एखाद्या गावखेड्याच्या स्थानकासारखं छोट्याश्या इमारतीत आहे. हीच गत लातूररोड जंक्शन ची सुद्धा आहे. दिसायला आकर्षक असलं तरी हरंगुळ स्थानक सुद्धा असंच छोटंसं आहे, तेही केवळ एका प्लॅटफॉर्मचं. स्टेशन संदर्भात काही महत्वाच्या मागण्या

  1. लातूररोड किंवा हरंगुळ स्थानकावर 4 पर्यन्त प्लॅटफॉर्म ची संख्या वाढवण्यात यावी.
  2. दोन्ही स्थानकांवर सरकता जिना अर्थात एसकेलेटर आणि लिफ्ट ची व्यवस्था करण्यात यावी.
  3. लातूर स्थानकावर लौंज, आहे त्यापेक्षा मोठे व सुसज्ज प्रतिक्षालाय, आहे त्यापेक्षा मोठे व स्वच्छ प्रसाधनगृह, कॅन्टीन आदि सेवा सुरू करण्यात याव्यात.
  4. लातूर व लातूररोड जंक्शन च्या इमारती अद्ययावत व मोठ्या करण्यात याव्यात.
  5. लातूरच्या प्लॅटफॉर्म क्रं 1 ची लांबी वाढवण्यात यावी, तसेच प्लॅटफॉर्मचे शेड्स सुद्धा वाढवण्यात यावे.
  6. लातूर स्थानकावर दुसऱ्या बाजूने दादरा म्हणजेच फूट ओव्हरब्रिज बनवण्यात यावा तसेच हरंगुळ स्थानकावरही दादरा बनवण्यात यावा.
  7. लातूर रेल्वेस्थानक परिसरात सुरक्षित व गार्डेड पार्किंग ची सोय करण्यात यावी.

नवीन रेल्वेमार्ग व दुहेरीकरण

लातूरची रेल्वे!

लातूर-अहमदपूर-नांदेड या रेल्वेमार्गास मंजुरी मिळून अनेक वर्षे झाली तरी प्रत्यक्षात काम अजून दिसणं बाकी आहे. हीच गत सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाचीही आहेच. काही विशिष्ट मागण्या यासंदर्भात:

  1. लातूर रोड-नांदेड व सोलापूर-धाराशिव रेल्वेमार्गाचं काम तातडीनं पूर्ण करण्यात यावं.
  2. लातूर-छत्रपती संभाजीनगर मार्गे केज-बीड-गेवराई अश्या नव्या रेल्वेमार्गाचं काम सर्वेक्षणात घेण्यात यावं.
  3. लातूररोड-बोधन रेल्वेमार्गास लवकरात लवकर मंजुरी मिळवून देण्यात यावी.
  4. लातूररोड-मिरज मार्गाचं दुहेरीकरण तात्काळ पूर्ण करण्यात यावं.
  5. लातूररोड जंक्शन येथे बायपास लाईन बनवण्यात यावी.

लातूर रेल्वेस्थानकाची कनेक्टिव्हिटी

समस्यांच्या विळख्यात लातूरची रेल्वे!

सदरील मागण्या विशेषतः लातूर मनपा व लातूर जिल्हा प्रशासनाकडे आहेत. लातूर रेल्वेस्थानक शहराच्या मध्यवर्ती भागापासून तब्बल 6 किमी दूर आहे. लातूररोड जंक्शन लातूर शहरापासून 40 तर चाकूरपासून 7 किमी अंतरावर आहे. हरंगुळ स्थानक शहरापासून साधारण 8 किमी तर लातूर रेल्वेस्थानकापासून 10 किमी अंतरावर आहे.  या सर्व ठिकाणी कनेक्टिव्हिटी सुसज्ज ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे सिटी बसच्या फेरी वाढवण्यात याव्या.

  1. लातूर-मुंबई प्रमाणेच कोल्हापूर-नागपूर, धनबाद-कोल्हापूर, सोलापूर-तिरुपती, नांदेड-पनवेल, हडपसर-हैदराबाद, अमरावती-पुणे या गाड्यांच्या वेळांनाही सिटी बस सोडण्यात याव्यात.
  2. लातूर रोड जंक्शन पासून ते राष्ट्रीय महामार्ग क्रं 361 हा 1 किमी मार्ग अत्यन्त खराब अवस्थेत आहे. इथे सुसज्ज रस्ता बनवन्यात यावा.
  3. नांदेड-बंगळुरू, छत्रपती संभाजीनगर-तिरुपती, शिर्डी-हैदराबाद, पूर्णा-हैदराबाद, छत्रपती संभाजीनगर-हैदराबाद या सर्व गाड्यांच्या वेळी लातूर ते लातूररोड जंक्शन आणि रिटर्न अश्या सिटी बसेस किंवा एसटी बसेस सोडण्यात याव्यात.
  4. राष्ट्रीय महामार्ग 548B रिंग रोड ते लातूर रेल्वेस्थानक हा 1 किलोमीटर रस्ता चौपदरीकरण करून पथदिवे बसवण्यात यावेत.

मालगाडी व मालधक्का

1) लातूरच्या मालधक्क्याचे स्टेशनजवळच नवीन जागी स्थलांतरण करून सध्याच्या मालधक्क्याची जागा वाढीव प्लेटफॉर्म्स साठी वापरण्यात यावी.

2) सध्या मालधक्क्याकडे जाणारा रस्ता साई रोड मार्गे जातो व अत्यन्त दुरावस्थेत आहे. मालधक्क्यापासून ते स्टेशनरोड पर्यन्त बाह्यवळण उड्डाणपूल बांधून मालधक्क्याची वाहतूक थेट रिंगरोडला आणण्यात यावी.

3) मालधक्क्याची सुसज्ज इमारत बांधावी व भव्य शासकीय गोदाम आणि शीतगृह त्याच्याजवळच बनवण्यात यावे.

4) ईस्टर्न व वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रमाणे भविष्यातही होऊ घातलेल्या फ्रेट कॉरिडॉरच्या नकाशावर लातूरला आणण्याचा अग्रस्थानी विचार व्हावा. लातूर मधील रेल कोच फॅक्टरी, मोठ्या ऑइल मिल्स, साखर-सोयाबीन-तूर यांसारख्या पिकांचे उत्पादन व बाजारपेठ यांसारख्या सर्व महत्वाच्या गोष्टींचा विचार करता लातूरला मालगाड्यांची व भविष्यात लातूरमार्गे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर ची नितांत आवश्यकता आहे यात दुमत नाही.

मराठवाड्यातील इतर समस्या व मागण्या

समस्यांच्या विळख्यात लातूरची रेल्वे!

1) परभणी-परळी-विकाराबाद रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.

2) तब्बल 29 वर्षांपासून संथगतीने चाललेल्या परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाचे काम तातडीने पूर्ण करून सदर मार्ग विद्युतीकरण करून घ्यावा.

3) परभणी-मनमाड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण तातडीने पूर्ण करण्यात यावे.

4) जालना-जळगाव व नांदेड-वर्धा रेल्वेमार्गाचे कामही तातडीने पूर्ण व्हावे.

5) संपूर्ण मराठवाड्यासाठी “मराठवाडा रेल्वे” हा स्वतंत्र रेल्वे विभाग घोषित करण्यात यावा.

6) घाटनांदूर-अंबाजोगाई-दौंड रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण करून तातडीने मंजुरीसाठी प्रयत्न करावेत.

7) मराठवाड्यात एक स्वतंत्र रेल्वेयार्ड बनवण्यात यावे.

8) मनमाड-जालना, नांदेड-परभणी, परळी-परभणी मार्गावर लोकल सेवा सुरू करण्यात यावी (हे काम शंभर टक्के विद्युतीकरण व दुहेरीकरणाशिवाय होऊ शकत नसल्याने सध्याच्या ही तातडीची मागणी केवळ नांदेड-परभणी मार्गासाठी ग्राह्य धरण्यात येऊ शकते, मात्र उपरोक्त सर्व मार्गांवर लोकल ट्रेनची नितांत आवश्यकता आहे)

शेवटाकडे…

वरीलपैकी काही मागण्या अवाजवी किंवा अप्रात्यक्षिक वाटत असल्या तरी लातूर व मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रचंड गरजेच्या आहेत. या सर्व मागण्या लातूर व मराठवाड्याच्याजनतेच्या वतीने केंद्रीय रेल्वे मंत्री मा. श्री. अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा. श्री. रावसाहेब दानवे, महाराष्ट्र शासन व स्थानिक प्रशासनास सविनय सादर करण्यात येत आहेत. हा ब्लॉग इतका शेअर करा की शासनाला या मागण्यांची दखल घ्यावीच लागेल.

जय हिंद!

Warm Regards,

Dnyanesh Make “The DPM”


1 Comment

Vyankatesh Gomchale · 9 April 2023 at 8:10 am

Really Great! Awesome point of you sir! May this blog got forwarded towards ministry!

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *